दिवाळीनिमित्त बाजार फुलायला लागलेला आहे. वेगवेगळ्या दलाली पेढय़ा आपापले गुंतवणूकफराळ घेऊन सज्ज झाल्या आहेत. आजपासून आपापल्या अशिलांना या मिठाईच्या पुडय़ा रवानाही होतील. मुहूर्ताला खरेदीसाठी शिफारस करावेसे वाटलेले हे गुंतवणूक त्रिकूट..
राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारू लागला. ‘‘राजा, दिवाळीनिमित्त बाजार फुलायला लागलेला आहे. वेगवेगळ्या दलाली पेढय़ा आपापले गुंतवणूकफराळ घेऊन सज्ज झाल्या आहेत. आजपासून आपापल्या अशिलांना या मिठाईच्या पुडय़ा रवाना होतील. तुझ्या मते अशा कोणत्या तीन कंपन्या तू सुचवशील ज्या पुढील वर्षभरात गुंतवणूकदारांना भरभरून लाभ देतील? प्रश्नाचे उत्तर तू दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’’ वेताळाने राजाला सांगितले.
‘‘दिवाळी एका आठवडय़ावर आलेली असल्याने तुझ्यासहित समस्त गुंतवणूकदार समूहाला या वर्षी मुहूर्ताच्या सौद्यावेळी काय खरेदी करावे हा प्रश्न पडला आहे. सततच्या दोन वर्षांनंतरच्या अवर्षणानंतर सरासरीपेक्षा अधिक झालेला पाऊस ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देईल. सरकारकडून अर्थसंकल्पात ग्रामीण अर्थव्यवस्थेला पूरक अशी मोठी तरतूद केली असल्याच्या धोरणाला उत्तम झालेला पाऊस पूरक ठरणार आहे. परिणामी ग्रामीण अर्थव्यवस्था जोर पकडेल. या पाश्र्वभूमीवर दलाली पेढय़ाकडून सर्वसामान्य जनतेशी संबंधित समभागांची शिफारस होत आहे. कोणाही गुंतवणूकदारांना आपल्या पोर्टफोलियोत नव्याने उत्तम मूल्यांकन असलेले समभाग घ्यावेत. या पाश्र्वभूमीवर मला आवडलेले तीन समभाग सांगत आहे,’’ राजा म्हणाला.
‘‘मला आवडलेला पहिला दिवाळी विशेष आहे ब्रिटानिया इंडस्ट्रीज. ब्रिटानिया हा शब्द उच्चारताच ब्रिटानियाची सिग्नेचर टय़ून असलेल्या डिंग डिंग डीडिंग या ध्वनीसूचक शब्दांची मला आठवण येते. कधी काळी मिड कॅप धाटणीच्या या कंपनीचे मूल्यांकन लार्ज कॅपच्या जवळ आले आहे. ब्रिटानियाची बिस्किटांच्या गुड डे, बॉनबॉन, ब्रिटानिया मारी या परिचित नामामुद्रांनी भारतीयांच्या जिभेवर राज्य केले आहे. बिस्किटांच्या बाजारपेठेत भारतात पारले, ब्रिटानिया यासारखे आणखी एक-दोन उत्पादक सोडले तर अन्य उत्पादक स्थानिक बाजारपेठांपुरते मर्यादित आहेत. याचा परिणाम ब्रिटानियाच्या मध्य भारतातील बाजारपेठेवर होत होता. मध्य भारत (मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड व उत्तराखंड) वगळता अन्य राज्यांत ब्रिटानियाचा ३३ टक्के हिस्सा आहे. मध्य भारतात प्रबळ स्थानिक उत्पादकामुळे हाच हिस्सा राज्यांगणिक ९ ते १५ टक्क्यांदरम्यान होता. या बाजारपेठेत मुसंडी मारण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांना यश येत असून मागील तीन तिमाहीत हा हिस्सा वाढलेला
दिसत आहे. महागाई कमी होत असल्याने बिस्किटांसाठीचा कच्चा माल असलेला मैदा, पाम तेल, साखर आदींच्या कमी झालेल्या किमतींमुळे नफाक्षमता वाढलेली दिसेल. विक्रीत १२ ते १५ टक्के व निव्वळ नफ्यात ८ ते २० टक्के वृद्धीच्या अपेक्षेने एका वर्षांनंतर ४००० रुपयांचे लक्ष्य निर्धारित करता येईल,’’ राजा म्हणाला.
