शेअर बाजाराच्या एसएमई व्यासपीठावरून लघू व मध्यम उद्योगांनी गेल्या दोन वर्षांत ५५० कोटी रुपयांची उभारणी केली असून या गटात सूचिबद्ध असलेल्या ६६ कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ७,९०० कोटी रुपये झाले आहे. यात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या ‘एनएसई इमर्ज’ या मंचावरील पाच एसएमई कंपन्या जमेस धरल्यास, आजच्या घडीला छोटय़ा कंपन्यांचे बाजारमूल्य तब्बल १० हजार कोटींच्या घरात गेले आहे.
देशात छोटय़ा उद्योगांपुढे भांडवली अर्थसहाय्याची मोठी समस्या असून, बँका व वित्तसंस्थांकडून प्रथितयश व्यवसाय असूनही जवळपास ९० टक्के एसएमईंना कर्जसहाय्य दिले जात नाही आणि दिलेच तर व्याजाचे दर खूपच प्रचंड असतात. त्यामुळे वैयक्तिक गुंतवणूकदारांकडून व्यवसाय विस्तारासाठी निधी उभारण्याची भांडवली बाजारांनी स्वतंत्र व्यासपीठाद्वारे छोटय़ा उद्योगांना दिलेल्या संधीचे इच्छित लाभ त्यांना मिळत असल्याचे दिसून येत आहे.  
मुंबई शेअर बाजारात लघू व मध्यम उद्योग क्षेत्रातील कंपन्यांच्या सूचिबद्धतेसाठी मार्च २०१२ मध्ये स्वतंत्र व्यासपीठ सुरू करण्यात आले. या कंपन्यांना प्राथमिक समभाग विक्रीमार्फत निधी उभारणीचा पर्याय ‘सेबी’ने यातून दिला आहे.
बीएसईच्या एसएमई व्यासपीठावर ६६ कंपन्यांनी ५५० कोटी रुपये उभारल्याची माहिती मुंबई शेअर बाजाराचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशीषकुमार चौहान यांनी दिली. या एसएमई व्यासपीठाला लघू व मध्यम उद्योग क्षेत्रातील कंपन्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून डिसेंबर २०१४ पर्यंत या गटात सूचिबद्ध कंपन्यांची संख्या १०० होईल, असेही त्यांनी सांगितले. व्यासपीठावर येणाऱ्या नव्या कंपन्यांमध्ये निर्मिती क्षेत्र, पोलाद, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या असतील, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई शेअर बाजारानंतर राष्ट्रीय शेअर बाजारानेही गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ‘एनएसई इमर्ज’ हे लघू व मध्यम उद्योगांसाठी स्वतंत्र दालन सुरू केले होते. स्थापनेची १० वर्षे पूर्ण न करणाऱ्या व आर्थिक वर्षांत १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल नसलेल्या लघु व मध्यम उद्योग क्षेत्रातील कंपन्या भांडवली बाजारातील या गटात सूचिबद्ध होऊ शकतात.
    ’  व्यापार प्रतिनिधी

Story img Loader