बीएनपी पारिबा बॅलन्स्ड फंड
समभाग केंद्रित बॅलन्स्ड फंडात होणाऱ्या ‘सिप’ गुंतवणुकीत दोन वर्षांत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसत आहे. मागील एका वर्षांत समभागकेंद्रित बॅलन्स्ड फंडातील गुंतवणुकीवर २३ मार्चच्या ग्रोथ पर्यायातील एनएव्हीनुसार सर्वाधिक वार्षिक परतावा २७ टक्के तर सर्वात कमी परतावा १६.२६ टक्के असा आहे. म्हणूनच आयडीएफसी व महिंद्रा या फंड घराण्यानंतर गत तीन महिन्यांत बॅलन्स्ड फंडाची प्रस्तुती करणारे बीएनपी परिबा हे तिसरे फंड घराणे आहे, तर वर्षभरात बाजारात दाखल झालेला हा आठवा बॅलन्स्ड फंड आहे.
‘लोकसत्ता’च्या गुरुवार दिनांक २३ मार्च २०१७च्या अंकात ‘अविवा लाइफ’च्या आर्थिक साक्षरता सर्वेक्षणाचा निष्कर्ष जाहीर करणारी ‘श्रीमंतीची स्वप्ने मोठी, मात्र नियोजनांत पिछाडी’ या मथळ्याची बातमी ‘अर्थसत्ता’ या पानावर प्रसिद्ध झाली होती. ही बातमी वाचल्यावर वर्ष २०१४-१५ दरम्यान ‘लोकसत्ता- अर्थवृत्तांत’मध्ये नियोजन भान हे सदर लिहिताना भेटलेल्या अनेक कुटुंबांचे चेहरे डोळ्यासमोर आले. आकाशाला गवसणी घालणारी वित्तीय ध्येये बाळगणारे व ही ध्येये पूर्ण करण्याची आर्थिक कुवत असणाऱ्या अनेक कुटुंबीयांनी गुंतवणुकीसाठी चुकीचे साधन निवडल्यामुळे साध्य करायचे वित्तीय ध्येय कोसो मैल दूर राहिलेले आढळले. याचे कारण समभाग गुंतवणूक म्हणजे धोका हा पिढय़ान् पिढय़ा असलेला संस्कार. समभाग गुंतवणुकीतून संपत्तीची निर्मिती करता येते या वास्तवापेक्षा समभाग गुंतवणूक म्हणजे धोका हा गैरसमज प्रबळ ठरतो. ज्यांना समभाग गुंतवणुकीतील धोका कमी करण्यासाठी समभाग गुंतवणुकीसोबत स्थिर उत्पन्न देणाऱ्या रोख्यात गुंतवणूक करून धोका कमी करता येतो. समभाग व रोखे गुंतवणूक एकत्र असलेले बॅलन्स्ड फंड समभाग गुंतवणुकीचा परतावा व रोखे गुंतवणुकीची सुरक्षितता गुंतवणूकदारांना प्रदान करतात.
दिवसेंदिवस म्युच्युअल फंडांचे बॅलन्स्ड फंड गुंतवणूकदारांच्या पसंतीला उतरत आसल्याचे त्यांच्या वाढत्या मालमत्तांवरून दिसत आहे. मागील दोन वर्षांत समभाग केंद्रित बॅलन्स्ड फंडात होणाऱ्या सिप गुंतवणुकीत मोठय़ा प्रमाणावर वाढ झाल्याचे दिसत आहे. मागील एका वर्षांत समभागकेंद्रित बॅलन्स्ड फंडातील गुंतवणुकीवर २३ मार्चच्या ग्रोथ पर्यायातील एनएव्हीनुसार सर्वाधिक वार्षिक परतावा २७ टक्के तर सर्वात कमी परतावा १६.२६ टक्के मिळालेला आहे. २७ पैकी २२ फंडांनी आपल्या संदर्भ निर्देशांकापेक्षा सरस कामगिरी केली आहे.
