आशीष ठाकूर
अमेरिकेतील औषध कंपनी जीलेडकडून एक सुखद वार्ता आली. कोविडबाधित, अतिचिंताजनक परिस्थितीतील रुग्णांमध्ये, जीलेडच्या औषधांनी लक्षणीय सुधारणा होत असल्याचे वृत्त धडकताच करोनामुळे होरपळून निघालेल्या समस्त मानवजातीने सुस्कारा सोडला. त्यानंतरच्या मनातील सुखद, तरल भावनांना कविश्रेष्ठ गुलझार यांनी ‘आज कल पाँव जमीं पर नहीं पडते मेरे, बोलो देखा है कभी तुमने मुझे उडते हुए’ असे उत्तम शब्दबद्ध केले आहे. सध्याची बाजारस्थिती पाहता, लेखाच्या शीर्षकासाठी म्हणून त्यांच्याच काव्यपंक्ती समर्पक वाटतात. या पार्श्वभूमीवर आठवडय़ाच्या वाटचालीकडे वळू या.
शुक्रवारचा बंद भाव :
सेन्सेक्स: ३१,५८८.७२ / निफ्टी : ९,२६६.७५
वरील सुखद वातावरणात निर्देशांकांनी त्यांच्यासाठी अवघड असलेला टप्पा, म्हणजे सेन्सेक्सवर ३१,७०० आणि निफ्टीवर ९,३०० च्या स्तराला, सरलेल्या सप्ताहातील शुक्रवारच्या सत्राच्या प्रारंभी स्पर्श केला.
येणाऱ्या दिवसांत निर्देशांक सेन्सेक्स ३१,७०० आणि निफ्टी ९,३०० स्तरावर सातत्याने तीन दिवस टिकल्यास, निर्देशांकांचे वरचे लक्ष्य सेन्सेक्सवर ३२,८०० आणि निफ्टीवर ९,६०० असे असेल. अन्यथा निर्देशांक – सेन्सेक्स ३०,७०० आणि निफ्टी ९,००० च्या स्तराखाली सातत्याने राहिल्यास, जलद घसरणीस सुरुवात होऊन खालचे लक्ष्य हे सेन्सेक्सवर २९,७०० आणि निफ्टीवर ८,७०० असे असेल. अर्थात निर्देशांकांनी हा स्तर राखून ठेवल्यास तेजीचा टवटवीतपणा कायम राहील.
आगामी तिमाही निकालांचा वेध..
१) इन्फोसिस टेक्नॉलॉजी लिमिटेड
* तिमाही निकाल : सोमवार, २० एप्रिल
* १७ एप्रिलचा बंद भाव : ६२९,३०रु.
* निकालानंतर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : ५८० रुपये
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ५८० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ६५० रुपये. भविष्यात ५८० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ७५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.
ब) सर्वसाधारण निकाल : ५८० ते ६५० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.
क) निराशाजनक निकाल : ५८० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५०० रुपयांपर्यंत घसरण.
२) टाटा ऐलेक्सी लिमिटेड
* तिमाही निकाल : सोमवार, २० एप्रिल
* १७ एप्रिलचा बंद भाव : ७१२,५० रु.
* निकालानंतर महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : ६०० रुपये
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून ६०० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य ७८० रुपये. भविष्यात ६०० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास ८५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.
ब) सर्वसाधारण निकाल : ६०० ते ७८० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.
क) निराशाजनक निकाल : ६०० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ५०० रुपयांपर्यंत घसरण.
३) एसीसी लिमिटेड
* तिमाही निकाल : मंगळवार, २१ एप्रिल
* १७ एप्रिलचा बंद भाव : १,१७२.५० रु.
६ निकालानंतरचा महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर : १,०५० रु.
अ) उत्कृष्ट निकाल : समभागाकडून १,०५० रुपयांचा स्तर राखत, प्रथम वरचे लक्ष्य १,२०० रुपये. भविष्यात १,०५० रुपयांचा स्तर सातत्याने राखल्यास १,३५० रुपयांच्या लक्ष्याकडे वाटचाल.
ब) सर्वसाधारण निकाल : १,०५० ते १,२०० रुपयांच्या पट्टय़ात वाटचाल.
क) निराशाजनक निकाल : १,०५० रुपयांचा केंद्रबिंदू स्तर तोडत ९०० रुपयांपर्यंत घसरण.
समभाग संच बांधणीचे निकष :
* एप्रिलच्या लेखातील समभाग संच बांधणीतील दुसरा समभाग हा आयआरसीटीसी लिमिटेड होता.
रेल्वेची सेवा ही जीवनवाहिनी, दळणवळणाचे मुख्य साधन म्हणून ओळखली जाते. रेल्वेच्या मूलभूत, मक्तेदारी असलेल्या विविध सेवा प्रभावी स्वरूपात ही कंपनी एका छत्राखाली पुरवते. त्यामुळे या कंपनीची निवड केली. रेल्वेच्या दूर पल्ल्याच्या गाडय़ांच्या तिकिटांचे संगणकीय आरक्षण, या गाडय़ांमधील प्रवासादरम्यान अल्पोपहार, भोजन, रेल नीर हे बाटलीबंद पाणी या पारंपरिक सेवांबरोबरच आपल्या कार्यपद्धतीत ३६० अंशांनी गुणात्मक, कलात्मक बदल करत आकर्षक, आधुनिकतेची कास धरत पंचतारांकित सेवांची सुरुवात केली. यात मोक्याच्या पर्यटनस्थळांवर पंचतारांकित उपाहारगृह, हॉटेल्स, सहलींचे आयोजन व नियोजन, विमानांच्या तिकिटांचे आरक्षण हे सर्व उपक्रम व्यावसायिकदृष्टय़ा नावात रेल्वे असताना यशस्वी करून दाखविले.
जेव्हा या कंपनीने आपली प्राथमिक समभाग विक्री केली तेव्हा (आयपीओ समयी) किंमत ही ३२० रुपये प्रती समभाग होती तर अवघ्या तीन महिन्यांत, भांडवली बाजारात १,९०० रुपयांचा उच्चांक नोंदवत सहाशे टक्क्य़ांचा परतावा कंपनीने दिला व गुंतवणूकदारांना मालामाल केले. या मंदीतही या समभागाच्या खरेदीसाठी झुंबड उडते व खरेदीचे वरचे सर्किट लागते. थोडक्यात सरकारी कंपनी देखील यशस्वी होऊन तिचे भांडवली बाजारातले भाव हे ‘बोलो देखा है कभी तुमने मुझे उडते हुए’ या सुखद काव्यपंक्तींचा अनुभव देऊन जातात. (क्रमश:)
लेखक भांडवली बाजार विश्लेषक
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती : शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि इच्छित उद्दिष्ट या संकल्पनाचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.