प्रिन्सिपल बॅलंस्ड फंड
मागील बारा महिन्यांत गुंतवणूकदारांची सर्वाधिक पसंती बॅलंस्ड फंडांना लाभली. मागील जून महिन्यात बॅलंस्ड फंडांची सरासरी मालमत्ता २८,२९६ कोटी होती. जून २०१७ अखेरच्या उपलब्ध आकडेवारीनुसार बॅलंस्ड फंडांची सरासरी मालमत्ता ४१,८४६ कोटींवर पोहचली आहे. मागील बारा महिन्यांत बॅलंस्ड फंडांतील सरासरी मालमत्तेत ४८ टक्के वृद्धी झाली आहे. अल्प जोखीम क्षमता असलेले जे गुंतवणूकदार बॅलंस्ड फंडांकडे वळले आणि या पर्यायाने गुंतवणूकदारांची निराशा केली नाही. ज्या मोजक्या बॅलंस्ड फंडांनी डायव्हर्सिफाईड इक्विटी फंडांपेक्षा चांगला परतावा दिला त्यात प्रिन्सिपल बॅलंस्ड फंडाचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.
गुंतवणुकीच्या ७० टक्कय़ांहून अधिक समभाग गुंतवणूक नसलेला प्रिन्सिपल बॅलंस्ड फंड सध्या बॅलंस्ड फंडांच्या वर्गवारीत अग्रस्थानी आहे. प्रिन्सिपल बॅलंस्ड फंडाची ओळख करून घेण्यापूर्वी या फंड घराण्याची ओळख करून घेणे गरजेचे आहे. प्रिन्सिपल म्युच्युअल फंड हे फारसे परिचित नसलेले फंड घराणे आहे. या फंड घराण्याच्या योजनांची शिफारस म्युच्युअल फंड विक्रेते सहसा करीत नाहीत. प्रिन्सिपल फायनान्शियल ग्रुप हा विमा व गुंतवणूक व्यवस्थापन क्षेत्रातील प्रसिद्ध समूह आहे. अमेरिकेत १८७९ मध्ये स्थापन झालेल्या या समूहाने भारतात आयडीबीआयसोबत सन २००० मध्ये संयुक्त कंपनी स्थापन करून व्यवसायास सुरुवात केली. २००४ मध्ये आयडीबीआयचा भांडवली हिस्सा ‘पंजाब नॅशनल बँक – पीएनबी’ने विकत घेतल्यापासून हा म्युच्युअल फंड प्रिन्सिपल पीएनबी म्युच्युअल फंड या नावाने ओळखला जातो. या फंड घराण्याच्या आठ इक्विटी, एक बॅलंस्ड व काही रोखे गुंतवणूक करणाऱ्या योजना आहेत. चांगल्या फंडाला नेहमीच गुंतवणूकदारांची पसंती मिळत असते. जून २०१५ मध्ये २३ कोटी मालमत्ता असलेल्या या फंडाची मालमत्ता जुलै २०१७ च्या गुंतवणूकपत्रकानुसार २७३ कोटी झाली आहे. दोन वर्षांत फंडाच्या मालमत्तेत ११ पटीहून अधिक वृद्धी झाली आहे. बँकांच्या मुदत ठेवींमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार मासिक लाभांश देणाऱ्या बॅलंस्ड फंडांकडे वळल्याचे आढळले आहे. मात्र हा फंड काही बॅलंस्ड फंडांप्रमाणे मासिक लाभांश देणारा फंड नसूनही या फंडास सजग गुंतवणूकदारांची पसंती लाभली आहे याची दखल घेणे गरजेचे आहे.