बीएनपी पारिबा फंड घराण्याचा बॅलन्स्ड फंडाची प्राथमिक विक्री १७ मार्च रोजी सुरू झाली असून ३१ मार्चपर्यत सुरू राहणार आहे. आयडीएफसी व महिंद्रा या फंड घराण्यानंतर मागील तीन महिन्यांत बॅलन्स्ड फंडाची सुरुवात करणारे हे तिसरे फंड घराणे आहे. मागील वर्षभरात प्रारंभिक विक्री करणारा हा आठवा बॅलन्स्ड फंड आहे. त्या तुलनेत या बॅलन् स्ड फंडाचे वैशिष्टय़ असे की, या फंडात समभाग गुंतवणूक ५० टक्के, १५ टक्के आर्ब्रिटाज व ३५ टक्के रोखे गुंतवणूक असेल. साहजिकच हा फंड अन्य समभागकेंद्रित बॅलन्स्ड फंडापेक्षा (किमान ६५ टक्के समभाग गुंतवणूक असलेले) कमी चढ-उतार व कमी परतावा असलेला असेल. या फंडाची समभाग गुंतवणूक ही एखाद्या फ्लेक्झीकॅप फंडासारखी असेल, परंतु प्रामुख्याने लार्ज कॅप समभागांचा समावेश असेल. अन्य बॅलन्स्ड फंडाप्रमाणे या फंडाच्या गुंतवणुकीत मिड-कॅप समभागांचे प्रमाण कमी असेल. फंडासाठी आखलेल्या गुंतवणूक परिघात १५० कंपन्यांचा समावेश असून यापैकी ४५-५० कंपन्यांचा समावेश एका वेळी फंडाच्या गुंतवणुकीत असेल. ‘प्राइस टू बुक व्हॅल्यू’ व ‘प्राइस टू अर्निग पर शेअर’ या गुणोत्तरांच्या आधारे पहिली चाळणी लावली जाईल. दुसऱ्या चाळणीसाठी संख्यात्मक विश्लेषणासोबत गुणात्मक विश्लेषण करण्यात येईल. या तीन चाळण्यांनंतर गुंतवणुकीसाठी समभाग निश्चिती करण्यात येईल व समभागांचा प्रत्यक्ष गुंतवणुकीत योग्य त्या प्रमाणात समावेश करण्यात येईल.
या फंडातील गुंतवणुकीचे सक्रिय व्यवस्थापन करण्यात येईल. सर्वसाधारणपणे बॅलन्स्ड फंड समभाग गुंतवणुकीचे सक्रिय व्यवस्थापन करण्यात येते व रोखे गुंतवणूक निष्क्रिय असते. बदलत्या आर्थिक परिमाणानुसार रोख्यांची मुदतपूर्ती राखण्यात फंड व्यवस्थापनाचा भर असेल. व्याजदर वाढण्याची शक्यता असल्यास कमी कालावधी असणाऱ्या रोख्यांत व व्याज दर घसरण्याची शक्यता असल्यास दीर्घ मुदतीच्या रोख्यांत गुंतवणूक केली जाईल. समभाग गुंतवणुकीवर १० ते १२ टक्के, अर्ब्रिटाज गुंतवणुकीवर ५.५ -६ टक्के तर रोखे गुंतवणुकीवर ६.५ ते ७ टक्क्यांपर्यंत परतावा मिळण्याची गुंतवणूकदारांना आशा करता येईल. हा फंड तीन वर्षांत ११ ते १२ टक्के करमुक्त परतावा गुंतवणूकदारांना देईल. या फंडात भांडवली वृद्धी व लाभांश असे दोन पर्याय असून गुंतवणूकदार आपल्या गरजेनुसार योग्य त्या पर्यायाची निवड करू शकतात. क्रिसिल बॅलन्स्ड फंड इंडेक्स हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. गुंतवणूक केल्यापासून (युनिट्स वाटपाच्या तारखेपासून) एका वर्षांच्या आत गुंतवणूक काढून घेतल्यास १ टक्का निर्गमन शुल्क आकारण्यात येईल. या फंडात किमान गुंतवणूक ५,००० रुपये आहे.
दीर्घकालीन वित्तीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी गुंतवणूकदरांनी या फंडाचा समावेश आपल्या गुंतवणुकीत करण्यास हरकत नाही.
बीएनपी पारिबा बॅलन्स्ड फंड : ठळक बाबी
* फंडात भांडवली वृद्धी व लाभांश असे दोन पर्याय असून गुंतवणूकदार आपल्या गरजेनुसार योग्य त्या पर्यायाची निवड करू शकतात.
* क्रिसिल बॅलन्स्ड फंड इंडेक्स हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे.
* गुंतवणूक केल्यापासून (युनिट्स वाटपाच्या तारखेपासून) एका वर्षांच्या आत गुंतवणूक काढून घेतल्यास १ टक्का निर्गमन शुल्क आकारण्यात येईल.
* फंडात किमान गुंतवणूक ५,००० रुपये आहे.
(अस्वीकृती: या स्तंभात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)
shreeyachebaba@gmail.com