सुमारे २५ वर्षांपूर्वी म्हणजे १९९१ मध्ये स्थापन झालेली कंट्रोल प्रिंट ही भारतातील कोडिंग आणि मार्किंगचे उत्पादन करणारी किंवा या अनोख्या क्षेत्रात कार्यरत असलेली पहिलीच कंपनी असेल. आज कुठल्याही वस्तूच्या वेष्टनावर त्या वस्तूची कायद्यानुसार संपूर्ण माहिती तसेच कोड छापणे आवश्यक असते. ही छपाई तसेच या छपाईच्या सामग्रीचे उत्पादन आणि वितरण कंट्रोल प्रिंट करते. यात प्रामुख्याने इंक जेट प्रिंटर, थर्मल इंक जेट प्रिंटर, हॉट रोल कोडर, लेजर प्रिंटर, थर्मल ट्रान्स्फर प्रिंटर इ.चा समावेश होतो. उत्तम गुणवत्तेसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आवश्यक असते. कंपनीने याकरिता केबीए मेट्रोनिक या जर्मन तर मकसा या स्पॅनिश कंपनीचे तांत्रिक साहाय्य घेतले आहे. या दोन्ही बहुराष्ट्रीय कंपन्या प्रिंटिंग, कोडिंग तसेच लेजर तंत्रज्ञानातील आघाडीच्या कंपन्या मानल्या जातात. गेल्या पंचवीस वर्षांत कंपनीने भारतात सहा कार्यालये उघडली असून कंपनीचे वसई आणि हिमाचल प्रदेशमध्ये उत्पादन केंद्रे आहेत. नुकतेच २:१ प्रमाणात बक्षीस समभाग देणाऱ्या कंट्रोल प्रिंटचे आर्थिक निकाल अपेक्षेप्रमाणे असून कंपनीने २०१६ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांसाठी १३३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर २६.५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या आर्थिक वर्षांच्या तुलनेत तो ४३ टक्क्य़ांनी जास्त आहे. गेली पाच वर्षे सातत्याने उत्तम कामगिरी करून दाखवणाऱ्या कंट्रोल प्रिंटचा शेअर सध्या २७० रुपयांच्या आसपास उपलब्ध आहे. मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी दोन-तीन वर्षांच्या कालावधीसाठी ही एक उत्तम गुंतवणूक ठरू शकेल.
stocksandwealth@gmail.com
सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) लेखात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Company profile for control print ltd
Show comments