कच्च्या मालाच्या किमतीत घट आणि देशांतर्गत मागणीतील वाढ अशा दुहेरी फायद्याने वाहन उद्योगाला येऊ घातलेले बरे दिवस पाहता, उत्पादनांच्या आधुनिकता आणि गुणवत्तेसाठी देशविदेशातील अनेक कंपन्यांबरोबर तांत्रिक सहकार्य असणाऱ्या आणि उत्कृष्ट आर्थिक कामगिरीत सातत्य राखणाऱ्या या कंपनीचा गुंतवणुकीसाठी विचार हवाच..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शारदा मोटर इंडस्ट्रीज ही रेलन समूहाच्या एन. डी. रेलन यांनी स्थापन केलेली कंपनी. याच समूहाची भारत सीट्स ही दुसरी वाहन उद्योगातील कंपनीदेखील शेअर बाजारात सूचिबद्ध आहे. शारदा मोटर ही प्रामुख्याने चारचाकी तसेच दुचाकी वाहनांसाठी एक्झॉस्ट सिस्टम, सस्पेंशन, कॅटलिटिक कन्व्हर्टर, सीट फ्रे म्स, सीट कव्हर इ.चे उत्पादन करते. याखेरीज कंपनी एअर कंडिशनर असेम्ब्ली तसेच त्याला लागणारे प्लास्टिकच्या सुटय़ा भागांचे उत्पादन करते. कंपनीचे एकंदर १३ कारखाने असून ती भारतातील सध्याची एक आघाडीची कंपनी मानली जाते. कंपनीच्या प्रमुख ग्राहकांमध्ये भारतातील बहुतांश मोठय़ा वाहन कंपन्या आणि वातानुकूलन यंत्रणा बसवणाऱ्या कंपन्या उदा. टाटा मोटर्स, महिंद्र, ह्य़ुंदाई, पॅनासॉनिक, कॅरियर, सॅमसंग, कमिन्स इत्यादींचा समावेश आहे. आधुनिकता आणि गुणवत्तेसाठी कंपनीने बेल्जियमच्या बोसल एनव्ही, ब्रिटनच्या रिकार्दो तसेच कोरियाच्या सेजोंग इंडस्ट्रियल या कंपन्यांशी तांत्रिक सहकाऱ्याचे करार केले आहेत.

गेली काही वर्षे उत्तम कामगिरी करून दाखवणाऱ्या शारदा मोटर्सने यंदाच्या पहिल्या तिमाहीत उत्कृष्ट आर्थिक कामगिरी करून सातत्य राखले आहे. कंपनीने जून २०१६ अखेर समाप्त पहिल्या तिमाहीसाठी उलाढालीत १५ टक्के वाढ नोंदवून ती २४२.८ कोटींवर नेली आहे, तर नक्त नफ्यात गेल्या तिमाहीच्या तुलनेत तब्बल १४४ टक्के वाढ नोंदवून तो १२.७ कोटींवर गेला आहे. येत्या दोन वर्षांत कंपनी आपले कर्ज कमी करेल, अशी आशा आहे. सध्या वाहन उद्योगाला बरे दिवस आले आहेत. तसेच उत्तम प्रवर्तक आणि कामगिरीतील सातत्य यामुळे शारदा मोटर्स मध्यम ते दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करण्यास योग्य वाटतो.

सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) प्रस्तुत सदरात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती एक टक्क्य़ांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कु ठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. या सदरातून वर्षभरात सुचविलेल्या कंपन्यांचा आढावा दर तिमाहीस प्रसिद्ध करण्यात येतो.

अजय वाळिंबे – stocksandwealth@gmail.com