यूटीआय मिड कॅप फंड
मिगुंतवणूक केलेल्या फंडातून गुंतवणूक नेमकी कधी काढून घ्यावी, हा ‘लोकसत्ता अर्थसल्ला’च्या कार्यक्रमात नेहमी विचारला जाणारा प्रश्न असतो. जेव्हा फंडाच्या परताव्याचा दर घसरतो तेव्हा फंडातून गुंतवणूक काढून घ्यावी हे या प्रश्नाचे उत्तर आहे. या उत्तराचे उदाहरण म्हणून एक फंड विश्लेषणासाठी घेत आहे. ‘लोकसत्ताकर्ते म्युच्युअल फंड’ २०१७च्या यादीत यूटीआय अपॉर्च्युनिटी फंडाला वगळण्यात आले. या फंडाला वगळल्यानंतर या फंडाच्या परताव्यात घसरण झाली. यादीतून फंड वगळण्याच्या या निर्णयाची दखल कोणी किती गंभीरपणे घेतली हे ज्याचे त्याला ठाऊक, मात्र या निर्णयावर त्यानंतर ‘मॉर्निग स्टार’ने ऑगस्ट २०१७ मध्ये शिक्कामोर्तब केले. पुढे यूटीआय अपॉर्च्युनिटी आणि यूटीआय इक्विटी या दोन्ही फंडांची पत मॉर्निग स्टारने ऑगस्ट महिन्यात घेतलेल्या आढाव्यानंतर एका पायरीने कमी करण्याचा निर्णय घेतला.
या दोन्ही फंडांबाबतचा योगायोग असा की, डिसेंबर २०१५ पर्यंत या दोन्ही फंडांचे निधी व्यवस्थापक अनुप भास्कर होते. अनुप भास्कर यूटीआय म्युच्युअल फंडाला रामराम ठोकून आयडीएफसीमध्ये दाखल झाल्यानंतर, यूटीआय अपॉर्च्युनिटी या फंडाची जबाबदारी स्वाती कुलकर्णी यांच्यावर आणि यूटीआय इक्विटी फंडाची जबाबदारी अजय त्यागी यांच्यावर सोपविण्यात आली. फेब्रुवारी २०१७ मध्ये यूटीआय म्युच्युअल फंड घराण्याचे मुख्य गुंतवणूक अधिकारी म्हणून व्हेट्री सुब्रह्मण्यन यांची नेमणूक झाल्यावर स्वाती कुलकर्णी यांच्याकडून निधी व्यवस्थापनाची जबाबदारी व्हेट्री सुब्रह्मण्यन यांच्याकडे आली.
अनुप भास्कर निधी व्यवस्थापक असलेला यूटीआय मिडकॅप फंडाची जबाबदारी सध्याचे निधी व्यवस्थापक ललित नांबियार यांच्यावर सोपविण्यात आली. यूटीआय मिडकॅप फंडाची कामगिरी हा गुंतवणूकदारांमध्ये चर्चेचा विषय न होता चिंतेचा विषय व्हावा अशीच आहे. वार्षिक परताव्याच्या दरावर आधारित क्रमवारीत यूटीआय मिडकॅप फंड केवळ तळाला आहे म्हणून नव्हे तर काही बॅलन्स फंडांनी यूटीआय मिडकॅप फंडाला परताव्याच्या दरात मागे सारले आहे. फंडाच्या गचाळ कामगिरीमुळे हा फंड मिडकॅप गटातील आहे किंवा कसे अशी शंका घ्यावी अशीही परिस्थिती आहे.
या फंडाची पहिली एनएव्ही १ ऑगस्ट २००५ या दिवशी जाहीर झाली. २६ मार्च २०१४ पासून यूटीआय मास्टर व्हॅल्यू फंड आणि यूटीआय मिडकॅप या फंडाचे विलीनीकरण झाले. विलीनीकरण झाल्यानंतरच्या फंडात किमान ६५ टक्के गुंतवणूक मिडकॅप कंपन्यांत असण्याची ग्वाही देण्यात आली होती. एस अॅण्ड पी बीएसई मिडकॅप निर्देशांकाच्या भाग असलेल्या, परंतु बीएसई सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये समाविष्ट नसतील अशाच कंपन्यांचा गुंतवणुकीत समावेश असेल, असे धोरण ठरले. फंडाच्या गुंतवणुकीत ७५ कोटींपेक्षा कमी बाजारमूल्य असलेल्या कंपन्या टाळून अन्य कंपन्यांतून गुंतवणूक करण्याची मुभा निधी व्यवस्थापकास देण्यात आली आहे. या गुंतवणूक परिघातील कंपन्यांच्या निवडीसाठी ‘बॉटम्स अप अॅप्रोच’ हे धोरण अवलंबिले जाते. निधी व्यवस्थापकांनी मागील वर्षभरात गुंतवणुकीत ७९-८० कंपन्यांचा समावेश केलेला आढळतो. निधी व्यवस्थापक फंडाच्या गुंतवणुकीत सर्वाधिक गुंतवणूक अनुक्रमे वाहने व वाहन पूरक उद्योग, गैरबँकिंग वित्तीय कंपनी, रसायने, टिकाऊ उपभोग्यवस्तू आणि उत्पादक यांना प्राथमिकता दिली आहे.
