रिलायन्स रेग्युलर सेव्हिंग्ज फंड (बॅलंस्ड ऑप्शन) एक दृष्टिक्षेप..
दीर्घकालीन भांडवली वृद्धीसाठी नेमका कोणता म्युच्युअल फंड निवडावा हा एक गुंतवणूकदारांपुढील सामान्य प्रश्न आहे. याबद्दल संशोधकांचे शोधनिबंध वेगवेगळ्या आर्थिक विषयाशी संबंधित जर्नल्समधून प्रकाशित होत असतात. जवळच्या भूतकाळातील नफा हा निकष न ठेवता परताव्यात सातत्य हा निकष असायला हवा, यावर बहुताशांचे एकमत झालेले दिसून येते.
विद्यमान आर्थिक वर्षांच्या सुरुवातीपासून ‘सिप’ या गुंतवणूक पद्धतीवर गुंतवणूकदारांची भिस्त वाढत आहे. ऑक्टोबरअखेरीस सक्रिय म्युच्युअल फंड खात्यांची संख्या १.७३ कोटी होती. ‘अॅम्फी’च्या आकडेवारीनुसार या खात्यांतून ५,६९३ कोटी रुपये रक्कम सरलेल्या नोव्हेंबर महिन्यांत गुंतविण्यात आली. एप्रिल २०१६ ते मार्च २०१७ या कालावधीत एकूण ४३,९२१ कोटी म्युच्युअल फंडांच्या ‘एसआयपी’द्वारा गुंतविण्यात आले होते. तर चालू आर्थिक वर्षांच्या एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत ‘सिप’च्या माध्यमातून ४०,७८० कोटी रक्कम गुंतविण्यात आली. एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत दरमहा सरासरी ९.०५ लाख खात्यांची भर पडली असून दरमहा २५० कोटी रुपयांची वाढ म्युच्युअल फंडांच्या एसआयपीद्वारा गुंतविण्यात येणाऱ्या रकमेत होत आली आहे. या गुंतवणुकीचा मोठा हिस्सा बॅलंस्ड फंडात गुंतविण्यात आला. ‘सेबी’ने म्युच्युअल फंडाच्या योजनांचे प्रमाणीकरण करण्याचे ठरविले असून भविष्यात सर्व फंड केवळ पाच प्रकारात विभागले जातील. एप्रिल २०१८ पासून अस्तित्वात येणाऱ्या या वर्गीकरणानुसार बॅलंस्ड फंड हे ‘हायब्रीड फंड’ म्हणून ओळखले जातील. ६५ ते ८० टक्क्यांपर्यंत समभाग गुंतवणूक असलेले बॅलंस्ड फंड यानंतर ‘अग्रेसिव्ह हायब्रीड फंड’ म्हणून ओळखण्यात येतील. अनेक बॅलंस्ड फंडांच्या निधी व्यवस्थापकांनी मागील दोन वर्षांपासून आपल्या समभाग गुंतवणुकीचा कल मिड कॅपकडे झुकलेला ठेवल्यामुळे या फंडाचा परतावा हा लार्ज कॅपकडे झुकलेल्या समभागसंलग्न अर्थात इक्विटी फंडापेक्षा अधिक आहे. परंतु मिड कॅप गुंतवणुकीमुळे या फंडाची जोखीमदेखील अधिक आहे. रिलायन्स रेग्युलर सेव्हिंग्ज फंड (बॅलंस्ड ऑप्शन) या फंडाचे विश्लेषण २४ जुलैला अर्थ वृत्तान्तमध्ये केले असूनही पुन्हा एकदा या फंडाची ओळख वाचकांना नव्याने करून देण्यास हेच कारण आहे. रिलायन्स रेग्युलर सेव्हिंग्ज फंड (बॅलन्स्ड ऑप्शन) या फंडाची गुंतवणूक लार्ज कॅपकडे झुकलेली असल्याने या फंडाचा परतावा अन्य फंडाच्या तुलनेत दर्शनी कमी भासत असला तरी फंडाची कार्यक्षमता मोजण्याच्या पट्टीवर हा फंड अव्वल ठरला आहे. फंडाचा परतावा आणि फंडाची कार्यक्षमता मोजण्याची मापके कोष्टक क्रमांक १ मध्ये दाखविली आहेत.
