टाटा बॅलन्स्ड फंड
एखादा फंड कायम क्रमवारीत अग्रेसर असतो असे नव्हे. प्रत्येक फंडाला संक्रमणातून जावे लागते. तथापि अशा फंडांबाबत गुंतवणूकदारांमध्ये नाहक भय आणि शंका निर्माण होते. परताव्याची लय जरी बिघडलेली दिसत असली तरी टाटा बॅलन्स्ड फंडाला परताव्याचे गतवैभव पुन्हा लाभलेले लवकरच दिसू लागेल.
मासिक लाभांश देणाऱ्या बॅलन्स फंडांच्या ज्या योजना आहेत त्या योजनांपैकी टाटा बॅलन्स फंड हा जुना फंड असून येत्या ८ ऑक्टोबर रोजी २२ वर्षे पूर्ण करेल. या फंडाचे निधी व्यवस्थापक प्रदीप गोखले हे एक अनुभवी निधी व्यवस्थापक आहेत. या फंडाची शिफारस मुख्यत्वे सेवानिवृत्त गुंतवणूकदारांना नियमित मासिक उत्पन्न मिळविण्यासाठी करण्यात येते. ऑगस्ट २०१० पासून या फंडाने मासिक लाभांश जाहीर करण्यास सुरुवात केली. २३ जुलै २०१० रोजी ‘रेग्युलर डिव्हिडंड एनएव्ही’नुसार १० लाख गुंतविलेल्या गुंतवणूकदारांना सप्टेंबर २०१७ पर्यंत ६.६३ लाख करमुक्त लाभांश मिळाला असून १८ सप्टेंबर रोजीचे बाजारमूल्य १३.५८ लाख रुपये आहे. या गुंतवणुकीवर लाभांश जमेस धरून गुंतवणूकदाराला १०.४७ टक्के वार्षिक परतावा मिळाला आहे. लाभांशाऐवजी वृद्धीइच्छुक गुंतवणूकदाराने ८ ऑक्टोबर १९९५ रोजी गुंतविलेल्या १ लाख गुंतवणुकीचे १८ सप्टेंबरच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार २१.८५ लाख रुपये झाले असून परताव्याचा वार्षिक दर १५.०८ टक्के आहे.
‘लोकसत्ता कर्ते म्युच्युअल फंडा’च्या पहिल्या यादीपासून अंतर्भूत असलेल्या या फंडाची कामगिरी मागील दोन वर्षांत खालावली आहे. विशेषत: फंडाच्या निधी व्यवस्थापकांची खांदेपालट झाल्यानंतर फंडाच्या परताव्याच्या बिघडलेल्या लयीमुळे गुंतवणूकदार भयशंकित होणे स्वाभाविक आहे. ‘क्रिसिल बॅलंस्ड फंड अग्रेसिव्ह इंडेक्स’ हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. या फंडाचा तीन वर्षे, पाच वर्षे आणि सुरुवातीपासूनचा परतावा संदर्भ निर्देशांकाने दिलेल्या परताव्यापेक्षा सरस असला तरी मागील एका वर्षांचा परतावा संदर्भ निर्देशांकापेक्षा कमी आहे. परतावा कमी होण्यास फंडाच्या गुंतवणुकीचा बदललेला ढाचा कारणीभूत ठरला. फंडाचा पोर्टफोलिओ तीन भागात विभागलेला असतो. हे तीन भाग आघाडीच्या गुंतवणुका (हेड) मधील भाग (बॉडी) आणि शेपटाकडचा भाग (टेल) या नावाने ओळखले जातात. निधी व्यवस्थापक जोखीम कमी करण्याच्या उद्देशाने काही वेळेला शेपटाकडच्या भागात जास्त संख्येने समभाग ठेवतात. समभाग एकवटण्याची जोखीम कमी झाली तरी समभागांच्या वैविध्यामुळे फंडाचा परतावा कमी झाला. निधी व्यवस्थापकांनी पोर्टफोलिओ पुनर्रचना सुरू केली असून शेपटाकडच्या समभागांची संख्या कमी करणे सुरू आहे. मे २०१७ मध्ये गुंतवणूक केलेल्या समभागांची एकूण संख्या ६१ होती ऑगस्टमध्ये ही संख्या ५८ आहे. या दरम्यान एचडीएफसी, अम्बुजा सीमेंट, कॉनकॉर, नाल्को, टाटा कन्सल्टन्सी, सन टीव्ही यांचा गुंतवणुकीत नव्याने समावेश केला असून एनसीसी, आयएफबी इंडस्ट्रीज, बँक ऑफ बडोदा, सोलर इंडस्ट्रीज हे समभाग गुंतवणुकीतून वगळण्यात आले आहेत. सर्वाधिक गुंतवणूक अनुक्रमे खासगी बँका, संकीर्ण उद्योग, रोकड समकक्ष गुंतवणुका, वाहन आणि वाहन पूरक उद्योग, गैरबँकिंग वित्तीय कंपन्या यांच्यात केली आहे. एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, पॉवर ग्रीड आणि येस बँक हे सर्वाधिक गुंतवणूक असलेले समभाग आहेत. फंडाची ५५.५५ टक्के गुंतवणूक लार्ज कॅप, १३.४८ टक्के गुंतवणूक मिड कॅप आणि १.९४ टक्के गुंतवणूक स्मॉल कॅपमध्ये असून २८.९० टक्के गुंतवणूक कर्ज रोख्यांत आहे.
