कॅनरा रोबेको इन्फ्रास्ट्रक्चर फंड

सेक्टोरल फंड गुंतवणुकीचा एक भाग असावे की नसावे, याबाबत मतमतांतरे असण्याची शक्यता आहे. सेक्टोरल फंडांनी गुंतवणुकीचा किती हिस्सा व्यापावा हे गुंतवणूकदाराच्या जोखीम स्वीकारण्याच्या क्षमतेवर ठरते. सध्याच्या सरकारची प्राथमिकता रस्ते महामार्ग बांधायला असून भूपृष्ठ परिवहन क्षेत्रात पायाभूत सुविधा विकसित करण्यावर सरकारचा भर आहे. या सर्व प्रकल्पांना गती देण्याचे काम या अर्थसंकल्पात असेल. या पाश्र्वभूमीवर गुंतवणूकदार या फंडात आपल्या गुंतवणुकीचा १० ते १५ टक्के हिस्सा गुंतविण्याचा विचार करू शकतात..

‘कुठल्या पाऊलवाटेचा पुढे हमरस्ता होईल हे प्रवासाच्या सुरुवातीला सांगता येत नाही..’ असे वपुंचे एक छान वाक्य आहे. परंतु हमरस्त्यांना महामार्गाचे स्वरूप प्राप्त होत व नदीपात्रातून जलवाहतूक करण्याची तयारी सुरू असताना नवीन बंदरे विकसित होत असताना नेमक्या कुठल्या फंडात गुंतवणूक करणे हे गुंतवणूकदाराच्या हिताचे आहे हे अभ्यासाने सहज सांगता येईल. बंदरे, विमानतळ, नवीन रेल्वेमार्ग, महामार्गाचे जाळे यांसारख्या दळणवळणाच्या सुविधा विकसित करण्यावर भर देणाऱ्या सरकारच्या काळात इन्फ्रास्ट्रक्चर फंड हे अर्थसंकल्पाचे संभाव्य लाभार्थी असतील हे सांगण्यासाठी थोडासा अभ्यासदेखील पुरेसा आहे.

साधारण २००५-२००६ दरम्यान भारतीय म्युच्युअल फंड उद्योगात इन्फ्रास्ट्रक्चर फंड बाजारात यायला सुरुवात झाली. २०१० पासून विश्लेषक इन्फ्रास्ट्रक्चर फंडांचा अभ्यास करू लागले. परताव्याच्या दरात सातत्य राखत असल्याने कॅनरा रोबेको इन्फ्रास्ट्रक्चर फंड हा यादीत आघाडीचे स्थान टिकवून आहे. फेब्रुवारी २०१६ मध्येही अर्थसंकल्पाचा संभाव्य लाभार्थी म्हणून कॅनरा रोबेको इन्फ्रास्ट्रक्चर फंडाची शिफारस केली होती. २ डिसेंबर २००५ रोजी पहिली एनएव्ही जाहीर झालेल्या फंडाने १२ वर्षे पूर्ण केली असून या फंडाच्या पहिल्या ‘एनएव्ही’ने एक लाखाची गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराचे २७ जानेवारीच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’नुसार ४.१६ लाख झाले आहेत.

arth07

इन्फ्रास्ट्रक्चर फंडांच्या मागील १० वर्षांची कामगिरी सोबतच्या आलेखात दाखविली आहे. इन्फ्रास्ट्रक्चर फंड गटात सर्वात अव्वल कॅनरा रोबेको इन्फ्रास्ट्रक्चर फंडाने केली असून स्थापनेपासून १३.५८ टक्के परतावा दिलेला असून सर्वात गचाळ कामगिरी इन्व्हेस्को इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फंडाची (स्थापनेपासून ३.८५ टक्के परतावा) आहे. गमतीचा भाग असा की, कॅनरा रोबेको फंडाची जाहिरात अपवादाने बघायला मिळते, तर ठाण्याच्या तीन हात नाक्यापासून ते पश्चिम द्रुतगती मार्गावरील जोगेश्वरी- विक्रोळी जोडरस्त्याच्या पुलापर्यंत मुंबईत ठिकठिकाणी इन्व्हेस्को इंडियाचे जाहिरात फलक लक्ष वेधून घेण्याचे काम करतात. मागील तीन वर्षांत इन्फ्रास्ट्रक्चर फंडांची अव्वल कामगिरीची पाश्र्वभूमीवर असणाऱ्या फंडाऐवजी अशा गचाळ कामगिरीच्या फंडांना जाहिरातबाजी करावी लागली तर नवलाचे नाही. केंद्रात सत्तापालट झाल्यापासून म्हणजे १८ मे २०१४ पासूनचा धांडोळा घेतला तर इन्फ्रास्ट्रक्चर फंड गटात सर्वात अव्वल कॅनरा रोबेको इन्फ्रास्ट्रक्चर फंडाने १५.१८ टक्के दराने वार्षिक परतावा दिलेला असून सर्वात गचाळ कामगिरी एलआयसी एमएफ इन्फ्रास्ट्रक्चर फंडाची (वार्षिक परतावा ५.१८ टक्के) आहे. येत्या बुधवारी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री पायाभूत सुविधा क्षेत्रासाठी भरघोस तरतूद करतील या विश्वासाने मागील वर्षांप्रमाणे यावर्षीसुद्धा अर्थसंकल्पाचा लाभार्थी म्हणून कॅनरा रोबेको इन्फ्रास्ट्रक्चर फंडाची शिफारस करीत आहे.

