प्रिन्सिपल टॅक्स सेव्हिंग्ज फंड

शुद्ध विमा, ईएलएसएस फंड आणि एनपीएस हे प्रत्येक करदात्याच्या करनियोजनाचा भाग असायला हवेत. ईएलएसएस फंड गटात वीस वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात असलेला प्रिन्सिपल टॅक्स सेव्हिंग्ज फंड करदात्यांसाठी कर वजावटीसोबत संपत्तीची निर्मिती करीत आहे. मागील पाच वर्षांतील तर त्याच्या कामगिरीचे वर्णन ‘उत्कृष्ट’ असेच करावे लागेल..

विमा आणि म्युच्युअल फंड गुंतवणूक या विषयाला वाहिलेल्या एका मासिकात एक लेख वाचनात आला. मागील वर्षी देशातील सर्वात मोठय़ा विमा कंपनीने १.८० लाख कोटीची रक्कम विमा पॉलीसींच्या मुदतपूर्ती आणि विमा दाव्यापोटी पॉलिसीधारकांना परत केली. या रकमेच्या तुलनेत या विमा कंपनीला केवळ १.१० लाख कोटी नवीन पॉलिसीच्या पहिल्या हप्त्यापोटी परत मिळाले. याचा अर्थ ७० लाख कोटींची रक्कम अन्य गुंतवणूक साधनांत गुंतवण्यात आली किंवा या पॉलिसीच्या लाभार्थ्यांनी खर्च केली. ही मुदतपूर्ती १५ ते २० वर्षे मुदतीच्या कालावधीच्या पॉलीसींची असल्याने त्या काळात कर वजावटीसाठी विमा खरेदी करण्याची मानसिकता होती. दिवसेंदिवस कर वजावटीसाठी अन्य पर्याय उपलब्ध होत असल्याने विम्यासारख्या पारंपरिक पर्यायावर भिस्त कमी होत असल्याचे दिसून येते. जी रक्कम अन्य साधनांत गुंतवण्यात आली त्या रकमेचा मोठा वाटा म्युच्युअल फंडाच्या कर वजावट पात्र (ईएलएसएस) फंडांना मिळाल्याचे आकडेवारी दर्शवत आहे. जोखीम स्वीकारून धाडसी गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी करनियोजनात ईएलएसएस फंडांना पसंती दिली आहे. कर बचतीसाठी गुंतवणूक पर्यायांपैकी ‘ईएलएसएस फंडां’त नियोजनबद्ध पद्धतीने केलेली दीर्घकालीन गुंतवणूक सर्व उपलब्ध पर्यायांपेक्षा अधिक परतावा देते.

‘प्रिन्सिपल टॅक्स सेव्हिंग्ज फंड’ हा असाच एक कर बचत आणि परताव्यात सातत्य राखल्यामुळे भांडवली वृद्धी देणारा फंड आहे. या फंडात मागील पाच वर्षे दरमहा ८३२५ रुपये नियोजनबद्ध गुंतवणूक (वार्षिक १ लाख रुपये) केलेल्या गुंतवणुकीचे ११ डिसेंबर २०१७ च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार नऊ लाख झाले असून परताव्याचा वार्षिक दर २३.८४ टक्के आहे. या व्यतिरिक्त ३० टक्के कर कक्षेत असलेल्या करदात्याची दरवर्षी ३०९०० रुपये करबचत झाली आहे. १ एप्रिल १९९६ रोजी या फंडात गुंतविलेल्या रेग्युलर ग्रोथ विकल्पात गुंतविलेल्या १ लाखाचे ११ डिसेंबर २०१७ च्या एनएव्हीनुसार २१ वर्षे सात महिन्यांत २१.७७ लाख रुपये झाले असून परताव्याचा वार्षिक दर १५.२५ टक्के आहे. पीव्हीके मोहन हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. ते २०१० पासून प्रिन्सिपल म्युच्युअल फंडाच्या सेवेत असून त्यापूर्वी ते डीएसपी ब्लॅकरॉकमध्ये कार्यरत होते. एस अँड पी बीएसई २०० हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. फंडाची एकूण मालमत्ता ३८२.६२ कोटी आहे. फंडाची पहिली एनएव्ही ३१ मार्च १९९६ रोजी जाहीर झाली. पहिल्या एनएव्हीपासून या फंडात ५००० रुपयांची नियोजनबद्ध गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या १३.०५ लाख गुंतवणुकीचे ११ डिसेंबर २०१७ च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार १.११ कोटी झाले असून परताव्याचा वार्षिक दर १६.९४ टक्के आहे.

