नोकरीच्या सुरुवातीच्या काळात बचतीचा दर जास्त असताना अपुरे विमा छत्र व ४-५ टक्क्यांदरम्यान परताव्याचा दर असलेल्या बिन कामाच्या योजना बचतीचा मोठा हिस्सा फस्त करतात. दहा वर्षांनी जेव्हा खर्च वाढतो तेव्हा या त्यांचे हप्ते खुपायला लागतात, तेव्हा या योजना कामचुकार असल्याचे लक्षात येते. तोवर झालेली चूक सुधारण्यापलीकडे गेलेली असते.
चंद्र कोणता वदन कोणते
शशांक मुख की मुखशशांक ते
निवडतील निवडोत जाणते
मानी परी मन सुखदसंभ्रमा
कोणता मानू चंद्रमा ?
भूवरीचा की नभीचा, मानू चंद्रमा
कवी : गु. ह देशपांडे
सुंदर स्त्रीच्या चेहऱ्याला चंद्राची उपमा का दिली जाते हे ज्यांनी चंद्राचे सौंदर्य व सौंदर्यवतीचा चेहरा न्याहाळला त्या जाणत्यांना हे कळते. केवळ मराठीतच नव्हे तर िहदीतही गीतकार शकिल बदायुनी यांनी ‘‘चौदहवीं का चाँद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो’’ असे लिहून ठेवले आहे. उद्या कोजागिरी पोर्णिमा. या दिवशी चंद्र सर्वात तेजस्वी दिसतो. याचे कारण या दिवशी पृथ्वीपासून चंद्राचे अंतर सर्वात कमी असते. आजच्या ‘चौदहवीं’च्या निमित्ताने अशाच एका चंद्रीकेचे आजचे नियोजन. चंद्रिका एक मॉडेल असून या व्यवसायात तिने स्वत:ला सुस्थापित केले आहे. तिने मुंबईच्या महाविद्यालयातून हॉटेल मॅनेजमेंटमध्ये  पदवी प्राप्त केली असून या चंद्रिकेचे विविध उत्पादने व सेवांसाठी मॉडेलिंग व फॅशन शो हे उत्पन्नाचे स्रोत आहेत. चंद्रीका सततचे दौरे व जाहिरातीचे शूटिंगदरम्यान व्यस्त असल्याने  फेब्रुवारी २०१५ पासून प्रलंबित असलेली भेट ऑगस्ट महिन्यात अखेर झाली. चंद्रिका ‘लॅक्मे फॅशन वीक’मध्ये सहभागी झाली होती. या कार्यक्रमाचे स्थळ, एनसीपीए थिएटर अर्थात लोकसत्ता कार्यालयापासून हाकेच्या अंतरावरच असल्याने या चंद्रिकेची पहिली भेट लोकसत्ता कार्यालयाच्या उपहारगृहात झाली.
येत्या दिवाळीत वयाची २६ वष्रे पूर्ण करणाऱ्या या चंद्रिकेचे उत्पन्न तिच्या वयाच्या इतरांच्या तुलनेत चांगले असल्याने रोकडसुलभता देखील मोठी आहे. ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’च्या वाचक असलेल्या चंद्रिकेच्या आईला आपल्या मुलीच्या पशाचे योग्य नियोजन व्हावे असे वाटणे स्वाभाविक होते. आईच्या मते पसे साठवणे चंद्रिकेला ठाऊक नाही वडिलांच्या पश्चात आईने मोठे केले असल्याने वायफळ खर्चाला वेसण घालून वित्तीय उद्दिष्टांची पूर्तता करणारी गुंतवणूक व्हावी, असे आईला वाटणे नसíगक आहे. आईने पुढाकार घेऊन नक्की केलेल्या या पहिल्या भेटीत नियोजनाचे उद्दिष्ट व त्या दिशेने अनुसरण्याचा मार्ग यावर चर्चा केली
चंद्रिकेने अल्प काळासाठी हवाई सुंदरी म्हणूनही नोकरी केली आहे. ही चंद्रिका निदान पुढील दहा वष्रे मांजरीच्या चालीने मंचावर चालेल व त्यानंतर पोटापाण्यासाठी अन्य उद्योग करेल अथवा कमावलेल्या संपत्तीच्या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या परताव्यावर जगेल. तो पर्यंतच्या जमविलेल्या पूंजीची योग्य गुंतवणूक व्हावी असे चंद्रीकेच्या आईला वाटते. चंद्रिकेची आई राष्ट्रीयीकृत बँकेत नोकरी करते. त्यांच्या सेवानिवृत्तीस अद्याप पाच वष्रे शिल्लक आहेत. चंद्रिकेचे गुंतवणूक विषयक (किंबहुना सर्वच) निर्णय आईच घेत असल्याने दुसरी भेट चंद्रिका व तिची आई यांच्याबरोबर झाली. या भेटीत हे नियोजन समजून दिले व त्यांच्या काही शंकांचे निरसन केले.
