ग्राहकांच्या मांदियाळीत रिलायन्स, केर्न, ऑइल इंडिया, एस्सार, गेल, पेट्रोनेट एलएनजी, हिंदुस्तान ऑइल, अडानी, सेलन अशा अनेक नामवंत कंपन्यांचा समावेश असलेली व सातत्यपूर्ण कामगिरीसह निरंतर वाढ करणारी ही कंपनी आहे..
वर्ष १९९१ मध्ये स्थापन झालेली दीप इंडस्ट्रीज आज भारतातील तेल आणि वायू क्षेत्रातील आघाडीची ‘वन स्टॉप सोल्यूशन’ कंपनी म्हणून ओळखली जाते. गेली पंचवीस वर्षे कंपनी तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्रासाठी विविध सेवा पुरवते. अशा प्रकारच्या सेवा पुरवणारी दीप इंडस्ट्रीज ही भारतातील एकमेव कंपनी आहे.
नैसर्गिक वायू कॉम्प्रेसर या प्रमुख सेवेखेरीज कंपनी ड्रिलिंग रिग्स, मार्जिनल फिल्ड, गॅस डी-हायड्रेशन, कोल बेड मिथेन अशा विविध महत्त्वाच्या सेवा पुरवते. देशांतर्गत पुरवलेल्या ‘वन स्टॉप’ यशस्वी सेवांमुळे कंपनीला इंडोनेशियामध्ये ऑफशोअर कोल बेड मिथेन ब्लॉकसाठी कंत्राट मिळाले आहे. तसेच ओएनजीसीकडून कंपनीला तीन मार्जिनल फिल्ड गॅस ब्लॉकसाठी सेवा पुरवण्याचे कंत्राट मिळाले आहे. कंपनीच्या ग्राहकांच्या मांदियाळीत रिलायन्स, केर्न, ऑइल इंडिया, एस्सार, गेल, पेट्रोनेट एलएनजी, हिंदुस्तान ऑइल, अडानी, सेलन अशा अनेक नामवंत कंपन्यांचा समावेश असून कंपनी कामगिरीत सातत्य राखून आहे. जून २०१६ अखेर संपलेल्या तिमाहीचे कंपनीचे लेखापरीक्षित निकाल अपेक्षेप्रमाणेच उत्तम असून कंपनीने उलाढालीत १३६ टक्के वाढ साध्य केली असून ती ६४.४ कोटी रुपयांवर गेली आहे. नक्त नफाही ६.७३ कोटी रुपयांवरून १४२ टक्के वाढीने १६.३ कोटी रुपयांवर गेला आहे. वायू आणि तेल क्षेत्रात विविध सेवा पुरवणारी दीप इंडस्ट्रीज ही भारतातील एकमेव कंपनी असून कामगिरीतील सातत्यामुळे दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांनी जरूर विचार करावा.
सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) प्रस्तुत सदरात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती एक टक्क्य़ांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कु ठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. या सदरातून वर्षभरात सुचविलेल्या कंपन्यांचा आढावा दर तिमाहीस प्रसिद्ध करण्यात येतो.
अजय वाळिंबे – stocksandwealth@gmail.com