तरुणांच्या देशातील गृहवित्त संस्थांचे भवितव्य कसे असेल हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. परवडणारी घरे हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे.  पायाभूत सुविधा विकास व गृहबांधणी या उद्योग क्षेत्रांवर ‘नमों’चा विशेष लोभ आहे. २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचे ‘नमों’चे स्वप्न आहे. गृहवित्त व नागरी पायाभूत सुविधांचा विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करणारी हडको या स्वप्नपूर्तीच्या वाटेतील महत्त्वाचा घटक आहे. एकंदरीत या कंपनीला २५ वर्षांनंतरची एचडीएफसी संबोधले तर वावगे ठरू नये..

राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारू लागला. ‘‘राजा, आजपासून ‘हडको’ या सरकारी मालकीच्या कंपनींच्या प्राथमिक विक्रीला प्रारंभ होत आहे. एल अँड टी इन्फोटेक, एल अँड टी टेक्नॉलॉजी, अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्केट यांसारख्या कंपन्यांच्या प्राथमिक विक्रीबाबत तुझे अंदाज खरे ठरल्यामुळे ‘हडको’च्या प्राथमिक विक्रीत अर्ज करावा किंवा नाही या प्रश्नाचे तुझ्याकडून जाणून घेण्यास उत्सुक आहे. या प्रश्नाचे उत्तर तू दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील.’’ वेताळाने राजाला सांगितले.‘हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ अर्थात ‘हडको’ ही केंद्र सरकारची मिनीरत्न दर्जाची कंपनी आहे. सरकार आपली १०० टक्के मालकी असलेल्या या गैरबँकिंग वित्तीय कंपनीतील २०.४० लाख समभाग या प्राथमिक विक्रीद्वारे विकणार असून २ रुपये दर्शनी किंमत असलेल्या समभागाची ५६ ते ६० दरम्यान विक्री करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ही कंपनी केंद्र, राज्य सरकार व स्थानिक स्वराज्य संस्थांना गृहबांधणी, पाणीपुरवठा, नागरी सुविधांच्या विकास प्रकल्पांना वित्तीय साहाय्य करते. या कंपनीचे कर्जदार स्थानिक स्वराज्य संस्था व राज्य सरकारचे अंगीकृत उपक्रम असले तरी थकीत कर्जाचे प्रमाण ६ टक्के असणे हे निश्चितच चिंता करावी असे आहे. साधारणपणे प्राथमिक विक्रीसाठी तयारी करीत असताना कंपन्या आपली सगळीच अनुत्पादित कर्जे उघड होणार नाहीत याची काळजी घेतात. प्राथमिक विक्रीनंतर अनुत्पादित कर्जाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. हे अर्ज करण्यापूर्वी लक्षात घेणे गरजेचे आहे.’’ राजा म्हणाला.‘‘हडको  वैयक्तिक कर्जदारांना किंवा विकासकांना कर्ज देत नाही. ही कंपनी केंद्र किंवा राज्य सरकार पुरस्कृत नागरी गृहप्रकल्प नगरपालिकांच्या पाणीपुरवठा योजना नगरपालिका विकसित करीत असलेले शहरातील अंतर्गत रस्ते, वीज वितरणासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा इत्यादीसाठी वित्तपुरवठा करते. मागील वित्तीय वर्षांसाठी कंपनीचा ‘ईपीएस’ ३.८७ होता म्हणजे दिलेल्या किंमतपट्टय़ाचा विचार करता पीई रेशो १४.५ ते १५.५ दरम्यान आहे. कंपनीची पुस्तकी किमती ४२.१४ असून स्वनिधीवरील परतावा ९.१८ टक्के आहे. मागील १५ वर्षांत वित्तपुरवठा क्षेत्रात गृहवित्त पुरवठा कंपन्यांनी सर्वाधिक वृद्धी नोंदली आहे. २०१८ मध्ये हे उद्योग क्षेत्र २८.६ टक्के वाढ नोंदवेल, असा कयास नॅशनल हाऊसिंग बँकेने व्यक्त केला आहे. हडको थेट कर्जपुरवठा न करता सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांना प्रवर्तित केलेल्या एलआयसी हाऊसिंग फायनान्स व जीआयसी हाऊसिंग फायनान्स यांना पुनर्वित्त पुरवठा करते. भविष्यात सार्वजनिक क्षेत्रातील अन्य गृहवित्तपुरवठा करणाऱ्या कॅनफिन होम फायनान्स किंवा एसबीआय होम फायनान्ससारख्या कंपन्यांबरोबर व्यवसाय करण्यासाठी करार होणे अपेक्षित आहे. ‘इक्रा’च्या एका शोधनिबंधानुसार, सकल राष्ट्रीय उत्पादनाचे गृहवित्त कर्जाशी २००७ मध्ये प्रमाण ६.९ टक्के होते. हे प्रमाण वाढत २०१७ मध्ये ९.३ टक्के झाले आहे. लोकसंख्येचा मोठा हिस्सा हा गृहखरेदी करण्याच्या वयातील असल्याने हे प्रमाण वाढतच जाणार आहे. वाढते नागरीकरण व एकत्र कुटुंबपद्धतीकडून विभक्त कुटुंबपद्धतीकडे होत असलेला सामाजिक बदल हे कारण आहे. हा वृद्धिदर गाठण्याला प्राप्तिकराच्या ‘कलम ८० सी’खाली गृहकर्जावरील व्याज व मुदलाच्या परतफेडीवर कर वजावट मिळत असल्याने अनेकांसाठी गृहखरेदी हा करनियोजन एक पर्याय आहे,’’ राजा म्हणाला.

‘‘एचडीएफसीचे संस्थापक एच. टी. पारेख यांनी जेव्हा एचडीएफसीची स्थापन केली तेव्हा कदाचित त्यांनासुद्धा कल्पना नसेल की, आपण लावलेल्या झाडाचा २५ वर्षांत एक वटवृक्ष होणार आहे. २०२२ पर्यंत प्रत्येकाला घर देण्याचे ‘नमों’चे स्वप्न आहे. तरुणाच्या देशातील गृहवित्त संस्थांचे भवितव्य कसे असेल हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. परवडणारी घरे हा सध्या परवलीचा शब्द झाला आहे. नॅशनल हाऊसिंग बँकेच्या वार्षिक अहवालात यावर विस्तृत माहिती दिली आहे. पायाभूत सुविधा विकास व गृहबांधणी ही उद्योग क्षेत्रांवर ‘नमों’चा विशेष लोभ असल्याने व हडको गृहवित्त व नागरी पायाभूत सुविधांचा विकास प्रकल्पांना वित्तपुरवठा करत असल्याने ही कंपनी २५ वर्षांनंतरची एचडीएफसी किंवा आयडीएफसी ठरण्याची शक्यता आहे. हा समभाग प्राथमिक विक्रीत मिळाला नाही तरी बाजारातून खरेदी करून पुढील ५ ते १० वर्षांसाठी गुंतवणूक करण्याच्या योग्यतेचा असा आहे. दीर्घकाळ गुंतवणूक केल्यास हा शेअर मल्टिबॅगर ठरेल,’’ राजा म्हणाला.अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.

gajrachipungi @gmail.com