राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारू लागला. ‘राजा सगळ्यांना चकीत करीत ‘नमोंनी’ एका झटक्यात ५०० व १०००च्या नोटा रद्द करीत काळ्या पैशाचे अस्तित्व संपविण्यासाठी लढाईचे रणशिंग फुंकले. या घटनेतून सामान्य लोकांनी काय धडा घ्यावा असे तुला वाटते?’ या प्रश्नाचे उत्तर जर तू सांगितले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’ वेताळाने राजाला सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘काळ्या पैशाच्या रूपात असलेली समांतर अर्थव्यवस्था कुणाही राज्यकर्त्यांला खुपत असते. या समांतर अर्थव्यवस्थेमुळे राज्यकर्त्यांकडे असलेल्या धोरणांची धार बोथट होते. भारतात एका अंदाजानुसार सहा लाख कोटींची समांतर अर्थव्यवस्था आहे. एकाच वेळी ही अर्थव्यवस्था संपुष्टात आणणे शक्य नसले तरी भविष्यात ही अर्थव्यवस्था वेगाने फोफावणार नाही हे पाहणे आवश्यक होते. सरकारने या दृष्टीने काळे धन असलेल्या करदात्यांना दंड भरून हे धन कायदेशीर रूपात बाळगण्याची एक संधी दिली होती. अनेकांच्या मते या योजनेचा सरकारला अपेक्षित इतका परिणाम दिसला नाही. ३० सप्टेंबपर्यंत मुदत असलेल्या योजनेतून सरकारला ४,००० कोटींचा अतिरिक्त कर जरी मिळाला तरी समांतर अर्थव्यवस्थेची व्याप्ती पाहता सरकारला यापेक्षा किती तरी अधिक कर संकलन होणे अपेक्षित होते,’ राजा म्हणाला.

‘विद्यमान आयकर कायदा ६५ वर्षे जुना असून त्यातील बहुतेक पळवाटा वेळोवेळी अर्थसंकल्पाच्या माध्यमातून बंद करण्यात आल्या आहेत. मोठय़ा रक्कमेच्या मालमत्तांची विक्री, तसेच व्यापारी, व्यावसायिक, डॉक्टर, वकील या पेशातील करदाते, टय़ुशन क्लासेसचे मालक यांचे २०-२५ लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असूनही ४-५ लाख उत्पन्न दाखवितात व शून्य कर असलेले रिटर्न दाखल करतात एक मोठा करदात्याचा वर्ग उत्पन्न असूनही कर भरत नाही हे सरकारच्या ‘इकॉनॉमिक इंटेलिजन्स’ खात्याच्या लक्षात आले होते. हा वर्ग प्रामुख्याने आपले काळे धन मोठय़ा रक्कमेच्या नोटांच्या रूपात साठवत आहे. उद्योजक राजकारणी व्यावसायिक सर्वानाच धक्का देत सरकारने या नोटा चलनातून बाद केल्याने एका अंदाजानुसार १० ते १२ टक्के नोटा बाद झाल्या आहेत. नोटांच्या रूपात काळे धन दडवून ठेवणे महाग पडणार आहे, हा पहिला धडा शिकणे आवश्यक आहे,’ राजा म्हणाला.

‘जगात सर्वाधिक सोन्याचा सोस असलेले अशी भारतीयांची ओळख आहे. दुसरा धडा हा सोने ही सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक असा की समज असलेल्यांनी घ्यायचा आहे. अनेक गुंतवणूकदारांना सोने ही रोकडसुलभ गुंतवणूक वाटते. सरकारने विमुद्राकरण केल्यानंतर रद्दबातल केलेल्या नोटांचे मूल्य अबाधित राखण्यासाठी या मंडळींनी सोन्याकडे मोहरा वळविला. नक्की सोन्याची किती विक्री झाली, हा प्रश्न विवादास्पद असला तरी आधीच्या तारखेला विक्री झाली असे भासवून व्यवहार झाले, हे नक्की. सोन्याच्या मागणीत मोठी वाढ झाली. सोन्याच्या किमती मोठी तेजी आली. परंतु या तेजीचा फायदा सामान्य माणसाला मिळाला नाही. औषधासाठी आपले मंगळसूत्र गहाण ठेवण्याची तयारी असूनही एका पत्नीला शस्त्रक्रिया झालेल्या आपल्या पतीची औषधे खरेदी करता आली नाहीत. सोन्याचा भाव त्या दिवशी ३५-४० हजार रुपये असूनही आपल्याकडील सोने विकायला गेलेल्या ग्राहकाला सराफांनी सोन्याचा खरेदीचा भाव २८ हजार तोळा हाच सांगितला. विकायचा भाव ३५ हजार व विकत घ्यायचा भाव २८ हजार असा अनुभव अनेकांना आला. एखाद्या गुंतवणुकीची रोकड सुलभता ही खरेदी व विक्री यांच्या फरकावर ठरते. त्यामुळे सोने अध्र्या रात्रीही विकता येते असे मानणाऱ्या लोकांनी यापासून धडा घेणे आवश्यक आहे. सरकारचे कर्ज रोखे हे सर्वाधिक रोकडसुलभ असतात. या रोख्यांची उलाढाल रोजची हजार कोटींहून अधिक असून रोख्यांच्या किमतीत मोठा फरक असत नाही. मागील दोन दिवसांच्या अनुभवातून सोने हे रोकडसुलभ नाही व अध्र्या रात्रीच नव्हे तर दिवसाढवळ्यासुद्धा रोकडसुलभ नसते हा दुसरा धडा शिकणे गरजेचे आहे. ज्या मंडळींना आणीबाणी प्रसंगासाठी आपली बचत बाजूला काढायची आहे त्यांनी ही बचत सोन्याच्या रूपात न ठेवता रोखे गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड, बँकांच्या मुदत ठेवी या अभौतिक गुंतवणूक साधनांत ठेवणे हा दुसरा धडा शिकायला हवा.’

‘आर्थिक साधनांपेक्षा स्थावर मालमत्ता, सोने या भौतिक साधनांच्या प्रेमात असलेल्या भारतीयांना ही गोष्ट पटणे अवघडच आहे.’ राजा म्हणाला. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.

gajrachipungi@gmail.com