कॅनरा रोबेको इमर्जिग इक्विटीज् फंड
संदर्भ निर्देशांकाहून अधिक परतावा (‘अल्फा’) मिळवायचा असेल तर ‘कॅनरा रोबेको इमर्जिग इक्विटीज्’सारखा फंड गुंतवणुकीत असणे गरजेचे असते. तरुणांनी आपल्या गुंतवणुकीत २५ टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या गुंतवणुकीत निदान पाच टक्के समावेश करावा असा आजचा फंड आहे..
मागील आठवडय़ात म्युच्युअल फंड गुंतवणुकीचा ओघ शहरांकडून खेडय़ाकडे वळल्याचे दिसून आले. सेबीने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार म्युच्युअल फंड गुंतवणुकीत आघाडीच्या १५ शहरांव्यतिरिक्त अन्य भारताचा वाटा २.१५ लाख कोटींच्या पलीकडे गेल्याचे दिसून आले. ज्या देशात सोने व मुदत ठेवी ही सर्वाधिक पसंतीची गुंतवणूक साधने असल्यामुळे गुंतवणूकदारांना अर्थसाक्षर करणे आवश्यक आहे. सेबी व म्युच्युअल फंड घराणी यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे मुंबई-पुण्यापलीकडे ‘सिप’ या संकल्पनेचा प्रसार व प्रचार झाल्याचे वरील आकडेवारी दर्शविते. अर्थव्यवस्था विकसित होत असते तेव्हा महागाई व व्याजदर दोन्ही कमी होत होतात. अशा वेळी निवृत्तीपश्चात उदरनिर्वाहासाठी मुदत ठेवी व विमा योजना एक आकडय़ातील परतावा देतात. पारंपरिक गुंतवणूक साधनांपेक्षा दोन आकडय़ांतील परतावा देणारी समभाग गुंतवणूक तरुण वयात आत्मसात करणे गरजेचे आहे. तरुण वयात ‘सिप’मार्फत केलेली गुंतवणूक ही उतारवयात भक्कम समृद्धी देते. तरुण वयात जोखीम स्वीकारण्याची क्षमता अधिक असल्याने या स्तंभात सुचविलेल्या चार मिड कॅप फंडांच्या मालिकेतील हा शेवटचा मिड कॅप फंड. ‘लोकसत्ता अर्थसल्ला’ या जुलै महिन्यात झालेल्या कार्यक्रमात उपस्थितांकडून सर्वाधिक विचारणा या फंडाबद्दल झाली. या फंडाचा समावेश ‘लोकसत्ताकर्ते म्युच्युअल फंड’मध्ये असला तरी सर्वाधिक विचारणा झाल्याने या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक (लक्षार्थाने वक्त्यांचे बोलविते धनी) सुनील वालावलकर यांनी या फंडावर लिहिण्याची सूचना केली. एक चांगला फंड लिहिण्यास सुचविल्याबद्दल त्यांचे आभार.
कॅनरा रोबेको इमर्जिग इक्विटीज फंड. या फंडात तीन वर्षांपूर्वी (२९ ऑगस्ट २०१३) गुंतविलेल्या एक लाखाचे २४ ऑगस्टच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार ३,१५,८१४ रुपये झाले आहेत. वार्षिक परताव्याचा दर ४६.९२ टक्के आहे, तर फंडाला सुरुवात झाली त्या दिवशी म्हणजे ११ मार्च २००५ या दिवशी गुंतविलेल्या १ लाखाचे २४ ऑगस्टच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार ६,९०,००० झाले असून वार्षिक परताव्याचा दर १८.२८ टक्के आहे. संदर्भ निर्देशांकाहून अधिक परतावा (‘अल्फा’) मिळवायचा असेल तर कॅनरा रोबेकोसारखे फंड गुंतवणुकीत असणे गरजेचे असते. तरुणांनी आपल्या गुंतवणुकीत २५ टक्के, तर ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या गुंतवणुकीत निदान पाच टक्के समावेश करावा असा आजचा फंड आहे. २९ ऑगस्ट २०१३ रोजी ‘सीएनएक्स मिडकॅप १००’ हा निर्देशांक ६,५५० होता. २४ ऑगस्ट २०१६ रोजी निर्देशांक १५१६१ होता. म्हणजे तीन वर्षांत निर्देशांकात दुप्पट वाढ झाली, परंतु फंडातील गुंतवणूक तिपटीपेक्षा अधिक वाढ झाली आहे. २००९ पासून म्हणजे मागील २५ तिमाहीत मिडकॅप फंड गटात परताव्याच्या क्रमवारीत आपले स्थान अबाधित राखणारा हा फंड आहे. मागील १० वर्षांचा ‘बीटा’ ०.८९ असला तरी मागील तीन वर्षांचा या फंडाचा ‘बीटा’ १.२८ असल्याने तेजीत निर्देशांकाहून अधिक परतावा देणारा व मंदीत निर्देशांकाहून अधिक घसरण नोंद करणारा हा फंड आहे.
