पितृपंधरवडा म्हणजे नवीन गोष्ट करण्यास अशुभ असा समज असणारी भारतीय परंपरा आहे. परंतु तिला छेद देत आपल्या खुल्या समभाग विक्रीस प्रारंभ या कंपनीने पितृपंधरवडय़ातच केला आहे. विमा अर्थात मृत्यूशी संबंधित व्यवसाय असल्याने तिच्यासाठी यापेक्षा चांगला मुहूर्त कोणता असू शकेल?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारू लागला- ‘‘राजा बाजारातील निर्देशांक जसे वरच्या दिशेला कूच करीत आहेत तसे बाजारात कंपन्यांच्या समभागांच्या प्राथमिक विक्रीसुद्धा बहरत आहेत. आजपासून आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स या कंपनीच्या खुल्या समभाग विक्रीला (आयपीओ) सुरुवात होत आहे. या कंपनीबाबत तुझे काय मत आहे, हे जाणून घेण्यास गुंतवणूकदार उत्सुक आहेत. या कंपनीला अर्ज करावा का, या प्रश्नाचे उत्तर ते तू सांगितले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’’ वेताळाने राजाला सांगितले.

‘‘बाजारात तेजीचे पुन्हा आगमन होत असतांना कंपन्यांच्या प्राथमिक विक्रींना बहर येणे स्वाभाविक आहे. चालू वर्षांचा अर्थसंकल्प मांडताना जेटली यांनी सरकारी मालकीच्या सर्वसाधारण विमा क्षेत्रातील कंपन्यांची बाजारात नोंदणी करण्याचे सूतोवाच केल्यामुळे या वर्षी विमा कंपन्यांच्या प्राथमिक विक्रीला बहर येणार हे ‘जाणत्या जनांना’ आधीपासून ठाऊक होते. विमा उद्योगांच्या अपेक्षित विक्रीपैकी आयुर्विमा व्यवसायात खासगी क्षेत्रातून आलेल्या पहिल्या कंपनीच्या विक्रीला आजपासून प्रारंभ होत आहे. आर्थिक उदारीकरणाला सुरुवात झाल्यानंतर खासगी कंपन्यांना विमा व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली. या कंपनीने २००१ मध्ये पहिली पॉलिसी विकून व्यवसायास प्रारंभ केला. खासगी विमा कंपन्यांपैकी पहिली पॉलिसी विकण्याचा मान या कंपनीला जातो. भारतातील विमा व्यवसाय दीडशे वर्षे जुना व्यवसाय आहे. अत्यंत फायदेशीर असलेल्या या व्यवसायातील नफ्याचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी व्हावा आणि दावे नाकारणाऱ्या कंपन्यांना वठणीवर आणण्यासाठी २९ फेब्रुवारी १९५६ रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी विमा व्यवसायाचे राष्ट्रीयीकरण केले. अर्थसंकल्पात ५ कोटींचे सुरुवातीचे भागभांडवल देऊन ‘भारतीय आयुर्विमा महामंडळ- एलआयसी’ची स्थापना केली. एलआयसीचे ‘योगक्षेमं वहाम्यहम्’ या ब्रीदवाक्याची निवड सीडींचीच. १ सप्टेंबर १९५६ रोजी ‘एलआयसी’ने व्यवसायास प्रारंभ केला. ‘घराघरांत विमा’ ही संकल्पना पोहोचविण्याचे काम नि:संशय एलआयसीने केले,’’ राजा म्हणाला.

‘‘भारतातील विमा व्यवसायाचे नियंत्रण विमा कायदा आणि ‘भारतीय विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण’ यांच्या माध्यमातून केले जाते. आर्थिक उदारीकरणानंतर भारतात विमा व्यवसाय करण्यास खासगी कंपन्यांना अनुमती असावी असा भारतावर विमा व्यवसायाची मातृभूमी असलेल्या अमेरिकेने कायम आग्रह धरला होता. किंबहुना अणुऊर्जेच्या कराराहून अधिक अमेरिका याबाबत आग्रही होती. कारण या व्यवसायात असलेल्या नफ्याच्या प्रमाणामुळे. भारतीय विमा कायद्यात बदल केल्यानंतर नव्याने व्यवसायात पाऊल ठेवणाऱ्या कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भारतीय विमा नियमन व विकास प्राधिकरणाची स्थापना केल्यानंतर खासगी कंपन्यांना विमा व्यवसाय करण्यास परवानगी मिळाली. ३१ मार्च २०१६ रोजी भारतात सरकारच्या मालकीच्या एलआयसी वगळता अन्य २३ कंपन्या आयुर्विमा व्यवसायात होत्या. विमा व्यवसायाच्या खासगीकरणानंतर राष्ट्रीयीकृत विमा कंपनीचा व्यवसायातील वाटा हळूहळू कमी होत गेला. युलिप योजनांना लाभलेल्या पसंतीमुळे २००९ मध्ये ५७ टक्के वाटा मिळवून खासगी विमा कंपन्यांनी व्यवसायाचे शिखर गाठले. यानंतर झालेल्या बदलामुळे व युलिपच्या खर्चावर मर्यादा आल्याने ३१ मार्च २०१६ रोजी संपलेल्या वर्षांत खासगी विमा कंपन्यांचा वाटा ३५ टक्के होता. आर्थिक वर्ष २०१६ मध्ये ३.७ लाख कोटींचे हप्ते विमा कंपन्यांनी गोळा केल्यामुळे भारतातील आयुर्विमा व्यवसायाची बाजारपेठ विमा हप्त्यांच्या तुलनेत जगातील दहाव्या क्रमांकाची व आशिया खंडातील पाचव्या क्रमांकाची बाजारपेठ आहे. २००० ते २०१६ दरम्यान बाजारपेठ १७ टक्के वार्षिक वेगाने ती वाढली आहे. हा व्यवसाय वाढण्याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. पहिले अर्थात एकूण लोकसंख्येच्या तुलनेत विमा खरेदी इच्छुक वयातील लोकसंख्येचे मोठे प्रमाण. दुसरी गोष्ट अशी की, विमा हप्त्यांचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाशी असलेले अल्प प्रमाण. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीला अकाली गमावणे हे श्रीमंत अथवा गरीब दोघांनासुद्धा त्रासदायक असते. एकत्र कुटुंब पद्धतीमुळे भारतीयांनी विम्याला कायम दुय्यम स्थान दिले. आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळे कमावत्या व्यक्तीचा विमा असणे जरुरीचे झाले आहे,’’ राजा म्हणाला.

