फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंड

स्मॉल कॅप कंपन्यांचे मिड कॅॅप कंपन्यांकडील संक्रमणात अनेक कंपन्या लयालाही जातात. यासाठी या कंपन्यांची निवड अतिशय काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. हे कौशल्य ज्या निधी व्यवस्थापकांनी आत्मसात केले त्यापैकी आर. जानकीरामन हे एक होत. म्हणूनच ते सांभाळत असलेल्या या फंडाचा परतावा स्मॉल व मिड कॅप गटातील फंडापेक्षा ९७ टक्के अधिक आहे..

arth07बाजारातला निर्देशांक नवीन शिखर गाठण्याचा प्रयत्न करीत असतानाच जोखीम स्वीकारण्याची तयारी असलेले व बाजाराच्या चढउतारांशी मैत्रीचे नाते संपादन करू शकणारे गुंतवणूकदार मिड व स्मॉल कॅप फंडाचा समावेश आपल्या गुंतवणुकीत करू शकतात. ‘लोकसत्ता-अर्थसल्ला’सारख्या कार्यक्रमात ‘आमच्या गुंतवणुकीपैकी आम्ही मिड कॅप फंड प्रकाराचे प्रमाण नेमके किती असावे,’ हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. मिड कॅप फंड प्रकारातील गुंतवणूक ही गुंतवणूकदाराच्या जोखीम स्वीकारण्यावर व तो गुंतवणूकदार त्याच्या वित्तीय ध्येयापासून किती दूर आहे या दोन गोष्टीवर ठरते. अर्थव्यवस्था कठीण प्रसंगाला तोंड देत असताना मिड कॅप समभागांचे मूल्यांकन गुंतवणूकयोग्य पातळीवर असते. या काळात केलेली गुंतवणूक सरासरीहून अधिक परतावा देते. या उलट जो काळ नवीन गुंतवणूक करण्यास अयोग्य असताना म्हणजे निर्देशांक शिखराच्या जवळ व कोसळण्याच्या बेतात असताना म्युच्युअल फंडांना सर्वाधिक निधी मिळतो हे सत्य आहे. हे सत्य २००० व २००७ मध्ये हे सिद्ध झालेले आहे. परंतु वित्तीय नियोजकाने दिलेला सल्ला पाळण्याची गुंतवणूकदारांची अशा काळात मानसिक तयारी नसते. मूल्यांकन आकर्षक असताना केलेली गुंतवणूक अधिक परतावा देते हे २००९, २०१२ व २०१३ मध्ये गुंतावलेल्या रक्कमेवर मिळालेल्या परताव्याच्या दरावरून सहज दिसून येते. ज्यांची वित्तीय ध्येये किमान सात ते दहा वर्षे दूर आहेत अशा गुंतवणूकदारांसाठी आजची ही शिफारस. वेगवेगळ्या कालावधीत गुंतविलेल्या रक्कमेवरील परताव्याचा दर कोष्टक क्रमांक-१ मध्ये दिला आहे. जून-जुलै २०१३ हा कालखंड ‘कॅड क्रायसिस’ म्हणून ओळखला जातो. या काळात माध्यमांच्या गजबजाटात आपल्या बुद्धीवर विसंबून मिड कॅप गुंतवणूक समभागात गुंतवणूक करण्याचा निर्णय किती योग्य होता हे या काळातील गुंतवणुकीवर मिळालेला परतावा सिद्ध करतो

arth08

फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंड हा एकूण मालमत्तेच्या ७० ते ८० टक्के निधी हा मिड व स्मॉल कॅप प्रकारच्या समभागात गुंतवणूक करणारा फंड आहे. स्मॉल कॅप प्रकारचे समभाग निवडून गुंतवणूक करणे व योग्य वेळ येताच नफ्यात बाहेर पडणे हे कठीण काम लीलया साधल्याने स्मॉल कॅप फंड गटात फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंड हा एक अव्वल फंड ठरला आहे. हा फंड प्रामुख्याने सीएनएक्स ५०० निर्देशांकातील १००व्या कंपनीच्या भांडवली मूल्यापेक्षा कमी भांडवली मूल्य असणाऱ्या कंपन्यांतून गुंतवणूक करणारा फंड आहे. ज्या कंपन्यांचा नफा घातांकी पद्धतीने वाढेल अशा योग्य मूल्यांकनातील कंपन्या हेरून हा फंड अशा कंपन्यांच्या समभागांचा समावेश आपल्या गुंतवणुकीत करतो. मागील एका वर्षांच्या तुलनेत या फंडाचा क्रमांक पहिल्या पाचात नसला तरी हा ३ व ५ वर्षे कालावधीच्या परताव्यात हा फंड अव्वल स्थानी आहे. हा फंड स्मॉल कॅप प्रकारच्या समभागात गुंतवणूक करणारा फंड असल्याने परताव्याच्या दरात असे तात्पुरते चढउतार असणे स्वाभाविक आहे.
arth09

