अर्थसाक्षरता हा काही सामाजिक प्रबोधनासारखा विषय नव्हे. ही गोष्ट एखाद्याला पटणे महत्त्वाचे आहे. फंड घराणी आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. तरी त्यांचे हे प्रयत्न प्रबोधनापेक्षा ‘इव्हेंट’मध्ये रस दाखविणारेच म्हणावे लागतील..
राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारूलागला. ‘‘राजा, सेबीने म्युच्युअल फंडांना जाहिरातीत ‘वलयांकित चेहऱ्यांचा’ वापर करण्याला परवानगी दिली आहे. म्युच्युअल फंडाची शिखर संघटना ‘अॅम्फी’ने ‘म्युच्युअल फंड.. सही है’ अशी टॅगलाइन असलेल्या जाहिरातींच्या मालिकेला सुरुवातही केली आहे. या जाहिरातींच्या मालिकेअंतर्गत वलयांकित चेहरे झळकू लागतील. या वलयांकित चेहऱ्यांचा प्रभाव गुंतवणूकदारांवर पडेल असे तुला वाटते काय? या प्रश्नाचे उत्तर ते तू सांगितले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’’ वेताळाने राजाला सांगितले.
‘‘२०१४ च्या सुमारास म्युच्युअल फंडांना त्यांच्या मालमत्तेच्या ०.०२ टक्के रक्कम आर्थिक साक्षरतेसाठी खर्च करणे सक्तीचे केले गेले. सुरुवातीला म्युच्युअल फंड ही रक्कम आर्थिक साक्षरतेच्या कार्यक्रमासाठी खर्च करीत असे. आर्थिक साक्षरतेच्या कार्यक्रमाची व्याख्या नेमकी स्पष्ट नसल्याने अनेक असंबद्ध गोष्टी आर्थिक साक्षरतेखाली आणल्या गेल्या. मोठय़ा म्युच्युअल फंडांचा भर जाहिरातीवर होता. यांची मोठी होर्डिग्ज रस्त्यारस्त्यावर दिसत होती. सेबीला अभिप्रेत असलेली अर्थसाक्षरता या कार्यक्रमात कुठेच दिसत नव्हती. मार्च २०१६ पर्यंत म्युच्युअल फंडांनी आर्थिक साक्षरतेसाठी खर्च न केलेला निधी म्युच्युअल फंडाची शिखर संघटना ‘अॅम्फी’च्या अर्थसाक्षरतेसाठी असलेल्या कोषात जमा करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. एप्रिल २०१६ पासून अर्थसाक्षरतेसाठी खर्च करायच्या एकूण निधीपैकी निम्मा निधी फंड घराणी खर्च करतील तर निम्मा निधी ‘अॅम्फी’च्या अर्थसाक्षरतेसाठी असलेल्या कोषात दरमहा जमा करण्याचे ठरविण्यात आले. साहजिकच ‘अॅम्फी’कडे दरमहा १०० कोटींचा निधी उपलब्ध झाला. या निधीचा विनियोग करण्यासाठी वर्ष संपायला आले असताना मार्चच्या शेवटच्या आठवडय़ात एका कार्यक्रमात या नव्या जाहिरात मोहिमांचा कार्यक्रम उरकण्यात आला,’’ राजा म्हणाला.
‘‘अर्थसाक्षरता हा काही सामाजिक प्रबोधन करण्याचा विषय नव्हे. ही गोष्ट एखाद्याला पटणे महत्त्वाचे आहे. फंड घराणी आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. यूटीआय म्युच्युअल फंडाने अर्थसाक्षरतेसाठी ‘स्वतंत्र’ नावाच्या वेगळ्या ब्रँडची निर्मिती केली. एलआयसी म्युच्युअल फंडाने ‘निवेश गुरू’ला जन्म दिला. हा निवेश गुरू एलआयसी म्युच्युअल फंडाचे ऑफिस सोडून अन्य कुठे दिसत नाही! तर या फंड घराण्याचे पालकत्व असलेल्या एलआयसीच्या कार्यालयात या निवेश गुरूची प्रतिमाही दिसत नाही. मोठा निधीचा स्रोत पाहून अनेकांना त्या शिंक्यातील लोणी हवेसे वाटले तर नवल ते काय? हा कार्यक्रम म्युच्युअल फंडांच्या वितरकांबरोबर करण्यापेक्षा फंड घराण्यांना हा कार्यक्रम इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांबरोबर करण्यात रस न वाटला नसता तरच नवल. अनेक इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या या अर्थसाक्षरतेच्या कार्यक्रमावर पोसल्या आणि वाढल्या. या साखळीतील सर्वानाच प्रबोधनापेक्षा ‘इव्हेंट’मध्ये रस आहे. या कार्यक्रमात फंड घराण्यांनी स्वत:च्या उत्पादनांची जाहिरात करता कामा नये या पहिल्या नियमालाच या कार्यक्रमात हरताळ फासला जातो. फंड घराण्याचे प्रतिनिधित्व करणारा वक्ता ‘माझा फंड अन्य फंडाच्या तुलनेत उजवा’ हेच सांगत असतो. या कार्यक्रमाची परिणामकारकता मोजण्याचे प्रयत्न कोणी करत नाही,’’ राजा म्हणाला.
‘‘जीवन विम्यासारख्या उत्पादनाच्या मार्केटिंगसाठी ब्रँड अॅम्बॅसिडर नियुक्त करता येतो पण म्युच्युअल फंड वितरणासाठी असा सदिच्छादूत नेमता येत नाही हा आक्षेप अनेक म्युच्युअल फंडांकडून ‘सेबी’समोर उपस्थित करण्यात येत असे. यावर उपाय म्हणून वलयांकित चेहऱ्याचा वापर एका विशिष्ट फंड घराण्याचे किंवा विशिष्ट फंडाचे मार्केटिंग करण्यासाठी न करता म्युच्युअल फंड ही संकल्पना ‘सही है’ हे सांगण्यासाठी वापरता येईल, असे ठरले. शिखर संघटनेच्या पातळीवर काही तरी ठोस होत असल्याचा दावा ‘अॅम्फी’ करू शकेल. थोरले बच्चन जसे पोलिओची जाहिरात करतात तसे उद्या अॅम्फीसाठी बच्चन साहेब ‘म्युच्युअल फंड सही है’ असे म्हणू लागतील. सेबीला वलयांकित चेहरे हे आर्थिक साक्षरतेसाठी प्रभावी वाटत असतील तर ‘फेस व्हॅल्यू देख के निवेश ना करो’ ही जाहिरात करणे तरी सेबीने थांबवावे,’’ राजा म्हणाला व राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.
gajrachipungi@gmail.com