फंडाच्या गुंतवणुकीत ५३ टक्के लार्ज कॅप, ३८ टक्के मिड कॅप आणि ६.७८ टक्के स्मॉल कॅप समभागांचा समावेश आहे. गुंतवणुकीसाठी फंडाने सर्वाधिक गुंतवणुकीसाठी पसंती खासगी मालकीच्या बँका, ग्राहकोपयोगी वस्तू, वाहन उद्योग, राष्ट्रीयीकृत बँका आणि आरोग्य निगा या क्षेत्रांना दिली आहे. फंडाच्या गुंतवणुकीत एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, स्टेट बँक आणि युनायटेड स्पिरिट्स या सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या कंपन्या आहेत. नोव्हेंबरअखेरीस फंडाच्या गुंतवणुकीत ६४ कंपन्यांचा समावेश होता. तर एप्रिल महिन्यात फंडाच्या गुंतवणुकीत ५६ कंपन्यांचा समावेश होता. मागील महिन्यांत फंडाच्या गुंतवणुकीत टाटा पॉवर आणि ग्लॅक्सो कन्झ्युमर हेल्थकेअर या दोन कंपन्यांचा समावेश करण्यात आला. गुंतवणुकीतील समभागकेंद्रित धोका कमी करण्याच्या दृष्टीने निर्देशांकात वाढ होत असल्याने गुंतवणुकीतील समभागांची संख्या वाढवत जोखमीचे विकेंद्रीकरण करण्याकडे निधी व्यवस्थापकांचा प्रयत्न आहे.

ईएलएसएस फंड गटात, जानेवारी २००४ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत ५५ तिमाहींपैकी ४८ तिमाहीत हा फंड ‘टॉप क्वारटाइल’मध्ये राहिला आहे. जानेवारी २०११ पासून फंडाने परताव्याच्या यादीत आपले अव्वल स्थान कायम राखले आहे.  फंडाच्या गुंतवणुकीत आर्थिक आवर्तनाशी संबंधित असलेल्या अग्रेसिव्ह आणि आरोग्य निगा, ग्राहकोपयोगी वस्तूसारख्या डिफेन्सिव्ह समभागांचा समतोल साधण्यात आलेला असला तरी अर्थगतीच्या बदलाचा फायदा होणाऱ्या बँकिंग आणि वित्तीय सेवा, वाहन उद्योग, सिमेंट, बांधकाम क्षेत्रातील समभागांचा प्रभाव गुंतवणुकीत स्पष्ट दिसत आहे. फंडाचा ‘पोर्टफोलिओ टर्नओव्हर रेशो’ ०.४ आहे. ईएलएसएस फंड गटातील अन्य फंडाच्या तुलनेत या फंडात समभागांची उलाढाल कमी असल्याने निधी व्यवस्थापन फंडातील गुंतवणूक निर्णय विचारपूर्वक घेऊन दीर्घकाल गुंतवणुकीत बदल करीत नसल्याचे हे द्योतक आहे. निधी व्यवस्थापक पीव्हीके मोहन आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी रजत जैन हे गुंतवणूकपूर्व समभाग संशोधनासाठी पुरेसा वेळ देत असल्याने या संशोधनाची परिणती गुंतवणूकपश्चात भरघोस परताव्यात होत आहे. या फंडाला ईएलएसएस फंड गटात तीन, पाच आणि १० वर्षे परताव्याच्या क्रमवारीत अव्वल स्थान राखण्यात मागील दोन वर्षांपासून यश आले आहे. वर्ष २०१२ ते २०१६  दरम्यान फंडाचा जानेवारी-डिसेंबर या कालावधीतील परतावा ईएलएसएस फंड गटातील याच कालावधीतील सरासरी पराताव्यापेक्षा तीन ते सहा टक्क्यांनी अधिक आहे. फंडाची मागील पाच वर्षांतील वार्षिक प्रमाणित विचलन आणि शार्प रेशो यांची तुलना केल्यास हा फंड मागील पाच वर्षे कायम पहिल्या पाच क्रमांकात राहिला आहे. आवश्यक तेवढी जोखीम स्वीकारून गुंतवणूकदारांना पुरेसा परतावा देणारी ही रजत जैन आणि पीव्हीके मोहन यांची जोडी दीर्घ कालावधीत गुंतवणूकदारांसाठी संपत्ती निर्मिती करीत राहील. प्रिन्सिपल टॅक्स सेव्हिंग्ज फंडाला करदात्यांना कर वजावटीसोबत संपत्तीची निर्मिती करण्याचा दोन दशकांचा इतिहास आहे. वीस वर्षांहून अधिक काळापासून अस्तित्वात असलेला हा फंड मागील पाच वर्षांत संपत्ती निर्माण करण्यात आघाडीवर असलेल्या फंडांपैकी एक आहे. फंडाची या पाच वर्षांतील कामगिरीचे वर्णन ‘उत्कृष्ट’ असेच करावे लागेल.