‘‘मी मुहूर्ताच्या खरेदीसाठी सध्या ९३०-९३२ दरम्यान भाव असलेली ग्लेनमार्क फार्मा ही निवडलेली दुसरी कंपनी आहे. अमेरिकेच्या बाजारपेठेत बस्तान बसविल्यामुळे नावारूपाला आलेल्या या कंपनीने अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाकडे ६० अर्ज Abbreviated New Drug Application (एएनडीए) सादर केले आहेत. यापैकी बहुतांश अर्ज ३६ महिन्यांपूर्वी सादर केले असल्याने या अर्जाच्या आधारे कर्करोगावर इलाज असणाऱ्या औषधांच्या मागणीत मोठी वाढ संभवत आहे. कंपनीने gZetia नावाची नाममुद्रेचे औषध अमेरिकेत डिसेंबर २०१६ मध्ये उपलब्ध करून देण्याचे धोरण आखले असून याचा फायदा पुढील वर्षभरात कंपनीला मिळू शकेल,’’ राजा म्हणाला.
‘‘मुहूर्त त्रिकुटापैकी तिसरी कंपनी आहे, सर्व भारतीयांची बँक असे बिरुद मिरविणारी आपल्या परिचयाची स्टेट बँक ऑफ इंडिया. शुक्रवारी बाजार बंद होताना २५८ रुपये भाव असलेल्या स्टेट बँकेने पुढील दिवाळीत आपला सार्वकालिक उच्चांक नोंदविला तर मला आश्चर्य वाटणार नाही. माझे पुढील दिवाळीत स्टेट बँकेचे लक्ष्य ४५० रुपयांचे आहे. मे २०१७ मध्ये आर्थिक वर्ष २०१७ चे निकाल जाहीर होताना स्टेट बँकेने नफ्यात मागील वर्षांच्या तुलनेत ३३ टक्के वाढ नोंदविली असेल. तर मार्च २०१८ मध्ये संपलेल्या वर्षांत नफा आधीच्या वर्षांच्या तुलनेत ३८ टक्के वाढलेला दिसून येईल. सरकार पायाभूत सुविधांवर मोठय़ा प्रमाणात खर्च करीत आहे. सरकारचे धोरण वेगवेगळे थांबलेल्या प्रकल्पांना गती देण्याचे असल्याने स्टेट बँकेची अनुत्पादित कर्जे उत्पादित होतील व अनुत्पादित कर्जापोटी करावी लागलेली तरतूद कमी झालेली असल्याने नफ्यात मोठय़ा प्रमाणात वृद्धी झालेली दिसेल. सध्या ही बँक गृह कर्जे व वाहन कर्जाच्या बाजारपेठेतील अनभिषिक्त सम्राट आहे. अन्य सार्वजनिक बँकांच्या तुलनेत ग्राहकांची पहिली पसंती स्टेट बँकेच्या ‘एसबीआय मँक्सगेन’ला मिळत आहे. मार्च २०१७मध्ये चार सहयोगी बँकांचे स्टेट बँकेत विलीनीकरण झालेले असल्याच्या फायदा पुढील दिवाळीत नक्कीच दिसून येईल. कदाचित या वर्षांअखेर स्टेट बँकेच्या आयुर्विमा व्यवसायात असलेल्या कंपनीची शेअर बाजारात नोंदणी झालेली असेल. या सर्व मुद्दय़ांचा विचार करता, स्टेट बँक मुहूर्ताच्या सौद्यासाठी आकर्षक गुंतवणूक आहे असे माझे मत झाले आहे,’’ राजा म्हणाला.
अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.
पुंगीवाला – gajrachipungi @gmail.com