निवृत्तीसाठी पूर्वतरतूद करून ठेवणे सध्याच्या वधारलेल्या सरासरी आयुर्मानांत गरजेचे आहे, कमावत्या वयात होणाऱ्या निवृत्ती नियोजनातूनच उत्तर आयुष्यातील आर्थिक उत्पन्नाला लक्षात घ्यावे लागते. त्यामुळे या संबंधाने विचार केला नसल्यास, आतापासून तयारी लागलेले बरे..

निवृत्तीसाठी तरतूद करणे गरजेचे आहे, हे आपल्याला ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’मध्ये व इतर ठिकाणी येणारे लेख वाचून, ऐकून नक्कीच पटले असेल. पण बरेचदा होते काय, आपल्याला गोष्टी कळतात- पटतात, पण त्याप्रमाणे आपण वागतोच असे नाही. तसेच सन २००३-०४ पूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तिवेतन मिळत होते, पण आता सरकारनेसुद्धा नवीन कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तिवेतन योजना बंद केली आहे व स्वावलंबन योजना सुरू केली आहे. स्वावलंबन योजना म्हणजे कमावते असताना स्वत: जमवा व आपल्या जमलेल्या पैशावर निवृत्तीपश्चात अवलंबून राहा. तसेच खासगी कंपनीत नोकरी करणाऱ्यांनादेखील निवृत्तिवेतन मिळत नाही, म्हणून सर्वानीच उत्तर आयुष्यातील तरतुदीचा विचार करणे आवश्यक झाले आहे. तर मग आता समजून घेऊया की यासाठी कोणकोणते पर्याय उपलब्ध आहेत आणि ते कोणी, कसे निवडावेत; त्यांचे काय फायदे/तोटे आहेत व ते निवडताना कोणती काळजी घ्यावी.

कोणतीही सुयोग्य निवृत्ती योजना निवडताना आपण काळजी घेतली पाहिजे, कारण एकदा यात पैसे गुंतवले की ते काढून घेणे नुसते कठीण नाही तर महाग देखील पडू शकते. कारण मुळात विमा हा एक दीर्घ मुदतीचा करार आहे आणि जर आपण त्यातून लवकर पैसे काढायचे ठरविले तर आपल्याला सरेंडर मूल्यच मिळेल. अर्थात, हे तुम्ही कुठला प्लान घेतला आहे त्यावरही अवलंबून असेल.

तर मग माझ्यासाठी कोणता प्लान योग्य आहे हे ठरवण्यासाठी मी काय केले पाहिजे?

त्यासाठी खालील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे :

किती निवृत्ती उत्पन्न मला पुरेसे आहे?

कोणत्याही प्लानचा विचार करण्याआधी आपल्याला हे ठरवावे लागेल की मला किती निवृत्ती उत्पन्नाची गरज आहे. हे आपण निवृत्तीनंतर कशा प्रकारचे आयुष्य जगणे अपेक्षित आहे, तसेच महागाई निर्देशांक काय आहे यावर अवलंबून असेल.

किती कालावधीसाठी मला निवृत्ती योजना घ्यायची आहे?

हे ठरविताना आपण दोन गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. आता माझे वय काय आहे आणि कितव्या वर्षी मला निवृत्त व्हायचे आहे. समजा तुमचे वय ३० वर्षे असेल आणि ६०व्या वर्षी निवृत्त होणार असेल, तर ३० वर्षांसाठी ही योजना घेतली गेली पाहिजे. कारण जर आपण कमी वर्षांसाठी ही योजना घेतली तर मग लवकर पेन्शन मिळेल आणि ती कमी मिळेल.

या निवृत्ती योजनेमुळे मला करामध्ये काही सूट मिळू शकेल काय?

या योजनेमध्ये जी रक्कम मी भरणार आहे त्यावर मला कलम ८० सी अंतर्गत जरी सूट मिळणार असली तरी मी जर आधीच त्या कलमाखाली इतर गुंतवणुकातून सूट मिळवत असेल तर मला याचा फायदा घेता येणार नाही व त्यामुळे मला मिळणारा परतावा दर कमी होईल.

माझ्यासाठी कोणता पेन्शन प्लान सर्वोत्तम आहे?

*  पारंपारिक पेन्शन योजना (एंडोमेंट प्लान्स)– ज्यामध्ये सर्व गुंतवणूक ही जोखीम न घेणारी (conservative) असते, म्हणजे १०० टक्के गुंतवणूक ही स्थिर परतावा देणाऱ्या गुंतवणूक प्रकारांमध्ये (debt) केली जाते. त्यामुळे त्यांच्यावर मिळणारा परतावा हा कमी म्हणजे ६-९% इतकाच असतो.

* युनिट लिंक्ड पेन्शन योजना (युलिप) – या प्रकारच्या योजनांमध्ये लवचीकता असते. तुम्ही ठरवू शकता की मला रोख्यांमध्ये गुंतवणूक करायची आहे की समभागांमध्ये, गुंतवणुकीचे हे प्रमाण किती टक्के असावे, जेणेकरून त्यावर आधीच्या पर्यायापेक्षा चांगला परतावा मिळू शकतो.