शुद्ध विमा, ईएलएसएस फंड आणि एनपीएस हे प्रत्येक करदात्याच्या करनियोजनाचा भाग असायला हवेत. परताव्याच्या तुलनेत सर्वात तळाला असलेले म्हणून संपत्तीची निर्मिती करण्याच्या दृष्टीने कुचकामी असलेली विमा उत्पादनांनी कर वजावटीसाठी असलेल्या बाजारपेठेचा मोठा हिस्सा काबीज केला आहे. आर्थिक साक्षरतेचा प्रसार होत असल्याने गुंतवणूकदार ‘नीरक्षीरविवेका’नुसार ईएलएसएस योजनांचा समावेश कर नियोजनासाठी करू लागले असल्याचे आकडेवारी दर्शवीत आहे. विमा उत्पादने ही निश्चित कालावधीसाठी विम्याचे हप्ते भरल्यावर निश्चित कालावधीनंतर पैसे अंशत: पैसे परत मिळतात. हा निश्चित कालावधी वित्तीय ध्येयांशी मिळताजुळता असेलच असे नाही. ही लवचीकता ईएलएसएस फंडातील गुंतवणुकीत आहे. गुंतवणूक करताना एकरकमी किंवा नियोजनबद्ध ‘एसआयपी’ पद्धतीने गुंतवणूक करून तीन वर्षांनतर गरज भासेल तेव्हा गुंतवणुकीतून अंशत: किंवा संपूर्ण रक्कम काढून घेता येते. दर तीन वर्षांनंतर रक्कम करमुक्त काढता येत असल्याने तीन वर्षांचे एक आवर्तन तयार करून दर तीन वर्षांनी रक्कम काढून पुन्हा गुंतवणूक केल्यास त्या त्या वर्षांत कर वजावटीचा लाभ घेता येणे शक्य आहे. विमा उत्पादनांत पूर्वनिश्चित करमुक्त रक्कम देण्याची जबाबदारी विमा कंपन्या घेत असल्या तरी परताव्याचा दर पाच-सहा टक्क्यांदरम्यान आहे. ईएलएसएस गुंतवणुकीत परताव्याची खात्री नसल्याने गुंतवणुकीत धोका पत्करण्याबद्दल, गुंतवणूकदार विमा उत्पादनांच्या तुलनेत भरघोस परतावा मात्र मिळवीत असतात. समभाग गुंतवणूक दीर्घ कालावधीसाठी केल्यास भरघोस परतावा मिळत असल्याने प्रत्येक करदात्याने आपापल्या जोखीम स्वीकारण्याच्या क्षमतेनुसार कर नियोजनासाठी कराव्या लागणाऱ्या गुंतवणुकीपैकी पूर्ण अथवा अंशत: गुंतवणूक ईएलएसएस फंडात केल्यास करनियोजनाबरोबर संपत्तीची निर्मिती करता येणे शक्य आहे.

(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba @gmail.com