खरे तर ब्ल्यू स्टार या नावाशी बहुतेक गुंतवणूकदार परिचित असतील. सुमारे ७३ वर्षांपूर्वी म्हणजे १९४३ मध्ये मोहन अडवाणी यांनी आपल्या केवळ दोन साथीदारांसह सुरू केलेली ब्ल्यू स्टार इंजिनीअरिंग कंपनी आज ३५०० कोटी रुपयांहून जास्त उलाढाल असलेली भारतातील एअर कंडिशन आणि रेफ्रि जरेशन क्षेत्रातील सर्वात मोठी आघाडीची कंपनी झालेली आहे. भारतात ३५ कार्यालये, पाच कारखाने आणि २३०० कर्मचारी असलेल्या ब्ल्यू स्टारचे २२० डीलर्सचे नेटवर्क आहे. कॉर्पोरेट जगतासाठी एअर कंडिशनिंग, एअर कूलर्स, रेफ्रिजरेशन, शीतगृहे, एअर प्यूरीफायर, वॉटर प्यूरिफायर आणि वॉटर कूलर तसेच इतर इंजिनीरिंग सेवा पुरवणारी ही कंपनी रिटेल क्षेत्रातही या सेवा पुरवते. आफ्रिका, आखाती देश, सार्क देश आणि आशिया खंडातील अनेक देशांत आपली उत्पादने निर्यात करणाऱ्या ब्ल्यू स्टारची कार्यालये परदेशातही आहेत. आपल्या उत्पादनाची गुणवत्ता राखण्यासाठी कंपनीने अमेरिकेतील अमेर्सोन, एरोफ्लेक्स, जपानची हिताची आणि कित्झ, डेन्मार्कची डॅन्फोस आणि जर्मनीच्या बिट्झर अशा आघाडीच्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी तांत्रिक करार केले आहेत. सप्टेंबर २०१६ अखेर संपलेल्या तिमाहीचे निकाल जाहीर झाले असून कंपनीने गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत उलाढालीत २३ टक्के वाढ नोंदवून ती ११६०.६ कोटींवर गेली आहे, तर नक्त नफ्यात १८ टक्के वाढ होऊन तो ५३ कोटींवर गेला आहे. सध्या शेअर बाजारातील पडझडीत अनेक चांगल्या कंपन्यांचे शेअर आपल्या आवाक्यात येऊ शकतात, त्यातलाच ब्ल्यू स्टार एक आहे. चलन तुटवडय़ामुळे विपरीत परिणाम होणाऱ्या कंपन्यांमध्ये ब्ल्यू स्टारचा समावेश होऊ शकतो. त्यामुळे हा शेअर ४२५ च्या आसपास आला तर जरूर खरेदी करावा. येत्या वर्षभरात २५ टक्के परतावा नक्की मिळू शकेल.
सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) प्रस्तुत सदरात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती एक टक्क्य़ांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कु ठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. या सदरातून वर्षभरात सुचविलेल्या कंपन्यांचा आढावा दर तिमाहीस प्रसिद्ध करण्यात येतो.
अजय वाळिंबे – stocksandwealth@gmail.com