जानेवारी ते डिसेंबर २०१६ या काळात अनेक घटना घडल्या. जसे की चीनने आपल्या चलनाचे अवमूल्यन केले, ब्रेग्झिट, अमेरिकेत झालेले सत्तापरिवर्तन व शेवटी निश्चलनीकरण या सर्वाचा परिणाम फंडाच्या परताव्यावर झाला. फंडाच्या निधी व्यवस्थापकांनी फंडाच्या गुंतवणुकीत योग्य ते बदलदेखील केले. फंडाच्या विद्यमान गुंतवणुकीत सर्वाधिक गुंतवणूक तेल व वायू क्षेत्रात असून त्या खालोखाल अभियांत्रिकी उद्योग, सिमेंट, सेवा, (जसे की कॉन्कॉर, ब्ल्यू डार्ट, टीसीआय इत्यादी) पॉवरग्रीड इत्यादी क्षेत्रांत गुंतवणूक केली आहे. मागील वर्षभरात गुंतवणुकीत नोंद घेण्याजोगा झालेला बदल म्हणजे फंडाने अलीकडेच आपल्या गुंतवणुकीत आयडीएफसीचा केलेला समावेश. या फंडाची शिफारस करण्याचे आणखी एक कारण म्हणजे अन्य इन्फ्रास्ट्रक्चर फंडात ‘इन्फ्रास्ट्रक्चर’च्या नावाखाली कुठल्याही उद्योगातील समभागांचा समावेश या फंडाच्या गुंतवणुकीत नाही. उदाहरणार्थ, अन्न व पेयनिर्मितीत असणाऱ्या व व्होल्टाससारख्या कंपनीचा समावेश इन्व्हेस्को इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फंडात आहे. एलआयसी इन्फ्रास्ट्रक्चर फंडाच्या गुंतवणुकीत ३३ टक्के बँकांचा समावेश आहे. गुंतवणुकीचा परीघ विस्तारण्याने गुंतवणुकीवरील परतावा वाढत नसतो. कावेरी सीड्ससारख्या इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्राशी दुरान्वये संबंध नसलेल्या कंपनीचा समावेश करणे हे फंडाच्या मूळ उद्दिष्टापासून दूर जात गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासारखे आहे. अन्य इन्फ्रास्ट्रक्चर फंड घसघशीत परतावा देत असताना या फंडांची कामगिरी कमालीची खालावलेली आहे. कॅनरा रोबेको इन्फ्रास्ट्रक्चर फंडाच्या गुंतवणुकीत मागील एका वर्षांच्या तुलनेत रोकड १२ टक्क्य़ांवरून ३.४४ टक्केइतके कमी केल्याचा फायदा फंडाला मिळाला आहे.

मागील वर्षी सरकारने पायाभूत सुविधांसाठी १.१९ लाख कोटींची तरतूद केली होती. यावर्षी रेल्वेसाठीच्या तरतुदी सरकार या अर्थसंकल्पातून करणार आहे. रेल्वे व पायाभूत सुविधांसाठी मिळून २.५ ते ३ लाख कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात होणे अपेक्षित आहेत. यासाठी फंडाच्या निधी व्यवस्थापकांनी अशोका बिल्डकॉन, सिम्प्लेक्स इन्फ्रो, अहलुवालिया कन्स्ट्रक्शन, टॅक्समॅको यासारख्या समभागांचा अंतर्भाव आपल्या गुंतवणुकीत केला आहे. मेक इन इंडियाची लाभार्थी असलेल्या भारत फोर्ज, टीमकेन इंडिया यासारख्या कंपन्या गुंतवणुकीत आहेत. परताव्याच्या दरात सातत्य राखल्याने कॅनरा रोबेको इन्फ्रास्ट्रक्चर फंडाला व्हॅल्यू रिसर्चने ‘फाइव्ह स्टार’, तर क्रिसिलने ‘सीआरपी-१’ हे रेटिंग दिले आहे. तीन वर्षे, पाच वर्षे आणि दहा वर्षे या कालखंडात कॅनरा रोबेको इन्फ्रास्ट्रक्चर फंडाने आपले स्थान पहिल्या तीन क्रमांकांत अबाधित राखले आहे.

सेक्टोरल फंड गुंतवणुकीचा एक भाग असावे की नसावे, याबाबत मतमतांतरे असण्याची शक्यता आहेत. सेक्टोरल फंडांनी गुंतवणुकीचा किती हिस्सा व्यापावा हे गुंतवणूकदाराच्या जोखीम स्वीकारण्याच्या क्षमतेवर ठरते. सध्याच्या सरकारची प्राथमिकता रस्ते महामार्ग बांधायला असून भूपृष्ठ परिवहन क्षेत्रात पायाभूत सुविधा विकसित करण्यावर सरकारचा भर आहे. रस्त्याच्या बरोबरच नदी परिवहन आणि सागरमाला प्रकल्पांतर्गत लहान क्षमतेची बंदरे विकसित करण्याला सरकारची प्राथमिकता आहे. हा सरकारचा तिसरा अर्थसंकल्प असल्याने या सर्व प्रकल्पांना गती देण्याचे काम या अर्थसंकल्पात असेल. या पाश्र्वभूमीवर गुंतवणूकदार या फंडात आपल्या गुंतवणुकीचा १० ते १५ टक्के हिस्सा गुंतविण्याचा विचार करू शकतात.