निश्चलनीकरण, कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतीचा भडका, रुपयाची तीव्र घसरण या सद्य:परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर भांडवली बाजारात घातक उतार हा अपेक्षितच होता. परंतु मंदीच्या निराशाजनक वातावरणातील हा अंधार हा सूर्योदयापूर्वीचा अंधार आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना समभाग खरेदी करण्याकरता ‘मंदीतील ही सुवर्णसंधी’ आहे..
भांडवली बाजारात ७ सप्टेंबर २०१६ रोजी निर्देशांकाची पातळी अनुक्रमे निफ्टी निर्देशांक ८९६८ आणि मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने २९,०७७चा उच्चांक मारून घसरण सुरू झाली. ही घसरण एवढय़ा तीव्र स्वरूपाची होती की, अवघ्या अडीच महिन्यांत निफ्टी निर्देशांक ८,९६८ वरून ७,९१६ अशा १,०५२ अंशांची घसरण व सेन्सेक्स २९,०७७ वरून २५,७१७ अशा ३,३६० अंशांनी घसरण झाली.
अर्थव्यवस्थेच्या नभावर सप्टेंबपर्यंत सुरू राहिलेल्या आनंदी, उत्साही, प्रसन्न वातावरणामध्ये अचानकपणे काळ्या ढगांची जमवाजमव होऊ लागली. असे घडण्यामागची कारणे :
१. निश्चलनीकरणानंतर निर्माण झालेल्या चलन तुटवडय़ामुळे सामान्य जनतेला ‘गरजेच्या वस्तू’ व ‘मौजेच्या वस्तू’ या मधील फरक कळल्यामुळे व मुख्यत्वे हातात पसेच नसल्यामुळे इतर उत्पादित वस्तूंच्या मालाला उठावच नसल्याने मागणीवर विपरीत परिणाम झाला. तसेच शेतकऱ्याकडे बी-बियाणे, खते, कीटकनाशक खरेदीसाठी पशाची टंचाई निर्माण झाल्यामुळे रब्बीच्या मोसमात धान्य उत्पादनांवर नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम म्हणजे सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) एक टक्क्याने घसरण्याची शक्यता आहे.
२. संसदेचे हिवाळी सत्र सुरळीतपणे पार न पडल्यामुळे वस्तू व सेवा कर प्रणाली -जीएसटीची अंमलबजावणी १ एप्रिलऐवजी पुढे ढकलले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
३. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल हे ३० डॉलर प्रति बॅरलवरून ५५ डॉलर प्रति बॅरलवर झेपावला. त्यामुळे सात ते आठ अब्ज डॉलरवर असलेली मासिक विदेश व्यापार तूट नोव्हेंबर २०१६ मध्ये १३ अब्ज डॉलरवर गेली व ती अशीच टिकली तर ती धोकादायक पातळी असेल.
आंतरराष्ट्रीय पटलावर अनपेक्षितरीत्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांची झालेली निवड; अमेरिकेची मध्यवर्ती बँक- फेडरल रिझव्र्हने आताच्या घडीला कर्जावरील व्याजात पाव टक्क्याची वाढ व पुढील वर्षांत तीन वेळा कर्जावरील व्याजात वाढ करण्याच्या निर्देशामुळे परदेशी गुंतवणूकदार संस्थाचा खरेदीचा ओढा हा पुन्हा त्यांच्या मातृभूमीकडे वळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. बाजार नरमण्यामागे ही सर्व आर्थिक कारणे झाली.
आता आपण तांत्रिक विश्लेषणाकडे वळू या.
१. निर्देशांकांनी २९ फेब्रुवारी २०१६ रोजी अनुक्रमे निफ्टीने ६,८२५ आणि मुंबई शेअर बाजार निर्देशांक सेन्सेक्सने २२,४९४ अशा नीचांक पातळ्या दाखविल्या होत्या. तेथून अवघ्या सात महिन्यांत निर्देशांकानी पुन्हा उच्चांकाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला. ही वाढ अतिशय जलद अशा भूमिती श्रेणीतील (जी.पी.) झाली व त्यात कुठल्याच स्तरावर भरीव अशी पायाभरणी झाली नाही. त्यामुळे तांत्रिक विश्लेषणाच्या अनुषंगाने आता चालू असलेली मंदी अपेक्षितच होती व याची कल्पना अर्थ वृत्तांत, १३ जून २०१६च्या ‘तेजीला खीळ’ या लेखात दिली होती व आता तेच घडत आहे. तेव्हा येणाऱ्या दिवसांत निर्देशांकाचा संभाव्य नीचांक काय असेल व तो कधीपर्यंत येईल याचा आढावा घेऊ या.