‘क्रिसिल बॅलंस्ड फंड अग्रेसिव्ह इंडेक्स’ हा संदर्भ निर्देशांक असलेले बॅलंस्ड फंड हे उघडपणे दोन गटांत विभागले गेल्याचे दिसून येतात. गुंतवणुकीत मिड कॅपचे प्रमाण थोडे अधिक असल्याने जास्त परतावा देणारे आणि लार्ज कॅपचे प्रमाण अधिक राखल्याने परताव्याच्या स्पर्धेत मागे पडलेले.
एखादा फंड कायम क्रमवारीत अग्रेसर असतो असे नव्हे. प्रत्येक फंडाला संक्रमणातून जावे लागते. पोर्टफोलिओच्या पुनर्रचनेमुळे समभागांची संख्या कमी करण्याचे टाटा बॅलन्स्ड फंडाच्या निधी व्यवस्थापकांचे धोरण आहे. फंडाच्या धोरणांशी सुसंगत गुंतवणुकीच्या संधींच्या प्रतीक्षेत असल्याने एकूण गुंतवणुकीपैकी मोठा हिस्सा रोकडसुलभ गुंतवणुका (सीएलबीओ) प्रकारात ठेवल्या आहेत. या दोन कारणांनी परताव्याचा दर खालावलेला सध्या दिसत असला तरी विविध कारणांनी मूल्यांकन आकर्षक पातळीवर आले तर रोकडसुलभ गुंतवणुकीतून काढून निधी समभागात गुंतविला जाईल. ही रोकड जसजशी गुंतविली जाईल तसा परताव्याचा दर सुधारत जाईल. सध्याची रोकड गुंतवणुकीत रूपांतरित केल्यानंतर पुढील वर्ष दीड वर्षांत फंड पुन्हा परताव्याच्या दरात अग्रेसर राहील, असे मानण्यास वाव आहे. गुंतवणुकीतून नियमित उत्पन्नाचा स्रोत मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी टाटा बॅलंस्ड फंड हा साजेसा पर्याय आहे. मासिक लाभांश आणि मर्यादित भांडवली वृद्धी देणाऱ्या या फंडाने मागील सात वर्षे लाभांशात सातत्य राखलेले आहे. या फंडाने ऑगस्ट २०१० पासून मासिक लाभांश जाहीर करण्यास सुरुवात केल्यापासून लाभांशात सातत्य राखले आहे. एकाही महिन्यात लाभांश जाहीर करणे टाळलेले नाही याची नोंद घेणे गरजेचे वाटते. आयसीआयसीआय प्रुडेन्शियल बॅलन्स्ड अॅडव्हान्टेजने मासिक लाभांश सुरू केल्यापासून प्रतिकूल बाजार परिस्थितीमुळे तीन वेळा मासिक लाभांश टाळल्याच्या पाश्र्वभूमीवर, लाभांशात सातत्य राखणारा टाटा बॅलन्स्ड फंडाला सातत्याच्या निकषावर सेवानिवृत्तांनी अधिक गुंतवणुकीसाठी प्राथमिकता द्यायला हवी.
