फ्रँकलिन इंडिया प्रायमा प्लस फंड
शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक सार्वकालिक उच्चांकापेक्षा १ ते १.५० टक्का खालच्या पातळीवर आहेत किंवा मिड कॅप व स्मॉल कॅप निर्देशांकांनी उच्चांक गाठला आहे. निर्देशांक जितके उच्चांकावर, तितके परताव्याचे दर आकर्षक. साहजिक जोखीम स्वीकारण्याची तयारी नसलेल्या गुंतवणूकदारांची मानसिकताही धोका पत्करण्यास तयार होते. म्युच्युअल फंडांना सर्वाधिक गुंतवणूक याच काळात मिळते. त्याचप्रमाणे भविष्यातील सर्वात कमी परतावा याच काळात केलेल्या गुंतवणुकीवर मिळतो.
फ्रँकलिन इंडिया प्रायमा प्लस फंडाला प्रारंभ झाल्याच्या पहिल्या दिवशी (२९ सप्टेंबर १९९४) रोजी केल्या गेलेल्या १ लाखाच्या गुंतवणुकीचे २५ फेब्रुवारी २०१७च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार ५.०६ लाख रुपये झाले असून परताव्याचा वार्षिक दर १९.१३ टक्के आहे. डायव्हार्सिफाईड फ्लेक्झी कॅप फंड गटात या फंडाचा समावेश परताव्याच्या दरात सातत्य राखणाऱ्या फंडात होतो. गेल्या वर्षभरात या फंडाची कामगिरी माहिती तंत्रज्ञान व आरोग्य निगा क्षेत्रात अधिक गुंतवणूक केल्याने लौकिकास साजेशी नव्हती. फंड व्यवस्थापनाने, माहिती तंत्रज्ञान व आरोग्य निगा क्षेत्रातील गुंतवणूक कमी करून बँका व वाहन उद्योगातील गुंतवणूक वाढविल्याने येत्या वर्ष सव्वा वर्षांच्या काळात फंड आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करण्याची आशा वाटते.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा जो निकाल आला त्यातून माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांची मोठय़ा प्रमाणावर घसरण झाली. परिणामी, फंडाच्या कामगिरीवर परिणाम झाला. जानेवारी महिन्याच्या गुंतवणुकीच्या तपशिलाप्रमाणे फंडाने पहिल्यांदाच मालमत्तेत १० हजार कोटींचा टप्पा पार केला आहे. मागील तीन वर्षांत या फंडाने सर्व तिमाहीत आपल्या संदर्भ निर्देशांकापेक्षा चांगली कामगिरी केली आहे. ‘निफ्टी ५००’ हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. तीन वर्षांच्या चलत सरासरीचा अभ्यास करता फंडाने ९८.६७ टक्के प्रसंगात संदर्भ निर्देशांकापेक्षा सहा टक्क्यांहून अधिक, ७६.६७ टक्के कालावधीत संदर्भ निर्देशांकापेक्षा आठ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
मागील २३ वर्षांत फंडाने अनेक उन्हाळे-पावसाळे अनुभवल्याने हा फंड अर्थचक्राच्या गतीतून तावून-सुलाखून निघालेला फंड आहे. फंडाचा दीर्घकालीन परतावा नक्कीच आकर्षक आहे. अर्थचक्राच्या गतीनुसार हा फंड गुंतवणुकीसाठी योग्य उद्योग क्षेत्रातील कंपन्यांची त्यांच्या मूल्यांकनाप्रमाणे निवड करीत असतो. अव्वल व्यवस्थापन व योग्य मूल्यांकनाच्या निकषांवर फंडाने समभागांची निवड केली आहे. हा फंड सेवानिवृत्ती पश्चात जमविण्याचा निधी, मुलांची शिक्षणे यांसारख्या दीर्घकालीन गुंतवणूक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी एक चांगले गुंतवणूक साधन आहे. मागील २३ वर्षांपासून हा फंड गुंतवणूकदारांचा विश्वास सार्थ ठरवत आला आहे. आनंद राधाकृष्णन हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. मागील २३ वर्षांत तेजी व मंदीच्या कालावधीत या फंडाची कामगिरी संदर्भ निर्देशांकाहून चांगली झाली आहे.
फंडाच्या गुंतवणुकीत पहिली पाच उद्योग क्षेत्रे अनुक्रमे बँकिंग वाहन उद्योग, तंत्रज्ञान आरोग्यनिगा व अभियांत्रिकी उद्योग अशी आहेत. एकूण गुंतवणुकीपैकी पहिल्या पाच समभाग गुंतवणुकांचे प्रमाण २३ टक्के व पहिल्या दहा गुंतवणुकांचे प्रमाण ३८ टक्के आहे. हा फंड समभागकेंद्रित जोखीम स्वीकारणारा नाही. फंडाच्या गुंतवणुकीत असलेल्या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासारखी परिस्थिती आरोग्य निगा क्षेत्रातील कंपन्या अमेरिकेच्या औषध प्रशासनाच्या बंदीला तोंड देत आहेत. डॉ. रेड्डीसहित अन्य औषध निर्माते, अमेरिकेच्या औषध प्रशासनाच्या नोटिशीत उपस्थित केलेल्या मुद्दय़ांना उत्तर देण्याबरोबरच उत्पादन प्रक्रियेत योग्य दर्जा राखण्यासाठी सुधारणा करीत आहेत. लवकरच अमेरिकेचे औषध प्रशासन अमेरिकेत औषध निर्यातीस परवानगी देण्याची शक्यता आहे.
सध्याच्या परिस्थितीत एका बाजूला आकर्षक पातळीवर असलेले लार्ज कॅपचे मूल्यांकन व महाग असलेले मिड कॅप लक्षात घेता हा फ्लेक्झीकॅप फंडाचा गुंतवणूकदार विचार करू शकतात. दीर्घ कालावधीसाठी केलेल्या नियोजनबद्ध गुंतवणूक योजनेतून (सिप) हा फंड आकर्षक भांडवल वृद्धीतून समाधानकारक परतावा देऊ शकतो.
(अस्वीकृती: या स्तंभात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)
shreeyachebaba@gmail.com