तांत्रिक विश्लेषणात वापरले जाणारे एक सुभाषित आहे – ‘टारगेट शुड बी अचीवड् टाइम वाईज अॅण्ड प्राइस वाईज!’
येथे येणाऱ्या दिवसांतील संभाव्य नीचांकासाठी आपण ‘फेबुनाची फॅक्टर’ व ‘हेड अॅण्ड शोल्डर’ या प्रमेयांचा आधार घेऊया.
सद्य:स्थितीत निर्देशांक ७,९०० ते ८,३००/ २५,७१७ ते २६,८०० या टप्प्यात (बॅण्ड) असेल. दोन्ही निर्देशांकांना ८,३००/ २६,८००च्या वर टिकण्यास सातत्याने अपयश येत असेल तर निदान ७,९००/ २५,७१७चा स्तर टिकून राहू देत येणाऱ्या दिवसांत निर्देशांकाला ७,९००/ २५,७१७चा भरभक्कम आधार आहे. दुर्दैवाने हा भरभक्कम आधार निर्देशांकानी तोडला तर निर्देशांक ७,७००/ २५,३७० पर्यंत खाली येऊ शकतो.
हे स्तर काढण्यासाठी ४ मार्च २०१५चा उच्चांक ९,११९/ ३०,०२४ आणि २९ फेब्रुवारी २०१६चा नीचांक ६,८२५/ २२,४९४ या पातळ्यांचा ३८.२ टक्के फेबुनाची फॅक्टर हा ७,७००/ २५,३७० असा येत आहे.
मंदीचा अतिरंजितपणा हा ‘हेड अॅण्ड शोल्डर’ प्रमेयाचा आधार घेऊन काढला. त्यासाठी ७ सप्टेंबर २०१६चा उच्चांक ८,९६८/ २९,०६७ या पातळ्यांना ‘हेड’ गृहीत धरलं आणि ब्रेग्झिटचा परिणाम म्हणजे २४ जून २०१६ रोजी दिसलेला नीचांक ७,९२७/ २५,९११ला ‘लेफ्ट शोल्डर’ गृहीत धरू या. ‘हेड अॅण्ड शोल्डर’ प्रमेयाच्या नकारात्मक छेदाचं खालचं उद्दिष्ट (हेड अॅण्ड शोल्डर डाऊन टारगेट) हे निफ्टी निर्देशांकावर ७,४५०/ २४,४५० येत आहे व कालमापन पद्धतीप्रमाणे १० जानेवारी २०१७ पासून ते त्या महिन्याच्या अखेपर्यंत हे साध्य होईल.
कालमापन पद्धतीसाठी फेबुनाची टाइम सायकल व गॅन टाइम सायकलचा आधार घेतला आहे. फेबुनाची टाइम सायकलमध्ये ७ सप्टेंबर २०१६चा उच्चांक पकडून भविष्यातील ८९वा दिवस हा १६ जानेवारी येत आहे.
तर गॅन टाइप सायकलप्रमाणे ४ मार्च २०१५चा ऐतिहासिक उच्चांक (९,११९/ ३०,०२४) पकडून ३४ दिवसांची सायकल (चक्र) हे १० जानेवारी व ३ फेब्रुवारी सूचित करीत आहे.
आता दोन्ही गोष्टींची सांगड घालता १० जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत निफ्टी निर्देशांकावर ७,९०० ते ७,७०० तर सेन्सेक्स २५,७०० ते २५,३७० पर्यंत खाली येऊ शकतो. मंदीचा अतिरंजितपणा पाहता, ७,४५०/ २४,४५० असा निर्देशांकांचा नीचांक अपेक्षित आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांना (ज्यांचा गुंतवणुकीचा अवधी दोन वर्षांहून अधिक आहे) तसेच परदेशस्थ गुंतवणूकदार संस्थांना समभाग खरेदी करण्याकरता ‘मंदीतील ही सुवर्णसंधी’ आहे.
या मंदीच्या निराशाजनक वातावरणातील हा अंधार हा सूर्योदयापूर्वीचा अंधार आहे, असे मानण्याला बरेच आधार आहेत. सद्य:परिस्थितीतील घातक उतार हा अपेक्षितच होता. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे हे सर्व ‘इलियट वेव्ह’ प्रमेयानुसार घडत आहे. हेच प्रमेय सन २०२० मध्ये मुंबई शेअर बाजार निर्देशांक ४० ते ५०,०००ला गवसणी घालण्याची शक्यता वर्तवीत आहे.
