बाटाबद्दल निदान भारतीय गुंतवणूकदारांना तरी सांगायची गरज नाही. १९३१ मध्ये स्थापन झालेली बाटा ही भारतातील सर्वात मोठी पादत्राणे उत्पादन करणारी तसेच विक्री करणारी मोठी रिटेल कंपनी आहे. भारतभरात म्हणजे एकाच देशात सुमारे १,४०० पेक्षाही जास्त विक्री केंद्रे आणि ३०,००० डिलर्स असलेली बाटा ही जगातील देखील सर्वात मोठी रिटेल कंपनी असावी. १९७३ मध्ये शेअर बाजारात नोंदणी झाल्यापासून बाटा हा भारतातील एक प्रमुख आणि लोकप्रिय ब्रँड झाला आहे. बाटा या प्रमुख ब्रॅंडमध्येच हश पपीज् हा प्रीमियम ब्रॅंड तर नॉर्थ स्टार, मोकासिनो, पॉवर, सँडक, श्चोल, अम्बॅसडर, मेरी क्लेरी इ. अनेक सब-ब्रँड्स उपलब्ध आहेत. दिवसाला दीड लाखाहून अधिक ग्राहक असणारी ही कंपनी वर्षांला पाच कोटीहून अधिक पादत्राणे विकते. सुरुवातीला पश्चिम बंगालमधून उत्पादन घेणाऱ्या बाटा कंपनीची भारतात सध्या पाच उत्पादन केंद्रे आहेत. सध्या बिहार आणि कर्नाटकातील कारखान्यांचे आधुनिकीकरण सुरू असून आगामी काळात दरवर्षी १०० नवीन रिटेल दुकाने उघडण्याचा कंपनीचा मानस आहे. सध्या प्रामुख्याने मोठय़ा शहरांतून विक्री करणाऱ्या कंपनीने आता मध्यम आणि छोटय़ा शहरातही आता आपले विक्रीचे जाळे पसरवायला सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने आपल्या शेअरचे विभाजन केल्याने आता शेअरचे दर्शनी मूल्य पाच रुपये झाले आहे. ही बहुराष्ट्रीय कंपनी गेली ७५ वष्रे भारतीय जनतेचा अविभाज्य भाग बनली आहे, त्यामुळे साहजिकच बाटा गुंतवणूकदारांनादेखील आकर्षक वाटू लागली आहे. कुठलेही कर्ज नसलेली ही कंपनी तुमच्या पोर्टफोलियोसाठी एक सुरक्षित आणि लाभदायक गुंतवणूक ठरेल यांत शंका नाही.
av-04
stocksandwealth@gmail.com
सूचना:
लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) प्रस्तुत लेखामध्ये सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.