चंद्रिकेकडे एकही पारंपारिक विमा पॉलिसी नाही, हे बघून आश्चर्य वाटले. चंद्रिकेच्या आईने याचे श्रेय ‘लोकसत्ता अर्थवृत्तान्त’ला दिले. विमा व बचत या दोन गोष्टी एकत्र असल्याचे तोटे ठाऊक असल्याने चंद्रिकेला लबाड विमा विक्रेत्यांपासून जाणीवपूर्वक दूर ठेवले. साहजिकच कमवायला लागल्यावर विमा विक्रेत्याला श्रीमंत करणारी व खरेदीदाराला भीकेला लावणारी एखादी पॉलिसी घ्यायची व नंतर सोयीने नियोजन करायचे ही प्रथा जाणीवपूर्वक मोडली. आधी नियोजन व त्याला साजेशी विविध विमा उत्पादनाची खरेदी हा क्रम अवलंबिला. चंद्रिकेने मुंबईत िदडोशी गोरेगांव येथे एक सदनिका खरेदीचा करार केला असून २० लाख बयाणा दिलेला आहे. सदनिकेचा ताबा २०१७ च्या दिवाळीत मिळणे अपेक्षित आहे. एकूण पावणे दोन कोटी किंमत असलेल्या या सदनिकेसाठी चंद्रिका एक कोटी पाच लाखांचे बँकेचे कर्ज घेणार आहे. उर्वरित रक्कम सध्या राहत असलेल्या सदनिका विक्रीतून उभी राहणार आहे. ही सदनिका विकून ७०-७५ लाख मिळतील. ही सदनिका मागील वर्षभरापासून विकण्याच्या प्रयत्नात असलेल्या या मायलेकीना अपेक्षित किंमत मिळत नसल्याने हा सौदा इच्छा असूनही झालेला नाही.
नवीन सदनिकेचा ताबा मिळण्यापूर्वी जुनी सदनिका विकली गेल्यास अंदाजे ७५ लाख कर्ज घ्यावे लागेल. सर्वसाधारणपणे वाढत्या वयानुसार नोकरीधंद्याच्या कालावधीत उत्पन्न वाढत जाते. चंद्रिका ज्या क्षेत्रात आहे त्या क्षेत्रात एखादा बिग बी वगळता वाढत्या वयानुसार उत्पन्न कमी होते. वयाच्या ३५ वर्षांनंतर चंद्रिकेचे उत्पन्न कमी होणार असल्याने सध्याच्या चंद्रिकेच्या उत्पन्नानुसार हे कर्ज सात वर्षांत फेडणे चंद्रिकेला शक्य आहे. ते तिने पाच ते सात वर्षांत फेडावे असा पहिला सल्ला आहे. कर्ज उशीरा फेडणे म्हणजे बँकांना श्रीमंत करणे हे चंद्रिकेच्या आईलाही पटल्याने पाच ते सात वर्षांत कर्ज फेडावे असे ठरले.
चंद्रिकेचे वय सध्याचे उत्पन्न व घेणार असणारे गृहकर्ज पाहता साडे तीन कोटीचा जीवन विमा घ्यावा असे ठरले. हा विमा घेताना, दीड कोटीची दहा वष्रे मुदतीची व दोन कोटीची तीस वष्रे मुदतीची अशा दोन पॉलिसी घ्याव्यात, असा विचार मांडला. पहिल्या विम्याच्या पॉलिसीचा हप्ता ९,८३२ रु. (सेवा कर अतिरिक्त) व दुसऱ्या पॉलिसीचा हप्ता १३,७८६ रु. (सेवा कर अतिरिक्त) भरावा लागेल. सात वर्षांत कर्ज फिटल्यावर पहिल्या पॉलिसीचा हप्ता भरणे बंद करणे किंवा कसे हा विचार असल्याने दोन स्वतंत्र पॉलिसी एकाच वेळी एकाच कंपनीकडून खरेदी कराव्या असे ठरले. दुर्दैवाने चंद्रिकेला एखाद्या अपघाताने कायमचे अपंगत्व आल्यास पाच कोटीचा वयाच्या ७० वर्षांपर्यंत संरक्षण देणारा अपघाती विमा पहिल्या भेटीत सुचविल्यानुसार चंद्रिकेने खरेदी केला आहे. या विम्याचा हप्ता दरवर्षी ५७,००० (सेवा कर अतिरिक्त) चंद्रिका भरणार आहे. चंद्रिकेची स्वत:ची आरोग्य विमा पॉलिसी आहे. सध्याच्या आरोग्यविमा पॉलिसीपेक्षा अव्वल असलेली व दहा लाख आरोग्यनिगा खर्चाचे विमाछत्र असलेली दुसरी पॉलिसी सुचविली. चंद्रिकेला या पॉलिसीचा हप्ता १२,२५४ रु. भरावा लागेल.