इलियट वेव्हच्या क्लिष्ट, गुंतागुंतीच्या प्रमेयाचा आधार घेऊन वाचकांना गोंधळात टाकण्यापेक्षा, हा मुद्दा पटवून सांगणारे ट्रम्प कार्ड म्हणजे रुचीर शर्मा होय. ‘राईज अॅण्ड फॉल ऑफ नेशन’ या पुस्तकाचे लेखक व जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ रुचीर शर्मा यांच्या मते- ‘येणाऱ्या काळात जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये झपाटय़ाने आणि जलद विकास हा दक्षिण आशियाई देशांच्या अर्थव्यवस्थेचा होणार आहे. ज्यात प्रामुख्याने श्रीलंका, बांगलादेश व भारताचा समावेश असेल व सर्वात महत्त्वाचे येणाऱ्या वर्षांत चीनचा विकास दर मंदावून परकीय गुंतवणूक व भांडवल चीनमधून बाहेर पडेल व याचा सर्वात मोठा ‘लाभार्थी’ भारत असेल. त्यासाठी भारताने कंपनी करामध्ये भरीव अशी कपात करण्याची गरज आहे. तसेच सरकारी बँका, सरकारी उद्योगधंद्यांचे जास्तीत जास्त खासगीकरण केले पाहिजे. त्या दृष्टीने आगामी अर्थसंकल्पात पावले पडली पाहिजेत.’
इतिहासात प्रथमच आर्थिक, तांत्रिक व मूलभूत संशोधनांतर्गत भविष्यात भारताच्या अर्थव्यवस्थेची विकासाची स्वप्नं दाखविली जात आहेत. पण ती स्वप्नं प्रत्यक्षात येण्यासाठी मात्र अर्थ, व्यापार उद्योग आघाडय़ावर आकर्षक आर्थिक योजना, सुटसुटीत कर रचना आणून त्याची जलद व परिणामकारक अंमलबजावणी झाली तरच आताची अंधारलेली परिस्थिती ही भविष्यातील ‘काळ्या ढगाची रुपेरी किनार’ होईल अशी आशा बाळगण्यास हरकत नाही.
सद्य:परिस्थितीत भारतीय अर्थव्यवस्थेवर गर्दी केलेल्या काळ्या ढगांची रुपेरी किनार
१. सध्या डॉलर निर्देशांक उच्चांकाच्या आसपास आहे आणि २०१७च्या उत्तरार्धात सशक्त रुपया व अशक्त डॉलर हे समीकरण होऊ शकते.
२. येणाऱ्या वर्षांत अमेरिकी अर्थव्यवस्थेचा विकास/ वृद्धी दर हा २ टक्के तर युरोपियन अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर हा १ ते २ टक्के असेल भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी – विकास दर हा ७ ते ८ टक्के असण्याची शक्यता आहे.
३. त्यामुळे या मंदीत जे परदेशस्थ गुंतवणूकदार संस्था समभाग खरेदी करतील त्यांना डॉलर आधारित १० टक्केहून अधिक नफ्याचा परतावा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात परदेशस्थ गुंतवणूकदार संस्था त्यांच्या गुंतवणुकीचा ओघ परत अमेरिकेकडे वळवतील ही भीती प्रत्यक्षात येण्याची शक्यता कमी वाटते आणि त्यांना भारतासह उभरत्या बाजारपेठांकडेच पुन्हा वळावे लागेल.
४. येणाऱ्या वर्षांत चीनचा विकास दर मंदावून परकीय गुंतवणूक व भांडवल चीनमधून बाहेर पडेल व याचा सर्वात मोठा ‘लाभार्थी’ भारत असेल.
५. रिझव्र्ह बँकेची व्याजदर कपात तसेच अर्थसंकल्पात कंपनी करामध्ये भरीव अशी कपात; सरकारी बँका, सरकारी उद्योगधंद्यांचे जास्तीत जास्त खासगीकरण अशी पावले पडतील.
महत्त्वाची सूचना : निर्देशांकांची आगामी वाटचाल कशी असेल याचा आढावा घेणाऱ्या प्रस्तुत लेखातील अनुमानाच्या आधारे खरेदी वा विक्री कोणताही व्यवहार तज्ज्ञ सल्लागाराच्या मार्गदर्शनाखाली घेणे उचित ठरेल व त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित वाचकाची असेल.
आशीष अरिवद ठाकूर ashishthakur1966@gmail.com