अर्थचक्राच्या वेगवेगळ्या टप्प्यांत भांडवली वृद्धी देऊ शकतील अशा कंपन्या गुंतवणुकीसाठी निवडल्या जातात. फंडाची पहिली एनएव्ही जाहीर झालेल्या दिवशी गुंतविलेल्या एक लाखाच्या रकमेचे १४ सप्टेंबरच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’प्रमाणे ६.६६ लाख रुपये झाले असून परताव्याचा वार्षिक दर १६.९२ टक्के इतका आहे. याच दिवशी इतकीच रक्कम एल अॅण्ड टी मिडकॅप फंडात गुंतविलेल्या रकमेचे ७.९८ लाख रुपये झाले असून परताव्याचा दर १८.९२ टक्के आहे. २००९ ते २०१४ दरम्यान लखलखीत परतावा देणाऱ्या यूटीआय मिडकॅप फंडाने मागील तीन वर्षे गुंतवणूकदारांना निराश केले आहे. या फंडाचा वार्षिक परतावा अनेक बॅलन्स फंडांच्या परताव्यापेक्षाही कमी आहे.
फंडाच्या गुंतवणुकीचा तपशील पाहता, गुंतवणुकीत वैविध्य राखून अधिक परताव्यासाठी समभागकेंद्रित जोखीम घेण्याचे निधी व्यवस्थापकाने टाळलेले दिसत आहे. जोखीम कमी करण्यासाठी गुंतवणुकीत वैविध्य हवे परंतु वैविध्य राखताना परतावा कमी होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक असते. या फंडात अतिवैविध्याचा फंडाच्या परताव्यावर विपरीत परिणाम झालेला दिसत आहे. ललित नांबियार यांना २३ वर्षांचा गुंतवणुकीचा अनुभव आहे. तरीदेखील या फंडाच्या गुंतवणुकीच्या बाबतीत त्यांनी आखलेली रणनीती पूर्णपणे फसलेली आहे. या फंडाचा तुलनेने कमी व्यवस्थापन खर्च असला आणि बाजाराची एकूण दिशा स्मॉल आणि मिडकॅप फंडाला अनुकूल असली तरी फंडातील गुंतवणूकदारांना परतावा कामगिरीने निराश केले आहे.
काही गुंतवणूकदार आधीचा परताव्याचा दर पाहून गुंतवणुकीचा निर्णय घेतात. गुंतवणूक केल्यानंतर दरम्यानच्या काळात फंडाच्या बाबतीत अनेक बदल होत असतात. त्याच फंड घराण्यात निधी व्यवस्थापकाला बढती मिळाल्यामुळे अथवा निधी व्यवस्थापकाने नोकरी सोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे, दोन योजनांच्या विलीनीकरणामुळे एका फंड घराण्याने आपला व्यवसाय दुसऱ्या फंड घराण्याला विकला वगैरेमुळे निधी व्यवस्थापनाच्या धोरणात बदल होतात. व्यस्त गुंतवणूकदारांना या बदललेल्या गोष्टी लक्षात येतातच असे नाही किंवा त्यांना परताव्यावर होणाऱ्या परिणामांची कल्पना नसते. मिडकॅप आणि मायक्रोकॅप फंडांचे व्यवस्थापन करण्यास लार्जकॅप फंडाच्या व्यवस्थापनासाठी किंवा व्हॅल्यू इन्व्हेस्टमेंट पद्धतीने हाताळल्या जाणाऱ्या फंडासाठी वेगळे कौशल्य लागते. अनेकदा या बदलांनंतर फंडाचा परतावा घटलेलाच दिसतो. तशीच गत यूटीआय मिडकॅप फंडाची सुद्धा झाली आहे. दोन-तीन आवर्तने अनुभवलेल्या अनुप भास्कर यांच्यानंतर यूटीआय मिडकॅप फंडाची जबाबदारी ललित नांबियार यांच्याकडे आल्यानंतर फंडाच्या परताव्याचा दर जाणवेल इतकी घट झाली आहे. म्युच्युअल फंड उद्योगात सर्वाधिक वेतन घेणारे व्यवस्थापकीय संचालक असलेल्या या फंड घराण्याचे फंड परतावा कामगिरीवर आधारित क्रमवारीत