‘‘भारतात एलआयसीची मक्तेदारी असताना पॉलिसी ही विम्यापेक्षा कर बचतीचे साधन म्हणून विकत घेतली जाणारी सेवा होती. आता काळ बदलल्याने व प्रसारमाध्यमे व मोबाइलच्या माध्यमातून इंटरनेट खेडय़ापाडय़ात पोहोचल्यामुळे लोक अर्थसाक्षर होऊ  लागले आहेत. विम्यासाठी विमा ही संकल्पना हळूहळू जोम धरू लागली आहे. भारतीय बाजारपेठेत परदेशी कंपन्यांचा शिरकाव झाल्यामुळे भारतीय विमा खरेदीदारांना अनेक पर्याय उपलब्ध झाले आहेत. जसे की, वैयक्तिक किंवा समूह विमा, ‘सिंगल प्रीमियम’ किंवा रेग्युलर प्रीमियम पॉलिसी, पार्टिसिपेटरी किंवा नॉन पार्टिसिपेटरी वगैरे पर्याय देऊ  केले गेले आहेत,’’ राजा म्हणाला.

‘‘विमा कंपन्यांसाठी विम्याचा हप्ता हे उत्पन्न तर मृत्यूदावे हा खर्च असतो. विमा व्यवसाय फायदेशीर असण्यासाठी विमा विकतेवेळी विमा विक्रीचे निकष कठोर असणे आवश्यक असते किंवा दावे नाकारावे लागतात. व्यवसाय वृद्धीसाठी सुरुवातीला लवचीकता बाळगणाऱ्या विमा कंपन्या आज विमा कंपन्यांनी आपले निकष कठोर करून आपली विमा उत्पादने केवळ निवडक विमा खरेदी इच्छुकांना विमा विकताना दिसतात. थोडक्यात सांगायचे तर ज्याच्याकडे मोठा आरोग्य विमा आहे, जो दारू पीत नाही, तंबाखूचे व्यसन नाही अशाच विमा खरेदी इच्छुकास या कंपन्या पॉलिसी विकतात. तसेच नैसर्गिक आपत्ती, दहशतवादी हल्ले यासारख्या प्रसंगांत मृत्यू आल्यास विमा दावा न स्वीकार करण्याची तजवीज या विमा कंपन्यांनी अस्वीकृतीच्या खाली केलेली असते. साहजिकच या कंपन्यांचा विमा खरेदी केलेल्यांचा मृत्यूदर अतिशय कमी आहे. आणि दुर्दैवाने एखादा स्वीकारण्यायोग्य दावा आलाच तर नुकसान होऊ  नये म्हणून विमा कंपन्यांनी स्वीकारलेली जोखीम या विमा कंपन्या रि-इन्शुरन्सच्या माध्यमातून दुसऱ्या कंपनीला विकत असतात. विमा व्यवसाय मिस-सेलिंगचे प्रमाण खूपच आहे. ग्राहकाची गरज हा निकष न राहता विशिष्ट विमा उत्पादन विकल्यावर मिळणारे कमिशनला प्राथमिकता दिल्याने विमा विकणाऱ्या बँका व त्याहून लबाड विमा विक्रेते यांनी विमा व्यवसायाला बदनाम केले आहे. आज बँकांच्या ‘रिलेशनशिप मॅनेजर’ ‘एलआय’वर विसंबून आपले टार्गेट पूर्ण करतात,’’ राजा म्हणाला

‘‘मानवी जीवन म्हणजे अशाश्वतता. या अनिश्चिततेवर मात करण्यासाठी विमा या संकल्पनेचा जन्म झाला. विम्याची संकल्पना जरी अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर आधारित असली तरी भारतातील विमा खरेदीयोग्य वयातील तरुण लोकसंख्येमुळे भारतातील विमा व्यवसाय पुढील शंभर वर्षे नफ्यात असणार आहे. एचडीएफसी व मॅक्स लाइफ यांचे विलीनीकरण करताना मॅक्स लाइफचे जे मूल्यांकन केले त्यापेक्षा आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सचे मूल्यांकन १० ते १५ टक्के कमी दराने केले असल्याने नोंदणीपश्चात हा समभाग चांगला नफा मिळवून देईल. केवळ नजीकचा विचार न करता दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हा समभाग आपल्या गुंतवणुकीत असायलाच हवा. पितृपंधरवडा नवीन गोष्ट करण्यास अशुभ समजण्याच्या भारतीय परंपरेला छेद देत कंपनीने आपल्या खुल्या समभाग विक्रीला पितृ पंधरवडय़ात प्रारंभ केला आहे. मृत्यूशी संबंधित व्यवसाय असल्याने यापेक्षा अधिक चांगला मुहूर्त प्रारंभिक विक्रीसाठी कंपनीला सापडला नसता,’’ राजा म्हणाला. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.

पुंगीवाला -gajrachipungi@gmail.com