एल अॅण्ड टी इन्फ्रास्ट्रक्चर फंड
पायाभूत सुविधा क्षेत्रात ज्यांनी एक ते दीड वर्षांपूर्वी गुंतवणुकीला सुरुवात केली त्यांना या गुंतवणुकीने असामान्य परतावा दिला आहे. आर्थिक आवर्तनानुसार योग्य वेळी गुंतवणूक केली आणि योग्य वेळी काढून घेतली तर सेक्टोरल फंड घसघशीत नफा देतात याचे इन्फ्रास्ट्रक्चर फंड हे सध्याच्या काळातील उदाहरण आहे.
या वर्षीच्या पहिल्या लेखाचे शीर्षक होते, ‘वाट आंधळी, प्रवास खडतर, बोलू काही’. या वर्षीचा प्रवास खडतर असणार याचा अंदाज होता. परंतु या बिकट वाटेवरच्या खडतर प्रवासाला इतक्या लवकर सुरुवात होईल ही अपेक्षा नव्हती. म्हणून मागील दोन वर्षे अर्थसंकल्पानंतर शिफारसप्राप्त म्युच्युअल फंडाची कामगिरी जाणून घेणे योग्य ठरेल. दोन वर्षांपूर्वी १४ मार्च २०१६ रोजी शिफारस केलेल्या सुंदरम रुरल इंडिया फंडाने ९ फेब्रुवारी २०१८च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार ७३ टक्के नफा तर ६ फेब्रुवारी २०१७ रोजी शिफारस केलेल्या एल अॅण्ड टी इन्फ्रास्ट्रक्चर फंडाने ९ फेब्रुवारी २०१८ च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार ३९.३९ टक्के नफा गुंतवणूकदारांच्या पदरात टाकला. ज्या वेळेला या फंडाची शिफारस केली त्या वेळी हे फंड त्या त्या फंड घराण्यांचे सर्वाधिक निधी मिळविणारे फंड नव्हते. परंतु चार सहा महिन्यांत हे फंड त्या त्या फंड घराण्यांच्या गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती लाभलेल्या फंडांच्या यादीत समाविष्ट झाले. सालाबादनुसार या वर्षीसुद्धा अर्थसंकल्पपश्चात सखोल विश्लेषणाअंती विविध निष्कर्षांतून दोन फंड नवीन गुंतवणुकीस पात्र ठरले. यापैकी एल अॅण्ड टी इन्फ्रास्ट्रक्चर फंड.
मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून सादर झालेल्या अर्थसंकल्पात ग्रामीण भारतासाठी आणि पायाभूत सुविधांसाठी मोठी तरतूद होऊ लागली. परिणामी इन्फ्रास्ट्रक्चर फंडांनी डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडांपेक्षा अधिक परतावा दिल्याचे स्पष्ट दिसत आहे. आर्थिक आवर्तनानुसार योग्य वेळी गुंतवणूक केली आणि योग्य वेळी काढून घेतली तर सेक्टोरल फंड घसघशीत नफा देतात याचे इन्फ्रास्ट्रक्चर फंड हे सध्याच्या काळातील उदाहरण आहे.