पेन्शन योजनेपेक्षा अन्य चांगला पर्याय आहे काय?

खरं तर याचा सर्वात प्रथम विचार केला पाहिजे, पेन्शन योजनेपेक्षा चांगला पर्याय आहे का? म्युच्युअल फंड, शेअर्स, स्थावर मालमत्ता असे काही पर्याय निवडणे शक्य आहे काय?  सोबतच्या कोष्टकात दिलेल्या गुंतवणूक प्रकारांपैकी पहिल्या चार गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूक केल्यास मिळणारा परतावा हा कमी असल्याने, टीव्ही-रेडिओवर सतत येणाऱ्या जाहिरातींना भुलून बरेच जण विमा कंपन्यांनी दिलेल्या पेन्शन योजनेत गुंतवणूक करतात. या पेन्शन योजना ‘आयुष्यभर पेन्शन’ (Guaranteed pension plan) अशी खात्री देतात. पण या लोकांच्या हे लक्षात येत नाही की, या योजनांमध्ये परतावा कमी असतो, करामध्ये फारशी सूट मिळत नाही, शिवाय तरलता नसल्याने पैसे अडकून राहतात आणि सर्वात वाईट म्हणजे या योजनांमध्ये गुंतवलेली दोन-तृतीयांश रक्कम ही परिपक्वतेच्या वेळी ‘अ‍ॅन्युइटी’मध्ये गुंतवावी लागते.

पेन्शन प्लानमध्ये आपण थोडे वर्ष हप्ते भरून रक्कम जमा करतो ज्याला रक्कम जमा करण्याचे दिवस (accumulation phase) असे म्हटले जाते आणि नंतर त्या रकमेमधून एक-तृतीयांश रक्कम ही करमुक्त स्वरूपात आपल्या हातात मिळते आणि उरलेली २/३ रक्कम ही अ‍ॅन्युइटीमध्ये गुंतवली जाते. आणि मग दर महिन्याला पेन्शन स्वरूपात आपल्याला दिली जाते. अ‍ॅन्युइटीचे दर विमा कंपन्या कधीही जाहीर करत नाहीत, कारण ते अतिशय कमी असतात. आपण अ‍ॅन्युइटीवर कर्जदेखील घेऊ  शकत नाही आणि जर आपल्याला नीट माहिती मिळाली नाही तर आपण फसवले गेलो आहोत, अशी भावना आपल्या मनात तयार होते.

माझ्या मते या पेन्शन योजना म्हणजे एक प्रकारचा सापळाच आहेत, त्यामध्ये आपण एकदा अडकलो तर बाहेर येणे मुश्कील आहे आणि जरी जबरदस्तीने बाहेर आलोच तर आपले नुकसानच होणार आहे.

थोडक्यात, या अ‍ॅन्युइटी (Annuity) पर्यायांची खालील वैशिष्टय़े आहेत :

* तुम्ही मरेपर्यंत रोख रक्कम हातात मिळणार नाही (no liquidity). काही पर्यायांमध्ये जर तुम्ही अत्यंत आजारी असलात किंवा अगदीच बिकट आर्थिक परिस्थिती असेल तर पैसे मिळण्याची तरतूद आहे.

* कमी परतावा

* अ‍ॅन्युइटी उत्पन्न करपात्र आहे

* या रकमेवर कर्ज मिळू शकत नाही

*  सेवाकर सुरुवातीच्या गुंतवणुकीवर भरावा लागत असल्याने सर्व रक्कम गुंतवली जात नाही

काही विमा कंपन्या खूप कमी परतावा देतात. कारण ‘आयआरडीआयए’ने दिलेल्या निर्देशानुसार या कंपन्यांना फक्त शून्यापेक्षा जास्त परतावा देण्याची हमी द्यायची आहे. मग नक्कीच आपल्या मनात प्रश्न निर्माण होईल की मी काय केले पाहिजे? यापेक्षा चांगली वैशिष्टय़े असणारे, चांगला परतावा देणारे पर्याय उपलब्ध आहेत का? आणि असतील तर ते कोणते?

नक्कीच आहेत, त्यासाठी मी तुम्हाला बॅलेन्स्ड फंड आणि पद्धतशीर पैसे काढणे योजना (systematic withdrwal plan -SWP) सुचवीन. कोणता फंड घ्यायचा, फंड योजना कसे काम करते हे तुमच्या गुंतवणूक सल्लागाराची मदत घेऊन समजून घ्या.

निवृत्तीपश्चात नियोजनासाठी गुंतवणूक साधने:

भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ)

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (एनएससी)

पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (एमआयएस)

मुदत ठेव (एफडी)

विमा : 

पारंपरिक पेन्शन योजना (एंडोमेंट प्लान)

युनिट लिंक्ड पेन्शन योजना (युलिप)

स्वाती शेवडे cashevade.swati@gmail.com

(लेखिका सनदी लेखपाल असून त्या पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणूनही कार्यरत होत्या.)

Story img Loader