१४ जानेवारी २००० रोजी या फंडाची पहिली एनएव्ही जाहीर झाली. या दिवसापासून प्रिन्सिपल बॅलंस्ड फंडात मासिक ५,००० रुपयांची नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांच्या १०.५५ लाखाचे २ ऑगस्टच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार ४४.८० लाख रुपये झाले असून परताव्याचा वार्षिक दर १४.८५ टक्के आहे. फंडाच्या प्रारंभापासून म्हणजे एनएफओच्या वेळी गुंतविलेल्या १ लाख रकमचे २ ऑगस्टच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार ६.९६ लाख रुपये झाले आहेत. हा फंड १ वर्ष, ३ वर्षे, ५ वर्षे परताव्याच्या कामगिरीनुसार पहिल्या पाच फंडात स्थान मिळवून आहे. फंडाची अन्य बॅलंस्ड फंडांशी तुलना केली असता, फंडाचा ३ वर्षांचा चलत सरासरी परतावा ८५ टक्के बॅलंस्ड फंड गटातील तीन वर्षांच्या परताव्याच्या चलत सरसरीपेक्षा अधिक आहे. फंडाचा ५ वर्षांचा चलत सरासरी परतावा हा ९८ टक्के बॅलंस्ड फंड गटातील ५ वर्षांच्या चलत सरसरी परताव्यापेक्षा अधिक आहे. फंडाने एकूण मालमत्तेपैकी २९ टक्के गुंतवणूक रोख्यांत केली असून ६७ टक्के समभाग गुंतवणूक आहे. फंडाच्या ३१ जुलै २०१७च्या गुंतवणूक पत्रकानुसार समभाग गुंतवणुकीत बँका, उपभोग्य वस्तू, आरोग्य निगा, आर्थिक सेवा व तेल उत्पादने ही सर्वाधिक गुंतवणूक असलेली उद्योग क्षेत्रे आहेत. हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, चम्बल फर्टिलायझर, रिलायन्स इंडस्ट्रीज, फिलीप कार्बन ब्लँक हे आघाडीचे पाच गुंतवणूक असलेले समभाग आहेत. फंडाच्या गुंतवणुकीत उपभोग्य व औषध निर्माण या सुरक्षित समजल्या जाणाऱ्या आणि बँका व वाहन उद्योगासारख्या आर्थिक आवर्तनाशी निगडित उद्योग क्षेत्रांचा योग्य मेळ साधलेला दिसतो.
निर्देशांक वर जाण्यास अर्थव्यवस्थेसोबत मुबलक उपलब्ध रोकड सुलभताही कारणीभूत असते. जगभरातील अनेक देशांच्या मध्यवर्ती बँकांनी त्या त्या देशांच्या अर्थव्यवस्थांना चालना देण्यासाठी उपभोगस्नेही धोरण स्वीकारले. परिणामी जगातील सर्वच देशांत रोकड सुलभता वाढली. सध्या मात्र युरोप, अमेरिका व जपान या देशांत अर्थव्यवस्थेचा वृद्धीदर स्थिरावताना दिसत असल्याने, या देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या धोरणांची दिशा उपभोगस्नेही धोरणाकडून अर्थव्यवस्थेतील रोकड सुलभता आटविण्याकडे वळली आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँक – फेडने, ताळेबंदाचा आकार घटवून अतिरिक्त रोकड सुलभता कमी करण्याच्या दिशेने कूच करण्यास सुरुवात केली आहे. ही आटलेली रोकड सुलभता पाहता, निधीचा ओघ उभरत्या अर्थव्यवस्थांकडून विकसित अर्थव्यवस्थांकडे वळेल. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी त्यांच्या गुंतवणुकीची काळजी घेण्याची गरज आहे. आपल्या गुंतवणुकीचे पुनरावलोकन करणे मग आवश्यक ठरेल. गुंतवणूकदाराची जोखीम क्षमता, उत्पन्नात झालेले बदल, बदललेल्या आर्थिक जबाबदाऱ्या यानुसार फंडाची निवड करणे गरजेचे असते. ही निवड करताना देशांतर्गत व जागतिक आर्थिक परिवर्तनाचे भान राखणे गरजेचे असते. फंडाची गुंतवणूक तत्त्वे, जोखीम नियंत्रित करण्यासाठी निधी व्यवस्थापकाकडे आवश्यक घटक, प्रसंगी प्रवाहाविरुद्ध जाण्यासाठी आवश्यक असलेला आत्मविश्वास यावर फंडाची कामगिरी ठरते. रजत जैन हे या फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत. पीव्हीके मोहन हे या फंडाचे मे २०१० पासून समभाग निधी व्यवस्थापक असून, बेक्सी कुरियाकोस या मार्च २०१६ पासून रोखे गुंतवणूक व्यवस्थापिका आहेत. या फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी रजत जैन हे अनुभवी आणि द्रष्टय़ा निधी व्यवस्थापकांपैकी एक आहेत.