सोबतच्या कोष्टकातील आकडेवारीवरून, ‘रिस्क रिवॉर्ड मेट्रिक्स’चा विचार करता, हा फंड अव्वल ठरलेला आढळतो. हा फंड अव्वल ठरण्यास जी महत्त्वाची कारणे आहेत, त्यानुसार अन्य फंडाच्या तुलनेत या फंडाची समभाग गुंतवणूक ७०-७५ टक्क्यांपेक्षा अधिक नसते. सध्या समभाग गुंतवणूक या फंडाच्या एकूण मालमत्तेच्या ६८ टक्के आहे. एचडीएफसी बँक, ग्रासिम, आयसीआयसीआय बँक आणि इन्फोसिस, लार्सन अॅण्ड टुब्रो आणि रिलायन्स इंडस्ट्रीज हे समभाग सर्वाधिक गुंतवणूक असलेले आहेत. या फंडाला मिड कॅपमध्ये तीन टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक करण्याची ‘सेबी’ने मान्य केलेल्या ‘ऑफर डॉक्युमेंट’नुसार अनुमती नाही. सध्या या फंडाची मिड कॅप गुंतवणूक दोन टक्के असून येऊ घातलेल्या ‘सेबी’च्या नवीन प्रमाणीकरण नियमानुसार मिड कॅप गुंतवणूक कमी होणार आहे. या फंडाने आयआरबीच्या इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्टमध्ये गुंतवणूक केली आहे. पहिल्या दहा गुंतवणुकांमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट (इन्व्हिट) गुंतवणूक असलेला हा फंड एकमेवाद्वितीय आहे. मागील महिन्याभरात फंडाने विजया बँक, रिलायन्स कम्युनिकेशन आणि भारत रोड नेटवर्क्स यांना गुंतवणुकीतून वगळले असून टाटा मोटर्स आणि भारती एअरटेल, एनएलसी इंडियाचा नव्याने समावेश केला आहे.
जगभरात म्युच्युअल फंड या विषयाशी संबंधित संशोधन सुरूअसून दीर्घकालीन भांडवली वृद्धीसाठी नेमका कोणता म्युच्युअल फंड निवडावा याबद्दल संशोधकांचे शोधनिबंध वेगवेगळ्या आर्थिक विषयाशी संबंधित जर्नल्समधून प्रकाशित होत असतात. जवळच्या भूतकाळातील नफा हा निकष न ठेवता परताव्यात सातत्य हा निकष असायला हवा. हा निकष या फंडाला लावायचा ठरविल्यास या फंडाने मागील १२ वर्षांत ४८ पैकी ४२ तिमाहीत संदर्भ निर्देशांकापेक्षा अधिक परतावा दिला आहे. ४८ पैकी ४५ तिमाहीत या फंडाने ‘टॉप क्वारटाइल’मधील स्थान अबाधित राखले आहे.
या फंडात दीर्घकालीन भांडवली वृद्धीसाठी ‘स्टेप अप एसआयपी’ हा पर्याय नक्कीच उपयुक्त ठरतो. एखाद्या गुंतवणूकदाराने या फंडात मागील १० वर्षे दरमहा पाच हजार रुपयांनी सुरू होणारी आणि १० टक्के वार्षिक वाढ असलेली ‘स्टेप अप एसआयपी’ केली असती, तर १२ डिसेंबर २००७ ते १ डिसेंबर २०१७ दरम्यान १०.१८ लाखांच्या गुंतवणुकीचे ८ डिसेंबर २०१७च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्ही नुसार ४७.३७ लाख रुपये झाले असते. यात परताव्याचा दर ३३.३७ टक्के आहे. या फंडातून एकूण गुंतवणुकीच्या १० टक्के रक्कम पहिल्या वर्षी शुल्करहित काढता येत असल्याने सेवा निवृत्तीपश्चात गुंतवणुकीसाठी हा फंड आदर्श गुंतवणूक ठरतो. १ डिसेंबर २०१२ रोजी या फंडात एकरकमी १० लाख गुंतविले असते आणि १ जानेवारी २०१३ पासून दरमहा पाच हजार ‘एसडब्यूपी’द्वारे काढून घेतले असते आणि काढून घेतलेल्या रकमेत दरवर्षी वर्षी १० टक्के वाढ केली असती तर १ जानेवारी २०१२ ते १ डिसेंबर २०१७ या कालावधीत ३.६० लाखांची एकूण रक्कम गुंतवणुकीतून काढून घेता आली असती. तरी फंडात १६.०६ लाख रुपये रक्कम शिल्लक असती. या व्यवहारात १६.३२ टक्के वार्षिक परतावा मिळाला असता.
मागील दहा वर्षांत संचयाच्या काळात १० टक्के वाढ आणि काढून घेताना १० टक्के अधिक रक्कम मागील पाच वर्षांत काढून घेतली तर दोन आकडय़ांत परतावा असणारे जे तीन हायब्रीड फंड आहेत त्यापैकी हा एक फंड असल्याकारणाने हा फंड सेवा निवृत्तीपश्चात करायाच्या बचतीसाठी एक चांगले गुंतवणूक साधन आहे. विविध पर्यायांमधून या फंडाची शिफारस २४ जुलै रोजी करूनही हा फंड पुन्हा एकदा वाचकांच्या भेटीला आणण्याचे हेच कारण आहे.
(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)
वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com