arth2दक्षिण भारतातील कोइम्बतूरस्थित अंबिका कॉटन मिल्स ही भारतातील एक प्रमुख सूतगिरणी आहे. १९८८ मध्ये उत्पादनाला सुरुवात केलेल्या या कंपनीच्या तामिळनाडूत चार मिल्स असून ती प्रामुख्याने १००% कॉटन यार्नचे उत्पादन करते. सध्या कंपनीकडे १,०८,२८८ चाती (स्पिंडल्स) असून उत्पादनांसाठी लागणारी वीजनिर्मिती कंपनी स्वत: आपल्या पवनचक्क्यांमार्फत करते. आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती मिळविलेल्या अंबिका कॉटनकडे अमेरिकेतील सुपीमा असोसिएशनचे सुपीमा प्रमाणपत्र तर कंट्रोल युनियनचे गोत्स प्रमाणपत्र असून आतापर्यंत जगातील कुठल्याही ग्राहकाकडून एकही तक्रार नसलेली ही पहिलीच कंपनी म्हणावी लागेल. उत्तम प्रतीच्या सूत निर्मितीमुळे जगभरातील सुप्रसिद्ध ब्रॅण्डचे शर्ट्स तसेच टी शर्ट्ससाठी कंपनी आपली उत्पादने पुरविते. कंपनीच्या एकूण उत्पादनापैकी जवळपास ४५% उत्पादन चीन, तैवान, हाँगकाँग, इजिप्त, कोरिया, इस्रायल, पेरू, इटली, जर्मनी इ. देशांत निर्यात करते.
आपल्या उत्तम कामगिरीने गेल्या काही वर्षांत कंपनीने भागधारकांना भरपूर फायदा करून दिला आहे. डिसेंबर २०१५ अखेर समाप्त तिसऱ्या तिमाहीसाठी कंपनीने १२४.२९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १४.५४ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या तिमाहीच्या तुलनेत तो थोडा कमी असला तरीही इतर कंपन्यांच्या तुलनेत कंपनीची कामगिरी सरसच आहे. तसेच अंबिकावर कर्ज फारच कमी असून त्याचा परिणाम भविष्यात नफा वाढण्यात होऊ शकेल. मार्च २०१६ साठी संपणाऱ्या आर्थिक वर्षांचे निकाल हे सदर आपल्या वाचनात येईपर्यंत आले असतील. निकाल कसाही असला तरीही गेली पाच वर्षे सातत्याने सरासरी २२.६०% वार्षिक वाढ दाखवणारी ही केवळ ०.४० बीटा असलेली कंपनी दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वाटते.

सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) लेखात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
अजय वाळिंबे – stocksandwealth @gmail.com

Story img Loader