‘पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो’ हे गुंतवणुकीतील समभाग बदलाची गती मोजण्याचे गुणोत्तर आहे. निधी व्यवस्थापक जितका द्रष्टा तितका पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो कमी. चढत्या बाजारात ‘पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो’ कमी असायला हवा. प्रिन्सिपल बॅलंस्ड फंडाचा समावेश कमी ‘पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो’ असलेल्या फंडात होतो. ‘पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो’ जितका अधिक तितका खरेदी-विक्रीचा खर्च अधिक, परिणामी ‘एक्स्पेन्स रेशो’ अधिक. प्रिन्सिपल बॅलंस्ड फंडाच्या रेग्युलर प्लानचा ‘एक्स्पेन्स रेशो’ २.८७ टक्के आहे.
फंडाचा एका वर्षांचा चलत सरासरी परतावा १०० टक्के बॅलंस्ड फंड गटातील एका वर्षांच्या चलत सरसरी परताव्यापेक्षा अधिक आहे. फंडाची ३ वर्षांची चलत सरासरी २३ टक्के असून हा बॅलंस्ड फंड असल्याने ३० टक्के गुंतवणूक कायम रोख्यांत गुंतविलेली असून देखील परताव्याचा दर अनेक डायव्हर्सिफाईड इक्विटी फंडांपेक्षा अधिक आहे. फंडाचा एका वर्षांचा परतावा २ ऑगस्टच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार २६.६४ टक्के, ३ वर्षांचा परतावा १५.५१ टक्के, ५ वर्षांचा परतावा १८.२९ टक्के आणि १० वर्षांचा परतावा ११.२६ टक्के आहे. अधिक स्पष्टपणे सांगायचे तर यूटीआय मिड कॅप फंडाचा एका वर्षांचा परतावा २ ऑगस्टच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार १६ टक्के, ३ वर्षांचा वार्षिक परतावा २०.३ टक्के आहे. केवळ याच नव्हे तर यासारख्या अनेक मिड कॅप फंडापेक्षा प्रिन्सिपल बॅलंस्ड फंडाचा परतावा अधिक आहे. १७ वर्षे पूर्ण झालेला हा फंड दिवसेंदिवस परिपक्व होताना दिसत आहे. या फंडाची मागील पाच वर्षांची कामगिरी अनेक इक्विटी फंडांपेक्षा सरस आहे.
आज एक त्रिवेणी योग जुळून आला आहे. ऑगस्ट महिन्याच्या ७ तारखेला श्रावणातील तिसरा सोमवार आणि नारळी पौर्णिमा एकत्र येण्याचा योग आलेला आहे. दर महिन्याच्या ७ तारखेला ‘म्युच्युअल फंड डे’ साजरा होतो. अर्थसाक्षर भावांनी आपल्या बहिणींना रक्षा बंधनाची ‘रिटर्न गिफ्ट’ म्हणून या फंडातील एसआयपी द्यावी असा हा फंड आहे. आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्लय़ानुसार या फंडाची ‘रिटर्न गिफ्ट’ द्यावी किंवा आपल्या गुंतवणुकीत प्रिन्सिपल बॅलंस्ड फंडाचा समावेश आपल्या गुंतवणुकीसाठी करावा यासाठी ही शिफारस.
वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com