३१ जुलै २०१६च्या पोर्टफोलियोप्रमाणे या फंडाने एकूण ७० कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक केली आहे. यापैकी पहिल्या पाच समभागांचे प्रमाण एकूण गुंतवणुकीच्या १७.४४ टक्के व पहिल्या १० समभागांचे प्रमाण एकूण गुंतवणुकीच्या २८.५२ टक्के आहे. बँकिंग, अभियांत्रिकी, रसायने, सिमेंट व तंत्रज्ञान या उद्योग क्षेत्राला निधी व्यवस्थापकांनी पसंती दिली आहे. आर. जानकीरामन यांनी निधी व्यवस्थापक म्हणून फेब्रुवारी २०११ पासून या फंडाचा कार्यभार सांभाळला आहे. तेव्हापासून फंडाचा परतावा स्मॉल व मिड कॅप गटातील फंडापेक्षा ९७ टक्के अधिक आहे. मिड व स्मॉल कॅप फंड यांच्या एनएव्हीत वेगाने चढ-उतार होत असतात. जानकीरामन यांची खासियत मूलभूत संशोधनावर भर देऊन दर्जेदार व्यवस्थापन असलेल्या कंपन्यांची निवड करून गुंतवणूक करण्यात आहे. कंपन्या स्मॉल कॅप असूनही मर्यादित प्रमाणात कर्ज असलेल्या कंपन्या जानकीरामन यांनी गुंतवणुकीसाठी निवडल्या आहेत. रोकड सुलभतेच्या दृष्टीने फंडाच्या गुंतवणुकीत १५ टक्के लार्ज कॅप व अचानक आलेल्या संधीचा लाभ उठविण्यासाठी १० टक्के रोकड सममूल्य गुंतवणूक जानकीरामन यांनी केली आहे.
arth10

वयाच्या ३०-३५व्या वर्षी सेवा निवृत्तिपश्चातच्या निधीच्या गुंतवणुकीत आजच्या फंडाचा समावेश करणे व चार-पाच वर्षांनंतर गरज असलेल्या मुलाच्या व्यावसायिक शिक्षणासाठी आवश्यक निधीच्या तरतुदीत या फंडाचा समावेश करणे या दोन पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. या फंडाचा परतावा कितीही आकर्षक वाटला तरी ज्यांची वित्तीय ध्येये किमान पाच वर्षे व त्यापेक्षा अधिक दूरवरची आहेत अशाच गुंतवणूकदरांनी या फंडाचा गुंतवणुकीसाठी विचार करावा. स्मॉल कॅप कंपन्यांचे मिड कॅप कंपन्यांत संक्रमण होत असताना, या वाटेत अनेक कंपन्या लयालाही जातात. यासाठी या कंपन्यांची निवड अतिशय काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. हे कौशल्य ज्या निधी व्यवस्थापकांनी आत्मसात केले तो निधी व्यवस्थापक मिड कॅप स्मॉल कॅप फंड योजनांचा यशस्वी निधी व्यवस्थापक होऊ  शकतो. या फंडाचे निधी व्यावस्थापक आर जानकीरामन यांनी स्मॉल कॅप कंपन्यांची निवड करण्याचे कौशल्य आत्मसात केल्यामुळे हा फंड गुंतवणूकदारांना खणखणीत परतावा देऊ शकला. त्यांच्याशी झालेल्या संभाषणादरम्यान विनयशील वृत्तीचे जानकीरामन नवीन गुंतवणुकीवर मागील परताव्याइतका परतावा भविष्यात मिळणार नाही हे सांगायला कचरत नाहीत. त्यांच्याशी झालेल्या संभाषणात त्यांना तुम्ही तुमच्या फंडाबाबत किती सकारात्मक आहात या प्रश्नावर ‘Cautiously Positive’ हे उत्तर या फंडाच्या भविष्यातील परताव्याबाबत बरेच काही सांगून जातात.

वसंत माधव कुलकर्णी -shreeyachebaba@gmail.com