आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एक्स्पोर्ट अ‍ॅण्ड अदर सव्‍‌र्हिसेस फंड
मागील दहा वर्षे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल म्युच्युअल फंडाच्या डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडापेक्षा, आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एक्स्पोर्ट अ‍ॅण्ड अदर सव्‍‌र्हिसेस फंडाने चांगला परतावा दिला आहे. ‘ब्रेग्झिट’मुळे येत्या दोन-एक वर्षांत जगातील काही देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठे धक्के बसण्याचे संकेत मिळत आहेत. हा फंड ‘थिमॅटिक’ या फंड प्रकारात जरी मोडणारा असला तरी निर्यातप्रधान गुंतवणूकसंधी ही बदलत्या परिस्थितीतील आदर्श ‘थीम’ वाटते..
संपदा सोहळा, नावडे मनाला।
लागला टकळा। पंढरीचा।।
जावें पंढरीसी, आवढी मनासी।
कधी एकादशी। आषाढी ये हें।।
तुका म्हणे ऐसें, आर्त ज्याचे मनीं।
त्याची चक्रपाणी। वाट पाहे।।
arth02
वारीला सुरुवात झाल्याने महाराष्ट्र भक्तिरसात न्हाऊन निघाला आहे. पंढरीच्या वाटेवर चालण्याची वारकरी वर्षभर आतुरतेने वाट पाहतात त्या वारीला सुरुवात झाली. इथे पालखी सोपान काकांच्या सासवड मुक्कामी विसावली त्याच दिवशी बाजाराचे कामकाज संपण्याच्या वेळी ‘ब्रेग्झिट’नंतर घसरलेला निर्देशांक कधी वर जातो याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या दलाल स्ट्रीटवरच्या ‘वारकऱ्यां’ची प्रतीक्षा, ‘निफ्टी’ने पुन्हा तडक ८३००चा टप्पा पार केल्यामुळे संपुष्टात आली. निर्देशांकांनी सर्वाधिक साप्ताहिक वाढ नोंदविली. शनिवारच्या अंकात ‘अर्थसत्ता’च्या पानावर ‘निफ्टी निर्देशांक ८,३०० पल्याड’ व या बातमीच्या शेजारी ‘जागतिक अर्थव्यवस्थेसाठी ‘ब्रेग्झिट’चे घातक परिणाम’ हे मथळे असलेल्या दोन बातम्या छापून आल्या होत्या. ‘निफ्टी’ने ८३०० चा टप्पा ओलांडला म्हणून ‘सोहळा’ साजरा करायचा की आगामी वर्षांत ‘ब्रेग्झिट’च्या परिणामांना कशा प्रकारे सामोरे जायचे, या द्विधेने त्रस्त झालेले गुंतवणूकदार या फंडाचा ‘सिप’करिता विचार करू शकतात.
ब्रिटन युरोपीय महासंघातून बाहेर पडणार नाही असे जगातील बहुसंख्यांना जरी वाटत होते तरी त्यांना अल्प मतात आणण्याची किमया ‘ब्रिटन’मधील सार्वमतात घडून आली. याचा परिणाम केवळ ब्रिटनमधील उद्योगांच्या बरोबरीने युरोपातील अनेक कंपन्यांची पत खालावण्याचा धोका निर्माण झाला असून पुढील दोन वर्षांत चलन, समभाग व रोखे बाजारपेठा मोठय़ा चढ-उतारांना सामोऱ्या जातील. युरोपीय समुदायातून ब्रिटन बाहेर पडण्याच्या अनपेक्षित निर्णयाचे परिणाम समजून येण्यास काही कालावधी जावा लागेल. आजपर्यंत अमेरिकेचा डॉलर व ब्रिटनचा पौंड हे गुंतवणुकीसाठी नंदनवन समजले जात असत. ‘ब्रेग्झिटमुळे पौंड, बँक ऑफ इंग्लंडचे रोखे व ब्रिटिश कंपन्यांचे समभाग याविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ब्रिटनच्या रोख्यांची पत ‘ट्रिपल ए मायनस’वरून खालावली जाण्याच्या शक्यतेचे भाकीत स्टँडर्ड अ‍ॅण्ड पूअर या पतनिर्धारण संस्थेचे मुख्य पत अधिकारी मोरिट्झ कारमेर यांनी केले आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ब्रिटिश अर्थव्यवस्था ही सेवाप्रधान अर्थव्यवस्था असून जागतिक अर्थव्यवस्थेत सेवा क्षेत्र धरून ब्रिटनचा १२% वाटा आहे. यापैकी काही हिस्सा ‘ब्रेग्झिट’मुळे ब्रिटिश कंपन्यांकडून अन्य राष्ट्रातील कंपन्यांकडे संक्रमित होण्याची शक्यता आहे. गुंतवणुकीचा भर सेवा क्षेत्रावर असल्याने या फंडाचा शिफारसीसाठी विचार केला.
आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एक्स्पोर्ट अ‍ॅण्ड अदर सव्‍‌र्हिसेस फंड हा फंड परताव्याचा दर उत्तम आहे. हा फंड नोव्हेंबर २०१६ मध्ये अस्तित्वाची ११ वर्षे पूर्ण करेल. मागील पाच वर्षे या फंडाचे डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड गटातील ‘क्रिसिल रँकिंग- १’ असूनही या फंड घराण्याच्या फोकस ब्लूचीप किंवा व्हॅल्यू डिस्कव्हरीसारख्या फंडांइतका हा फंड गुंतवणूकदारांच्या फारसा परिचयाचा नाही. आजपासून पाच वर्षांपूर्वी (१ जुलै २०११) रोजी गुंतविलेल्या १००००० चे ३० जून २०१६च्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’प्रमाणे २६५३०५ इतके बाजारमूल्य असून दहा वर्षांपूर्वी (१ जुलै २००६) रोजी गुंतविलेल्या १००००० चे ३० जून २०१६च्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’प्रमाणे ४६१४८४ इतके बाजारमूल्य आहे. वरील गुंतवणुकीच्या १० वर्षे परताव्याचा १६.५३% (दसादशे) तर ५ वर्षे परताव्याचा दर २१.५२% (दसादशे) आहे. हा फंड प्रामुख्याने निर्यातप्रधान व सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागात गुंतवणूक करणारा फंड आहे. मागील दहा वर्षे दरमहा ५०००ची सिप करणाऱ्या गुंतवणूकदरांना ६०००००च्या गुंतवणुकीचे ३० जूनच्या ‘रेग्युलर ग्रोथ एनएव्ही’प्रमाणे १५३१४३६ बाजारमूल्य आहे. या गुंतवणुकीचा परताव्याचा दर १७.८४% (दसादशे) आहे. मागील एका वर्षांतील या फंडाची कामगिरी व निफ्टी सव्‍‌र्हिस सेक्टर फंडाची तुलनात्मक कामगिरी कोष्टक क्रमांक- १ मध्ये दिली आहे.
arth01
हा फंड ‘थिमॅटिक’ या फंड प्रकारात मोडणारा असूनही या फंडाच्या गुंतवणुका समभागकेंद्रित नाहीत. या फंडाच्या गुंतवणुकीत औषध निर्माण, माहिती तंत्रज्ञान व बँकिंग ही गुंतवणूक असलेली फंडाची ५३% गुंतवणूक पहिल्या तीन उद्योग क्षेत्रांत आहे. ६०% लार्जकॅप प्रकारचे समभाग असून ‘थिमॅटिक’ फंड हे आर्थिक आवर्तनाशी निगडित असल्याने त्यांच्या परताव्याच्या दरात सातत्याचा अभाव असतो. या फंडाची पहिली एनएव्ही १८ नोव्हेंबर २००५ रोजी जाहीर झाली. सुरुवातीची दोन वर्षे वगळता या फंडाच्या कामगिरीत सातत्य दिसून येते हे या फंडाचे वेगळेपण. हे वेगळेपण फंडाच्या चलत सरासरीतून दिसून येते.
फंडाचा तीन वर्षे चलत सरासरी आलेख क्रमांक १ मध्ये दर्शविली आहे. २०११ चा अपवाद वगळता चलत सरासरी सकारात्मक असून २५ ते ४६% दरम्यान असल्याचे दिसून येते. फंडाचे मासिक प्रमाणित विचलन १२.८% आहे. प्रमाणित विचलन हे परतावा मिळविण्यासाठी निधी व्यवस्थापक घेत असलेली जोखीम मोजण्याचे एकक आहे. एक वर्ष, तीन वर्षे व पाच वर्षे कालावधीत उत्तम प्रमाणित विचलन असलेला हा फंड आहे.
हा फंड उत्तम परतावा देतो याची कारणे अनेक आहेत. यांपैकी महत्त्वाचे कारण म्हणजे अर्थव्यवस्था विकसित होते तेव्हा सेवा क्षेत्राचा स्थूल राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा वाढत असतो. मंदीच्या काळात उत्पादन क्षेत्राची वाढ आकुंचत जाते तर सेवा क्षेत्राची वाढ (जीडीपी मोजण्याच्या पद्धतीबाबत मतभेद असूनही) वाढते अथवा स्थिर असते. दुसरे कारण असे की, रुपयाच्या अवमूल्यनामुळे भारतातून केलेली आयात स्वस्त होते. उत्पादन क्षेत्रापेक्षा सेवा क्षेत्र अव्वल कामगिरी करते. या दोन कारणांमुळे मागील सहा वर्षांची या फंडाची कामगिरी अव्वल आहे. मागील दहा वर्षे आयसीआयसीआय प्रुडेन्शियल एक्स्पोर्ट अ‍ॅण्ड अदर सव्‍‌र्हिसेस फंडाने या फंड घराण्याच्या डायव्हर्सिफाइड इक्विटी फंडापेक्षा चांगला परतावा दिला आहे. ‘ब्रेग्झिट’मुळे येत्या दोन-एक वर्षांत जगातील काही देशांच्या अर्थव्यवस्थेला मोठे धक्के बसण्याचे संकेत मिळत आहेत. हा फंड ‘थिमॅटिक’ या फंड प्रकारात जरी मोडणारा असला तरी निर्यातप्रधान गुंतवणूकसंधी ही बदलत्या परिस्थितीतील आदर्श ‘थीम’ वाटते. मध्यम जोखीम व सरासरीहून अधिक परतावा मिळविण्याची इच्छा असणाऱ्या गुंतवणूकदारांनी या फंडाचा नवीन गुंतवणुकीसाठी विचार करणे आवश्यक आहे.
वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com