जुलै १९७८मध्ये खेमका उद्योग समूहाने अमेरिकेतील बँडाग या जगप्रसिद्ध कंपनीच्या सहकार्याने इंडॅग रबर या कंपनीची स्थापना करून रबर र्रिटीडिंगचा (जुन्या टायरचे रिसायकलिंग, रिमोल्डिंग) व्यवसाय सुरू केला. १९८४ मध्ये कंपनी मुंबई शेअर बाजारात सूचिबद्ध झाल्यावर २००६ मध्ये खेमका कुटुंबाने बँडागची युती संपवून त्यांचा भागभांडवलातील ३८.३% हिस्सा विकत घेतला.
सध्या इंडॅग रबर हिमाचल प्रदेश येथील नलागढ येथून ट्रेड रबर, रबर सीमेंट, रबर एन्व्होलोप आणि रबर स्ट्रिप गमचे उत्पादन करते. कंपनीचा दुसरा उत्पादन प्रकल्प राजस्थानात भिवंडी येथे आहे. आफ्रिका, मलेशिया, इंडोनेशिया तसेच सार्क व आखाती देशांत आपली उत्पादने निर्यात करणाऱ्या या कंपनीची विपणन व्यवस्था उत्तम असून आपल्या गुणवत्तेच्या जोरावर कंपनीने गेल्या २० वर्षांत आघाडीचे स्थान पटकावले आहे.
केवळ ५.२५ कोटीचे भागभांडवल असलेल्या या कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांसाठी २५२.८९ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३०.४१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. दोन वर्षांपूर्वी परदेशांत ‘झोमा’ ब्रॅण्ड प्रस्तुत केल्यानंतर गेल्याच वर्षी आपल्या उत्तम माइलेजसाठी प्रसिद्ध असलेल्या इंडॅगने भारतात ‘मॅक्स माइल’ हा नवीन ब्रॅण्ड भारतात सादर केला. यंदाच्या वर्षांत कंपनी आपली उत्पादन क्षमता १३,८०० मेट्रिक टन वरून २०,००० मेट्रिक टनांपर्यंत वाढवत आहे.
भारतभरात कंपनीचे २५ डेपो असून सुमारे १५० डीलर्स आहेत. याखेरीज कंपनीने ५००-६०० र्रिटेडर्स फ्रँचाइज तयार केले आहेत. त्यामुळे कंपनीची विपणन व्यवस्था भक्कम आहे. सध्या १८०च्या आसपास असलेली आणि कुठलेही कर्ज नसलेली ही स्मॉल कॅप कंपनी एक चांगली मध्यमकालीन गुंतवणूक ठरू शकते.
९ ऑगस्टला कंपनी आपले पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करेल. तो निकाल तपासून निर्णय घेणे योग्य ठरेल.
सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) लेखात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
अजय वाळिंबे stocksandwealth@gmail.com
माझा पोर्टफोलियो : उत्पादन गुणवत्ता आणि अनुभवी व्यवस्थापनाचे मोल
९ ऑगस्टला कंपनी आपले पहिल्या तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करेल.
Written by अजय वाळिंबे
First published on: 08-08-2016 at 01:03 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Company profile for indag rubber ltd