बुधवारपासून तीन दिवस खुल्या राहणाऱ्या या प्रारंभिक भागविक्रीची २९५ ते २९९ रुपये ही किंमत अंमळ महाग वाटत असली तरी थोडा धोका पत्करण्याची तयारी असेल त्यांनी या विक्रीला अर्ज करायला हरकत नाही. बाजारात नोंदणी झाल्यावर जरी अल्पसा पण नफा मिळेल. विशेष म्हणजे अर्ज केलेल्या गुंतवणूकदारांना समभाग मिळण्याची मोठी शक्यता आहे..

राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारू लागला. ‘‘राजा, येत्या बुधवारपासून अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट लिमिटेड आपल्या समभागांची प्राथमिक विक्री सुरू करीत आहे. या समभागांच्या प्राथमिक विक्रीसाठी अर्ज करावा किंवा कसे, या प्रश्नाचे उत्तर जाणून घेण्यास गुंतवणूकदार इच्छुक आहेत. या प्रश्नाचे उत्तर जर तू सांगितले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’ वेताळाने राजाला सांगितले.

‘‘येणार येणार असा गाजावाजा होत असणारी अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट लिमिटेड (डी मार्ट)ची प्राथमिक खुली विक्री ८ मार्च ते १० मार्चदरम्यान सुरू राहणार आहे. डी मार्टची मालकी राधाकिशन दमानी आणि कुटुंबीयांनी प्रवर्तित केलेल्या अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट लिमिटेडकडे आहे. राष्ट्रीय स्तरावरील विक्रीशृंखला असलेल्या डी मार्टची डिजिटल, पादत्राणे, वाणसामान आणि तयार कपडे यांची विक्री करणारी दालने असून ३१ जानेवारी २०१७ अखेर डी मार्टची एकूण ११७ दुकाने होती. प्राथमिक भागविक्रीतून उभारलेला निधी प्रामुख्याने जुन्या कर्जाची परतफेड करण्यासाठी व नवीन विक्री दालनांसाठी जागा खरेदी करण्यासाठी वापरण्यात येणार आहे,’’ राजा म्हणाला.

‘‘भारतातील ८ राज्ये व १ केंद्रशासित प्रदेशात व्यवसाय करणाऱ्या डी मार्टचा विस्तार वेगाने होत आहे. अन्य स्पर्धक कंपन्यांच्या तुलनेत डी मार्टची नफा क्षमता प्रतिचौरस मीटर एककात अधिक आहे. डी मार्ट वस्तूंची खरेदी, दुकानातील मालाच्या साठवणीसाठी आणि विक्रीत आधुनिक माहिती तंत्रज्ञान उपायांचा परिणामकारक वापर करीत असल्याने भारतातील सर्वाधिक नफा क्षमता असणारी कंपनी असा डी मार्टचा लौकिक आहे. २००२ मध्ये मुंबईत पहिले विक्री दालन उघडून व्यवसायास प्रारंभ करणाऱ्या डी मार्टने विक्री दालनांच्या संख्येत वाढ करतानाच पुरेशा फायद्याचे गणित बिघडणार नाही याची काळजी घेतली. २००२ पासून वार्षिक विक्रीचा वृद्धीदर ४०.८७ टक्के तर नफ्याचा वृद्धीदर १८.९३ टक्के आहे. रिलायन्स व्हॅल्यू रिटेल व बिग बझार या स्पर्धकांच्या तुलनेत डी मार्टच्या नफ्याचे गुणोत्तर उजवे आहे. डी मार्ट व्यवसायवृद्धीसाठी ‘ओम्नी चॅनेल स्ट्रॅटेजी’ हे धोरण अवलंबीत आहे. कंपनीचे ‘लो मार्जिन, हाय व्हॉल्यूम’ धोरण रिटेल व्यवसायाला पोषक आहे. हेच धोरण विक्री दालनांची शृंखला असणाऱ्या वॉल मार्ट, आयकिया, लीडल यांसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्या वापरत आहेत. डी मार्ट राष्ट्रीय स्तरावर व्यवसाय करीत असले तरीही एकूण विक्रीपैकी ८२ टक्के विक्री महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यांतील विक्री दालनांमधून होते. साहजिकच देशभरातील २१ पैकी १८ वितरण केंद्रे या दोन राज्यांत आहेत. या भूप्रदेशात एखादी नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्ती उद्भवल्यास कंपनीचा व्यवसाय या भूप्रदेशात केंद्रित असल्याने व्यवसायावर विपरीत परिणाम होऊ  शकतो. या व्यवसायात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता असते. कंपनीच्या मनुष्यबळापैकी मोठय़ा संख्येने मनुष्यबळ हे तात्पुरते कंत्राटी पद्धतीवर असल्याने हे मनुष्यबळ टिकविणे कंपनीसाठी आव्हान आहे,’’ राजा म्हणाला.

‘‘या भागविक्रीसाठी अर्ज केलेल्या गुंतवणूकदारांना समभाग मिळण्याची मोठी शक्यता आहे. ज्याला इंग्रजीत ‘क्विक बग आऊट ऑफ बॅग’ म्हणतात त्या प्रकारचा नफा मिळणे शक्य आहे. देशातील एकूण लोकसंख्येत तरुणांचे प्रमाण अधिक आहे. देशातील ६५ टक्के जोडपी वयाच्या ३५ पेक्षा कमी वयाची आहेत आणि ७९ टक्के जोडपी ४५ पेक्षा कमी वयाची असल्याचे जनगणना अहवाल सांगतो. वाढत्या नागरीकरणामुळे गावाच्या सीमा विस्तारल्या आहेत. पुण्याच्या कोथरूड भागातील तरुण जोडपे तुळशीबाग किंवा मंडईत जाण्यापेक्षा कर्वेनगरमधील डी मार्टमध्ये जाणे पसंत करते. या तरुण जोडप्यांना त्यांच्या आधीच्या पिढीपेक्षा वेगळ्या पद्धतीचे जीवन जगायला आवडते. अनेक तरुण नोकरी अथवा पर्यटनाच्या निमिताने परदेशात जाऊन येतात. परदेशांप्रमाणे पारंपरिक वाण्याकडे जाण्यापेक्षा वीकएंड शॉपिंग हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक झाला आहे. कंपनीच्या समभाग विक्रीची किंमत २९५ ते २९९ रुपयांदरम्यान अंमळ महाग वाटत असली तरी थोडा धोका पत्करण्याची तयारी असेल त्यांनी या विक्रीला अर्ज करायला हरकत नाही. बाजारात नोंदणी झाल्यावर जरी अल्प नफा मिळेल अशी आज शक्यता असली तरी ५ ते ७ वर्षांत चांगली भांडवला नफा पदरी पडू शकतो,’’ राजा म्हणाला. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.

पुंगीवाला gajrachipungi @gmail.com

Story img Loader