वर्ष १९७९ मध्ये स्थापन झालेली मिर्झा इंटरनॅशनल ही चामडे कमावणारी तसेच पादत्राणे उत्पादन करणारी भारतातील एक आघाडीची कंपनी आहे. गुणवत्ता, उत्कृष्ट कारागिरी आणि वैविध्यपूर्ण डिझाइन्स यामुळे मिर्झा इंटरनॅशनल आज खऱ्या अर्थाने ग्लोबल कंपनी झाली आहे. ३० पेक्षा अधिक देशांत आपले पाय रोवणाऱ्या या कंपनीने इंग्लंडमधील बाजारपेठेत २५ टक्के हिस्सा काबीज केला आहे. कंपनीच्या एकूण उलाढालींपैकी सुमारे ७५ टक्के उत्पन्न परदेशातील विक्रीचे आहे. परदेशात ब्रिटन, जर्मनी, फ्रान्स आणि अमेरिका या देशांत कंपनीची मुख्य बाजारपेठ आहे. ‘रेड टेप’ आणि ‘ओक ट्रॅक’ हे कंपनीचे प्रमुख प्रीमियम ब्रॅण्ड असून त्यांना देशात तसेच परदेशातही चांगली मागणी आहे.
पादत्राणांची भारतातील बाजारपेठ मोठी असून प्रगत देशांच्या तुलनेत मात्र अजूनही कमीच आहे. येत्या काही वर्षांत इतर प्रगत देशांप्रमाणेच भारतातही मागणी वाढेल असा अंदाज आहे. आगामी आर्थिक वर्षांत जीएसटी लागू झाल्यास त्याचा कंपनीला फायदाच होईल. नुकत्याच जाहीर झालेल्या आर्थिक निकालानुसार कंपनीने सप्टेंबरअखेर संपलेल्या तिमाहीसाठी २५०.२६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १६.३५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. सध्या कंपनीची भारतातील ३० शहरांत ११० ब्रॅण्ड शॉप्स आहेत.
गेल्या वर्षी जेनेसिस फू टवेअर ही कंपनी ताब्यात घेतल्याने तसेच कंपनीने ऑनलाइन विक्रीवर दिलेला भर या सर्वाचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या कामकाजावर होईल अशी आशा आहे. मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी मिर्झा इंटरनॅशनल योग्य गुंतवणूक ठरू शकेल.
सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) प्रस्तुत सदरात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती एक टक्क्य़ांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कु ठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. या सदरातून वर्षभरात सुचविलेल्या कंपन्यांचा आढावा दर तिमाहीस प्रसिद्ध करण्यात येतो.
अजय वाळिंबे stocksandwealth@gmail.com