प्रीकॉल म्हणजे पूर्वाश्रमीची प्रीमिअर इण्स्ट्रमेंट्स कंपनी. १९७४ मध्ये कोइम्बतूर येथून उत्पादनाला सुरुवात करणाऱ्या प्रीकॉलचे भारतात चार कारखाने असून परदेशातही जकार्ता आणि दक्षिण अमेरिकेत साओ पाओलो येथे दोन उत्पादन केंद्रे आहेत. तसेच अमेरिका, लंडन, जपान, सिंगापूर येथे कंपनीची आंतरराष्ट्रीय कार्यालये आहेत. दुचाकी, तीन चाकी आणि इतर सर्व प्रकारच्या वाहनांसाठी विविध उत्पादने करणाऱ्या प्रीकॉलची वार्षिक उलाढाल आता ११०० कोटींवर गेली आहे. गेल्या आर्थिक वर्षांत म्हणजे २०१४-१५ च्या आर्थिक वर्षांसाठी मंदीची झळ बसल्याने कंपनीला तोटा झाला होता. मात्र यंदाच्या आर्थिक वर्षांत म्हणजे मार्च २०१६ साठी संपलेल्या आर्थिक वर्षांसाठी कंपनीने १०८०.५० कोटी रुपयांच्या उलाढालीवर ५०.१ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही कामगिरी खूपच सरस आहे. येत्या तीन वर्षांत हे चित्र अजूनही पालटेल अशी व्यवस्थापनाला आशा आहे. याचे मुख्य कारण म्हणजे सध्या वाहन क्षेत्रापेक्षा त्याला पूरक उद्योगाची वाढ सरासरी वार्षिक १४% आहे. २०२०-२१ पर्यंत ती अजूनही वाढेल. तसेच भारताच्या ढोबळ उत्पन्नात सुमारे ७% वाटा असलेला हा उद्योग येत्या चार वर्षांत आपला वाटा १०% वर नेईल. तसेच कंपनीच्या उत्पादनांना निर्यातीसाठीही भरपूर वाव आहे. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर आज प्रीकॉलकडे जवळपास सर्वच प्रकारच्या म्हणजे दुचाकी ते ट्रॅक्टपर्यंत वाहनांकडून मागणी आहे. कंपनीच्या एकूण उलाढालीपैकी निम्म्याहून अधिक उत्पन्न दुचाकी उद्योगाकडून असले तरीही कंपनी इतरही म्हणजे उदा. ड्रायव्हर इन्फर्मेशन सिस्टीम, फ्लीट व्यवस्थापन, सेन्सर्स, पंप्स, टेलीमॅटिक्स अशी अनेक उत्पादने तयार करते. चार कारखाने, उत्तम विपणन तसेच अनुभवी व्यवस्थापन यामुळे यंदाच्या आर्थिक वर्षांत कंपनी उत्तम कामगिरी करून दाखवेल अशी आशा आहे. सध्या ५२ आठवडय़ांच्या उच्चांकावर असलेला हा शेअर मध्यमकालीन गुंतवणुकीस योग्य वाटतो.
अजय वाळिंबे stocksandwealth@gmail.com

सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) लेखात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

Story img Loader