निधी व्यवस्थापक प्रदीप गोखले यांची गुंतवणूक शैली कायम मूल्यांकनाच्या बाजूची राहिलेली आहे. प्रदीप गोखले यांनी गुंतवणुकीत कायम वृद्धीपेक्षा (ग्रोथ) मूल्यांकनाला (व्हॅल्यू) महत्त्व देलेले आहे. सध्याच्या बाजाराच्या चढय़ा मूल्यांकनामुळे, अशा तऱ्हेने मूल्यांकनाला महत्त्व देणाऱ्या निधी व्यवस्थापकांचा परतावा हा वृद्धीला महत्त्व देणाऱ्या निधी व्यवस्थापकांच्या फंडाच्या परताव्यापेक्षा कमी असतो. निश्चलनीकरण आणि वस्तू आणि सेवा कराचे परिणाम पुढील आठवडय़ापासून सुरू होणाऱ्या निकालांच्या हंगामात कंपन्यांच्या नफ्यावर दिसू लागतील. बाजाराची या पुढील वाटचाल कंपन्यांच्या उत्सर्जनावर (प्रति समभाग मिळकत अर्थात ईपीएसवर) अवलंबून असेल. अशा वेळी मूल्यांकनकेंद्रित शैली असणारा निधी व्यवस्थापक गुंतवणुकीची निगराणी अधिक चांगल्या प्रकारे करू शकेल. धोका टाळणारी आणि म्हणून साधारण परतावा दिलेले हे निधी व्यवस्थापक नेमस्त असले तरी सुरक्षिततेला प्राधान्य दिल्यामुळे अवास्तव जोखीम टाळत आलेले आहेत. सेवानिवृत्तीपश्चात जेव्हा अन्य उत्पन्नाचे स्रोत बंद झालेले असतात तेव्हा अवास्तव जोखीम टाळून वाजवी परतावा देणारा फंड निवडणे गरजेचे असते. परताव्याचे गतवैभव या फंडाला लवकरच दिसू लागेल. या फंडाबाबत गुंतवणूकदारांमध्ये असलेल्या भय आणि शंकेचे निराकरण केलेले असल्याने आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या मदतीने या फंडाचा समावेश गुंतवणुकीत करावा किंवा कसे याचा निर्णय करायचा आहे.
१९ सप्टेंबर २०१७ च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार ‘टाटा बॅलन्स्ड फंडा’ची परतावा कामगिरी (%)
१ वर्षे ३ वर्षे ५ वर्षे सुरुवातीपासून
टाटा बॅलंस्ड फंड १०.१६ ११.८९ १७.९६ १६.३८
‘क्रिसिल बॅलंस्ड फंड अग्रेसिव्ह इंडेक्स १३.०६ ८.९९ ११.७६ १२.७३
(अल्फा) -२.९ २.९ ५.६ ३.६५
‘क्रिसिल बॅलंस्ड फंड अग्रेसिव्ह इंडेक्स’ हा संदर्भ निर्देशांक असलेले बॅलंस्ड फंड हे उघडपणे दोन गटांत विभागले गेल्याचे दिसून येतात. गुंतवणुकीत मिड कॅपचे प्रमाण थोडे अधिक असल्याने जास्त परतावा देणारे आणि लार्ज कॅपचे प्रमाण अधिक राखल्याने परताव्याच्या स्पर्धेत मागे पडलेले.
पूर्वग्रहदूषित विश्लेषण!
‘गुंतवणुकीचे पुनर्विलोकन गरजेचे!’ या ‘अर्थ वृत्तान्त’मधील (१९ सप्टेंबर २०१७) ‘यूटीआय मिड-कॅप फंडा’विषयीच्या विश्लेषणात्मक लेखात वसंत माधव कुलकर्णी यांनी फंडाच्या पाच वर्षांच्या परतावा कामगिरीचा तौलनिक वेध व केलेला सविस्तर अभ्यास प्रशंसनीय आहे. तरी लेखकाने लेखात अनेक ठिकाणी केलेली टिप्पणी ही खोडसाळ, पूर्वग्रहदूषित आणि फंडातील विद्यमान गुंतवणूकदारांसाठी अन्यायकारक आहे असे वाटते. फंडाची कामगिरी आणि फंड घराण्याच्या प्रमुखांचे वेतनमान असा लेखकाने जोडू पाहिलेल्या संबंधामुळे त्यांच्या विश्लेषणाच्या विश्वासार्हतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे. पुढे लेखकाने भविष्यवेधी वक्तव्य करताना, ‘निधी व्यवस्थापक म्हणून सुब्रह्मण्यन यांच्या नियुक्तीने फंडाचा परतावा सुधारेल अशी कोणतीही आशा नाही’ असा काढलेला निष्कर्षही अत्यंत बेजबाबदार आहे. अर्थसाक्षरतेच्या उद्देशाने होणाऱ्या लेखनप्रपंचात वाचकांची दिशाभूल होणार नाही आणि फंडातील सूज्ञ गुंतवणूकदारांसाठी अवमानकारक ठरणार नाही, अशा वस्तुनिष्ठ विश्लेषणाची काळजी घेतली जाणे खूपच गरजेचे आहे.
– खुर्शीद मिस्त्री
उपाध्यक्ष (उद्यम संचार), यूटीआय अॅसेट मॅनेजमेंट कंपनी
वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com