चंद्रिकेचे पीपीएफ खाते मागील १० वर्षांपासून आईच्या बँकेत असून या खात्यात चंद्रिकेची आई दर वर्षी दीड लाख नियमित भरत आहे. कुठलीही गुंतवणूक सुचविण्यापूर्वी वा करण्यापूर्वी चंद्रिकेची गुंतवणुकीत जोखीम पत्करण्याची चाचणी केली.  ‘फिनामेट्रिका’ या गुंतवणूकविषयक व्यक्तिमत्व चाचणीतून चंद्रिका ही जोखीम सहन करून अधिक परतावा मिळविणारी व्यक्ती (Aggressive Investor) असल्याचे दिसून आले. साहसी गुंतवणूकदार असलेल्या चंद्रिकेला तिच्या वयाला व मानसिकतेला साजेसा म्युच्युअल फंडाच्या पोर्टफोलिओची शिफारस केली. पुढील तीन वर्षांत या पोर्टफोलिओच्या परताव्याचा चक्रवाढ दर (CAGR) अंदाजे १८ टक्के असेल, असा हिशोब करून हे नियोजन केले आहे. प्रत्येक वर्षी १८ टक्के परतावा असणार नाही. परंतु पाच ते सात वर्षांचा विचार केल्यास हा दर गाठणे मुळीच कठीण नाही.
चंद्रिकेची आई एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेची व्यवस्थापक आहे. चंद्रिकेचा जन्म झाला तेव्हा आई-वडील एकत्र कुटुंबात ठाकूरद्वार येथे देना वाडीत राहात होते. चंद्रिकेच्या जन्मानंतर वर्षभरात हे कुटुंब गोरेगांव येथे स्थलांतरित झाले. चंद्रिकेने दोन वर्षांपूर्वी गोरेगावात शास्त्रीनगर येथे मोठी सदनिका घेतली. मध्यमवर्गीय पाश्र्वभूमी असलेल्या चंद्रिकेच्या आईला वित्तीय व्यवस्थापनाचे महत्त्व कळले ते उच्च धनसंपदा बाळगणाऱ्या सर्वच पालकांना कळतेच असे नाही. योग्य नियोजनांत मुलांचे आयुष्य आणि भविष्य बदलण्याची ताकद असते. परंतु पालकांच्या मनावर विमा क्षेत्रातील सर्वात मोठय़ा कंपनीचा पगडा असल्याने ते पारंपारिक विमा उत्पादने घेतात. मुलगा किंवा मुलगी कमावते झाल्यानंतर आपली वित्तीय ध्येये निश्चित करून या ध्येयांचा पाठपुरावा करणारी वेगवेगळी गुंतवणूक व विमा उत्पादने निवडण्याऐवजी अपुरे विमा छत्र व ४-५ टक्क्यांदरम्यान परताव्याचा दर असलेली व विमा विक्रेत्यांची भर करणारी उत्पादने विकत घेतात. नोकरीच्या सुरुवातीच्या काळात बचतीचा दर जास्त असताना या बिन कामाच्या योजना बचतीचा मोठा हिस्सा फस्त करतात. दहा वर्षांनी जेव्हा खर्च वाढतो तेव्हा या त्यांचे हप्ते खुपायला लागतात, तेव्हा या योजना कामचुकार असल्याचे लक्षात येते. तोवर झालेली चूक सुधारण्यापलीकडे गेलेली असते. लांडग्याहून लबाड विमा विक्रेते परताव्याचा दर कधीच सांगत नाहीत. चुकीच्या उत्पादनांची खरेदी केल्यामुळे मर्सििडझ बाळगण्याची ऐपत असणाऱ्यांना मारुतीतून फिरावे लागते. चंद्रिकेच्या आईने पारंपारिक विमा विक्रेत्यांची सावली चंद्रिकेवर पडणार नाही, याची काळजी घेतल्यानेच चंद्रिका सध्या मारुतीतून फिरत असली तरी भविष्यात तिला मर्सििडझ बाळगण्याचे बळ नक्कीच मिळेल. म्हणून नियोजन आधी व नंतर योग्य गुंतवणूक व विमा उत्पादनांची खरेदी हाच क्रम चोखाळायला हवा.
shreeyachebaba@gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा