भांडवली बाजारातील शेअर बाजारानंतरची सर्वात महत्त्वाची पायाभूत सेवा म्हणजे डिपॉझिटरी होय. परंतु डिपॉझिटरीपलिकडे सबंध वित्तीय सेवा क्षेत्राच्या डिजिटल कक्षा रुंदावणाऱ्या सेवा प्रदान करणाऱ्या या कंपनीत मुलाबाळांसाठीच नव्हे तर नातवंडासाठी गुंतवणूक केली जायला हवी.

राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारु लागला. ‘‘राजा ‘सीडीएसएल’ या डिपॉझिटरी सेवा देणाऱ्या कंपनीचा ‘आयपीओ’ १९ जून रोजी खुला होऊन २१ जूनला बंद होणार आहे. गुंतवणूकदरांनी या विक्रीत सहभागी व्हावे काय? या प्रश्नाचे उत्तर तू माहित असून ही दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील.’’ वेताळाने राजाला सांगितले.

‘‘तू आत्ता जे काही बोललास ते अर्ध सत्य आहे. ‘सीडीएसएल’ ही केवळ डिपॉझिटरी सेवा देणारी कंपनी नसून ‘सीडीएसएल’ अन्य अनेक व्यवसायात आहे. ‘सीडीएसएल’च्या महसुलापैकी आज जरी मोठा हिस्सा डिपॉझिटरी व्यवसायातून येत असला तरी भविष्यात जसे इतर व्यवसायांचे प्रमाण वाढेल तसे ही कंपनी केवळ डिपॉझिटरी राहणार नाही. दीड कोटी म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांची ‘केवायसी’ची माहिती सीडीएसएल व्हेंचर या ‘सीडीएसएल’च्या उपकंपनीकडे आहे. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना दर महिन्याला येणारे त्यांच्या गुंतवणुकीचे सर्वसाधारण विवरण अर्थात ‘कॅस’ हे ज्या दोन संस्थांकडून पाठविले जाते त्यापैकी एक ‘सीडीएसएल’ आहे. या व्यतिरिक्त ही कंपनी गुंतवणूकदारांना अनेक सेवा देते,’’ राजा म्हणाला.

‘सीडीएसएल’ ही बीएसईने प्रवर्तित केलेली कंपनी असून बीएसई व्यतिरिक्त अन्य काही अर्थसंस्था ‘सीडीएसएल’च्या भागधारक आहेत. सेबीने बीएसईला या उपकंपनीतील आपला हिस्सा विद्यमान ५० टक्कय़ांवरून २४ टक्के कमी करण्यास ३० जून ही अंतिम तारीख दिली असल्याने ‘सीडीएसएल’ची शेअर बाजारात ३० जूनला नोंदणी होणार आहे. या विक्रीतून बीएसई, स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा व कोलकाता स्टॉक एक्सचेंज हे प्रवर्तक आपला हिस्सा विकणार आहेत. मागील वर्षांच्या दुसऱ्या सहामाहीत आपल्या अर्थव्यवस्थेची वाढ मंदावली असली तरी आपली अर्थव्यवस्था  एका वर्षांपूर्वी जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था होती व भविष्यात राहील. मागील पाच वर्षांत देशातील जनतेचा बचतदर जरी घटला असला तरी बचतीसाठी अभौतिक बचत साधनांचा वापर वाढत आहे. रिझव्‍‌र्ह बँकेच्या एका अहवालानुसार मागील दहा वर्षांत अभौतिक साधनांकडून अभौतिक साधनांकडे बचतकर्ते संक्रमित होत असून हा दर १० टक्कय़ांहून अधिक आहे. विमा योजना, शेअर बाजारातील थेट गुंतवणूक व म्युच्युअल फंड यापैकी कुठल्याही साधनांचा वापर केला तरी त्याचा थेट लाभ ‘सीडीएसएल’ला होतो,’’ राजा म्हणाला.

‘‘सीडीएसएलचा महसूल हा डिमॅट खातेधारकांनी केलेल्या व्यवहारातून तसेच खातेधारकांच्या वार्षिक शुल्कातून मिळतो. कंपन्यांच्या कॉर्पोरेट अ‍ॅक्शन अर्थात लाभांश, बोनस, शेअर्स विभाजन इत्यादी गोष्टींसाठी भागधारकांमध्ये मत-आजमावणी होते. हे ‘ई व्होटिंग’ राबवूनही सीडीएसएलला महसूल मिळतो. इन्शुरन्स डिपॉझिटरी व अ‍ॅकडेमिक डिपॉझिटरी हे ‘सीडीएसएल’चे दोन अन्य व्यवसाय आहेत. सरकारने विमा कंपन्यांना विमा उत्पादने डीमॅट स्वरूपात विकण्याचे आदेश दिले असल्याने भविष्यात प्रत्येक विमा खरेदीदारास आपले इन्शुरन्स डिपॉझिटरी खाते असणे सक्तीचे होणार आहे. म्हणूनच देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीने ‘सीडीएसएल’मध्ये हिस्सा खरेदी केला आहे. मागील सहा महिन्यात ‘सीडीएसएल’चा वृद्धीदर १२ टक्के होता तर ‘सीडीएसएल’चा एकमेव स्पर्धक असलेल्या एनएसडीएलचा वृद्धी दर १२ टक्के होता. ‘माय इझी विल’, मोबाईल व्होटिंग, ट्रस्ट ही सीडीएसएलची अन्य सेवा उत्पादने आहेत,’’ राजा म्हणाला.

‘सीडीएसएल’ आपल्या खातेधारकांना शेअर्स, प्रीफरन्स शेअर्स, गव्हर्न्मेंट सिक्युरिटीज, म्युच्युअल फंड रोखे, इत्यादी डीमॅट रूपात धारण करण्याची सेवा देते. ‘सीडीएसएल’ आपल्या उप कंपन्यांच्या माध्यमातून आर्थिक सेवा क्षेत्रातील एक महत्वाचा भागीदार आहे. शेअर बाजारात नोंदणी झालेल्या कंपन्यांना आपल्या समभागधारकांना कंपनीची माहिती (तिमाही निकाल, संचालक मंडळात बदल इत्यादीसाठी) ई नोटीस पाठविणे गरजेचे असते. या नोटीसा पाठविण्याचे काम ‘सीडीएसएल’ सशुल्क करते. हा एक ‘सीडीएसएल’साठी उत्पन्नाचा स्त्रोत आहे. ई-केवायसी या सेवेत ‘सीडीएसएल’चा ६७ टक्के वाटा आहे. कंपनीच्या उपकंपन्यांपैकी सीडीएसएल इन्शुरन्स ही एकमेव उपकंपनी तोटय़ात आहे. आयपीओपश्चात प्रवर्तकांचा भांडवलातील वाटा ६०.२८ टक्के राहणार आहे. ‘सीडीएसएल’ ही विक्री १४५ ते १४९ या किंमत पट्टय़ात करणार आहे. ही किंमत वाजवी असून शक्य असेल तितक्या शेअर्ससाठी उत्सुकांनी नक्कीच अर्ज दाखल करावा. प्रारंभिक भागविक्रीत अर्ज करून शेअर्स मिळाले नाहीत तर नोंदणी झाल्यावर बाजारातून खरेदी करावा असा हा शेअर आहे. या कंपनीचे बिझनेस मॉडेल आर्थिक सेवा क्षेत्रातील क्रिसिल किंवा इक्रा सारखे आहे. आपल्या मुलाबाळांसाठीच नव्हे तर नातवंडासाठी गुंतवणूक करावी असा हा शेअर आहे,’’ राजा म्हाणाला. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.

पुंगीवाला gajrachipungi@ gmail.com