रवी गोपालकृष्णन व कार्तिक मेहता (११ ऑगस्ट २०१६) पासून हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. चार-पाच वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करून भांडवली वृद्धी करण्यात रवी गोपालकृष्णन व या फंडाचे माजी निधी व्यवस्थापक कृष्णा संघवी यशस्वी झाले आहेत. आर्थिक सेवा व बँकिंग, अभियांत्रिकी, रसायने, सिमेंट व औषध निर्माण या उद्योग क्षेत्रांना निधी व्यवस्थापकांनी गुंतवणुकीसाठी पसंती दिली आहे. गुंतवणूक असलेल्या पहिल्या पाच समभागांपैकी इंडसइंड बँक, इंडियन ऑइल, येस बँक हे समभाग रोकडसुलभ असल्याने एखाद्या मोठय़ा गुंतवणूकदाराने फंडातून पैसे काढून घेतल्याचा परिणाम एनएव्हीवर कमीत कमी होईल. फंडाच्या गुंतवणुकीत मागील दोन ते तीन वर्षांपासून असलेल्या फिनोलेक्स इंडस्ट्रीज, अतुल, अरविंद, भारत फोर्जसारख्या समभागांनी फंडाच्या परताव्यात चोख कामगिरी बजावून आपली निवड सार्थ ठरविली आहे. त्याचबरोबर ब्रिटानिया, येस बँक हे समभाग अंशत:, तर नवनीत एज्युकेशन, हॅथवे केबल्ससारखे समभाग पूर्णपणे विकून नफा कमावला आहे. पहिले पाच समभाग एकूण गुंतवणुकीच्या १३ टक्के, तर पहिले दहा समभाग २३ टक्के असल्याने हा फंड समभागकेंद्रित जोखीम स्वीकारणाराही नसल्याचे दिसून येते. हा फंड मिड कॅप समभागात गुंतवणूक करणारा असल्याने बाजाराच्या चढ-उतारामुळे एनएव्ही कमीअधिक होण्याचा धोका जास्त आहे. फंडाचे वार्षिक प्रमाणित विचलन तीन ते दहा वर्षे कालावधीत २२ ते ३० टक्क्यांदरम्यान आहे, तर फंडाचा शार्प रेशो अन्य मिड कॅप फंडाच्या तुलनेत अधिक असल्याने अन्य मिड कॅप फंडापेक्षा हा फंड उजवा ठरतो.
या फंडाने मागील १० वर्षांत अव्वल परतावा दिला असून गत पाच वर्षांचा परतावा अधिक परिपक्व आहे. २५०० रुपयांची ‘सिप’ ३० वर्षे केल्यास व १२.५ टक्के परताव्याचा दर गृहीत धरल्यास हा फंड १.०४ कोटी रुपये, २५ वर्षे ‘सिप’ केल्यास ५४ लाख रुपये जमा करू शकेल. परताव्याचा दर १५ टक्के गृहीत धरल्यास व २५ वर्षे ‘सिप’ केल्यास केल्यास हा फंड ७.५ लाखांच्या गुंतवणुकीवर ८२ लाख रुपयांची निर्मिती व ३० वर्षे ‘सिप’ केल्यास १.७५ कोटी रुपयांचा कोश हा फंड निर्माण करू शकेल. सध्या प्रमुख निर्देशांकाची पातळी खूपच वरच्या पातळीवर असल्याने एकाच वेळी मोठी रक्कम गुंतवणूक करण्यात धोका असला तरी २५ ते ३० वर्षे ‘सिप’ केल्यास हा फंड मोठी वाटणारी वित्तीय उद्दिष्टेसुद्धा सुलभ करू शकतो. म्हणून लहान रकमेची, परंतु दीर्घ कालावधीची ‘सिप’ गुंतवणूकदारांनी करणे गरजेचे आहे. वॉरेन बफे यांच्या The stock market is a device for transferring money from the impatient to the patient या वाक्याचा विसर न होऊ देणे हे मिड कॅप गुंतवणूकदारांच्या हिताचे आहे.
shreeyachebaba@gmail.com
(अस्वीकृती: लेखात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)