फंडाच्या गुंतवणुकीत ५०-५२ समभागांचा समावेश आहे. फंडाची सर्वाधिक गुंतवणूक लार्सन अॅण्ड टुब्रो, भारती एअरटेल, ग्रॅफाईट इंडिया, रॅम्को सिमेंट आणि श्री सिमेंट या समभागांत केली आहे. फंडाच्या गुंतवणुकीत लार्सन अॅण्ड टुब्रो, इंजिनीअर्स इंडिया, अशोका बिल्डकॉन, इंडियन ह्य़ूम पाइप यांसारख्या पायाभूत सुविधा विकासाशी थेट संबंध असलेल्या तर ओसीएल इंडिया, एसीसी, इंडिया सिमेंट, टाटा स्टील, जिंदाल स्टील अॅण्ड पॉवर यांसारख्या अप्रत्यक्ष लाभार्थी ठरणाऱ्या समभागांचा समावेश आहे. गृहबांधणी क्षेत्रातील ओबेरॉय रियाल्टी, गोदरेज प्रॉपर्टीज यांसारखे विकासक, भारत फोर्ज, काबरेरंडम युनिव्हर्स, कमिन्स इंडिया, ओरिएंटल रिफ्रॅक्टरीजसारख्या औद्योगिक वापराच्या वस्तूंचा समावेश आहे. फंड व्यवस्थापन सेक्टर रोटेशनच्या माध्यमातून गुंतवणुकीचे सक्रिय व्यवस्थापन करत आहे. एका वर्षांपूर्वी या फंडाची शिफारस केली तेव्हा सिमेंट उद्योग सर्वाधिक गुंतवणूक असलेले उद्योगक्षेत्र होते. अर्थव्यवस्थेला गती मिळण्याच्या अपेक्षेने केलेली गुंतवणूक फळल्याने औद्योगिक उत्पादने सर्वाधिक गुंतवणूक असलेले उद्योगक्षेत्र आहे.
पायाभूत सुविधांसाठी मागील अर्थसंकल्पातील तरतुदींपेक्षा २१ टक्के अधिक तरतूद या अर्थसंकल्पात केली आहे. या वर्षी ५.९७ लाख कोटींची तरतूद पायाभूत विकासासाठी केली असून या व्यतिरिक्त १.४६ लाख कोटींची तरतूद रेल्वे स्टेशन विकास आणि रेल्वेविषयक पायाभूत सुविधा विकासासाठी तरतूद केली आहे. मागील वर्षीपेक्षा १२० टक्के अधिक म्हणजे ६४ हजार कोटींची तरतूद परवडणाऱ्या घरांच्या विकासासाठी केलेली आहे. सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेत ९९ शहरांचा समावेश करून सौर ऊर्जा, इंटेलिजन्ट ट्रान्सपोर्टसाठी २ लाख कोटींची तरतूद केली आहे. नमामि गंगे प्रकल्पांतर्गत १८७ प्रकल्पांसाठी १६,७१३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ‘उडान’ योजनेअंतर्गत नवीन ५६ शहरे हवाई मार्गाने जोडली जाणार आहेत. या सरकारी धोरणांच्या लाभार्थी समभागातून या फंडाने गुंतवणूक केली आहे.
जानेवारी-डिसेंबर २०१७ या कालावधीत इन्फ्रास्ट्रक्चर फंडाचा सरासरी परतावा ३८ टक्के होता. या वर्षी इन्फ्रास्ट्रक्चर फंड मागील वर्षांप्रमाणे गगनाला भिडणारा परतावा देणार नाहीत तरीसुद्धा माफक परंतु डायव्हर्सिफाईड फंडापेक्षा अधिक परताव्याच्या अपेक्षेने या फंडांत गुंतवणुकीचा विचार करावयास हरकत नाही. एल अॅण्ड टी इन्फ्रास्ट्रक्चर फंडाच्या गुंतवणुकीत ३१ डिसेंबर २०१७ रोजी एकूण ६१.२ टक्के गुंतवणूक ही इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमधील समभागांत होती. या फंडाला रिलायन्स डायव्हार्सिफाईड पॉवर सेक्टर फंड, आयडीएफसी इन्फ्रास्ट्रक्चर फंड, सुंदरम इन्फ्रास्ट्रक्चर अॅडव्हान्टेज हे पर्यायी फंड आहेत. या फंडाचे विश्लेषण भविष्यात वाचकांच्या भेटीला येईलच. सौमेंद्रनाथ लाहिरी यांच्यासारख्या कुशल निधी व्यवस्थापकामुळे हा फंड अन्य पर्यायी फंडाच्या तुलनेत उजवा आहे. आपल्या जोखीम स्वीकृतीच्या क्षमतेनुसार या फंडाचा गुंतवणुकीत समावेश करावा.
वसंत माधव कुळकर्णी shreeyachebaba@gmail.com
(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)