पहिल्या चौथ्या हिश्श्यातही (Top Quartile (Q1)) नाहीत. यूटीआय फंड घराण्याने फेब्रुवारी २०१७ पासून समभाग गुंतवणूक व्यवस्थापनात व्हेट्री सुब्रह्मण्यन यांची मुख्य गुंतवणूक अधिकारी (समभाग) या पदावर नेमणूक केली आहे. यूटीआय म्युच्युअल फंडांच्या समभाग योजनांची कामगिरी खालावलेली दिसत असताना फंड व्यवस्थापन सुदृढ करण्यासाठी ही नेमणूक केल्याचे फंड घराण्याकडून जाहीर करण्यात आले. सध्या मिडकॅप फंड गटात परताव्याच्या दराप्रमाणे तळाला असलेल्या या फंडाचा परतावा सुब्रह्मण्यन यांच्या नेमणुकीमुळे लगेचच सुधारेल, अशी आशा नाही. दरम्यान यूटीआय म्युच्युअल फंडाकडून ‘यूटीआय फोकस्ड इक्विटी फंड सीरिज-४’ ही नवीन मुदत बंद योजना गुंतवणुकीसाठी सुरू आहे. आणि या योजनेचे निधी व्यवस्थापकही सुब्रह्मण्यनच आहेत याची नोंद घेणे आवश्यक आहे. या योजनेचा फंड घराण्याकडून मोठा गवगवा होत आहे. एकूण यूटीआय फंड घराण्याच्या समभाग गुंतवणुकीविषयी प्रश्नचिन्हे असताना या योजनेत निधी गुंतविण्याचा विचार सावधपणे करणे गरजेचे आहे.
म्युच्युअल फंड उद्योगात सर्वाधिक वेतन घेणाऱ्यांच्या फंडातून सर्वाधिक परताव्याच्या कामगिरीची अपेक्षा ठेवली तर बिघडले कुठे? पाच वर्षे वेगवेगळ्या मिडकॅप फंडाच्या केलेल्या गुंतवणुकीचा तपशील सोबतच्या कोष्टकात दिला आहे. हे कोष्टक पुरेसे बोलके आहे आणि गुंतवणूकदारांसाठी निश्चित भूषणावह नाही. या फंडाचा परतावा पाहता, गुंतवणूकदारांची अवस्था ‘..उत्सवी मग्न राजा’ अशी झाली आहे. या फंडातील गुंतवणुकीबाबत निर्णय घेण्यापूर्वी गुंतवणूकदारांनी अधिक तपशिलात जाऊन योग्य तो निर्णय घ्यावा. ज्यांच्या गुंतवणुकीत हा फंड आहे त्यांना फंडाची कामगिरी कळावी यासाठी हा लेखनप्रपंच. अन्य मिडकॅप फंडाचा परतावा पाहता यूटीआय मिडकॅप फंडांच्या परताव्याने गुंतवणूकदारांच्या तोंडाला पाने पुसली असे म्हटले तर वावगे होणार नाही. सध्याच्या फंड व्यवस्थापनावर विसंबून भविष्यात या फंडाची कामगिरी सुधारेल असे सध्या तरी चित्र दिसत नाही. मिडकॅप फंड हे एनएव्हीतील वेगाने होणाऱ्या चढ उतारांसह आक्रमक परतावा देणारे फंड म्हणून ओळखले जातात. अशी जर मिडकॅप फंडाची ओळख नसेल तर गुंतवणूकदारांनी या फंडात केलेल्या गुंतवणुकीच्या पुनर्विलोकनाची वेळ आली आहे. गुंतवणूकदारांनी आपल्या सल्लागाराशी चर्चा करून पुढील निर्णय घेणे गरजेचे आहे.
यूटीआय मिडकॅप फंड (रेग्युलर प्लान)
एक दृष्टिक्षेप..
* फंडाची पहिली एनएव्ही : १ ऑगस्ट २००८
* सध्याची एनएव्ही (१४ सप्टेंबर २०१७ रोजी)
वृद्धी पर्याय : १०४.७८ रुपये
लाभांश पर्याय : ५६.९५ रुपये
* फंड प्रकार : मिड कॅप फंड
* संदर्भ निर्देशांक : निफ्टी फ्री फ्लोट मिड कॅप १००
* किमान एसआयपी : ५०० रुपये
* किमान गुंतवणूक : ५,००० रुपये
(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)
वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com