आयडीएफसी स्टर्लिग इक्विटी फंड
आयडीएफसी स्टलिंग इक्विटी हा आयडीएफसी फंड घराण्याचा मिड कॅप फंड आहे. या फंडाचे वैशिष्टय़ असे की, १८ टक्के गुंतवणूक कूस बदलणाऱ्या उद्योग क्षेत्रातून त्याने केली आहे. तर ३० टक्के गुंतवणूक असलेल्या कंपन्या संक्रमणातून जात आहेत. व्यावसायिक वाटचालीतील कठीण काळ मागे पडून सुधारणा दिसू लागलेल्या असलेल्या क्षेत्रात फंडाने केलेली गुंतवणूक भविष्यात लाभदायक ठरेल
एखाद्या आईवडिलांची सर्वच मुले कर्तृत्ववान असावीत, परंतु एखाद्या जास्त कर्तृत्ववान मुलामुळे अन्य भावंडांची कामगिरी झाकोळून जावी असे काहीसे आयडीएफसी या फंड घराण्याचे झाले आहे. जवळजवळ प्रत्येक फंड गुंतवणूकदाराच्या गुंतवणुकीत आयडीएफसी प्रीमियर इक्विटी हा मल्टी कॅप फंड असतो. या फंडाने गुंतवणूकदारांना भरभरून परतावा दिल्यामुळे अन्य फंडाची कामगिरी त्या फंड गटातील अन्य फंडाच्या परताव्याच्या दराच्या सरासरीपेक्षा उजवी असूनही हे फंड गुंतवणूकदार या समुदायास तसे अनभिज्ञच राहिले आहेत. या फंड घराण्याच्या आयडीएफसी स्टर्लिग इक्विटी या मिड कॅप शिलेदाराची आज शिफारस करीत आहे. मागील वर्षभरात या फंड घराण्याच्या व्यवस्थापनात व विशेषत: निधी व्यवस्थापनात बरेच बदल झाले. अनुप भास्कर यांच्यासारखा जाणता, अनुभवी निधी व्यवस्थापक समभाग गुंतवणूक प्रमुख म्हणून या फंड घराण्यात दाखल झाला. त्यांच्यापाठोपाठ डॅनियल पिंटो हेदेखील यूटीआय म्युच्युअल फंडातून आले. सुमित अग्रवाल हे मिरॅ अॅसेट इंडिया या म्युच्युअल फंडातून आयडीएफसी म्युच्युअल फंडात निधी व्यवस्थापक म्हणून दाखल झाले.
विशाल कपूर यांनी या फंडाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. मागील १८ महिन्यांत त्यांनी आयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या कार्यशैलीत बरेच बदल केले. गौरव पारिजा हे फ्रँकलिन टेम्पलटन म्युच्युअल फंडातून आयडीएफसी म्युच्युअल फंडात विपणनप्रमुख म्हणून दाखल झाले. त्यामुळे आयडीएफसी म्युच्युअल फंडाच्या वरिष्ठ व्यवस्थापनात अनेक चांगले बदल झाले आहेत. यासारखे निधी व्यवस्थापक वेगवेगळ्या फंड घराण्यातून आयडीएफसीमध्ये दाखल झाल्याने आयडीएफसीच्या निधी व्यवस्थापनाचा दर्जा सुधारला. डॅनियल पिंटो हे आयडीएफसी स्टर्लिग इक्विटीचे निधी व्यवस्थापक आहेत. आयडीएफसीत दाखल होण्याआधी डॅनियल पिंटो हे २००६ ते २०१६ दरम्यान यूटीआय म्युच्युअल फंडात निधी व्यवस्थापक होते. त्यांच्याकडे यूटीआय खात्यात लॉजिस्टिक्स अँड ट्रान्स्पोर्टेशन फंडाची लखलखीत कामगिरी जमा आहे.
आयडीएफसी स्टलिंग इक्विटी फंडाची पहिली एनएव्ही ७ मार्च २००८ मध्ये जाहीर झाली. पहिल्या रेग्युलर एनएएव्ही ग्रोथनुसार फंडात १ लाख रुपयांची गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदाराचे १६ जून २०१७च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार ४.८५ लाख झाले असून परताव्याचा वार्षिक दर १८.३२ टक्के असा आहे. हा आयडीएफसी फंड घराण्याचा मिड कॅप फंड आहे. या फंडाचे वैशिष्टय़ असे की, फंडाच्या एकूण गुंतवणुकीपैकी ५० टक्के गुंतवणूक त्या त्या उद्योग क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. जसे की बँक ऑफ बडोदा, एमआरएफ इत्यादी. शिवाय फंडाच्या गुंतवणुकांत फ्युचर रिटेल्स, रॅम्को सिमेंट, बजाज फायनान्स, इंजिनीयर्स इंडिया, केईसी इंटरनॅशनल या कंपन्यांचा समावेश आहे. या फंडाने १८ टक्के गुंतवणूक कूस बदलणाऱ्या उद्योग क्षेत्रातून केली आहे. ३० टक्के गुंतवणूक ही इगंरसी मोटर्स (भांडवली वस्तू), हायकल (औषध निर्मिती), आदित्य बिर्ला फॅशन (वस्त्रोद्योग), केपीआर मिल्स, इंडियन हॉटेल्स (आदरातिथ्य) अशा संक्रमणातून जात असलेल्या कंपन्यांत आहे. व्यावसायिक वाटचालीतील कठीण काळ मागे पडून सुधारणा दिसू लागलेल्या असलेल्या क्षेत्रात फंडाने केलेली गुंतवणूक भविष्यात लाभदायक ठरेल. जसे की बँका व आर्थिक सेवा क्षेत्रातील कंपन्या, भांडवली वस्तू, जोखीम नियंत्रणाच्या दृष्टीने प्रत्येक कंपनीतील गुंतवणूक एकूण फंडाच्या गुंतवणुकीच्या एक टक्क्यापेक्षा अधिक असत नाही. या प्रकारची गुंतवणूक एकूण गुंतवणुकीच्या ३० टक्के आहे. फंडाची आघाडीच्या कंपन्यांतील गुंतवणूक स्थैर्य तर अर्थचक्राच्या दिशानुरूप केलेल्या गुंतवणुका वृद्धी देतात.
अर्थव्यवस्था विकसित होत असताना अर्थव्यवस्थेत नव्याने व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतात. जसे की, चाळीस वर्षांपूर्वी गृहकर्जाची मोठी बाजारपेठ एच. टी. पारेख यांनी हेरली व त्यातून एचडीएफसीचा जन्म झाला. नजीकच्या काळात एफएम रेडिओ ही बाजारपेठ निर्माण झाली. अशा संधींच्या शोधात या फंडाचे निधी व्यवस्थापक असतात. अशा संधी उपलब्ध होताच त्या संधीचा जोखीम व नफा यांचे विश्लेषण करून याबाबत गुंतवणुकीचा निर्णय घेण्यात येतो. परंतु व्यवसायवृद्धीसाठी समभागाच्या माध्यमातून भांडवली उभारणी न करणाऱ्या कंपन्यांना प्राधान्य दिले जाते.
या फंडात गुंतवणुकीची शिफारस करण्यामागे एक महत्त्वाचे कारण म्हणजे १ जुलैपासून येऊ घातलेला वस्तू व सेवा कर (जीएसटी) या नवीन करप्रणालीची अंमलबजावणी. लघू व मध्यम उद्योगांना मुख्यत्वे असंघटित क्षेत्रातील उत्पादकांशी स्पर्धा करावी लागते. असंघटित क्षेत्रातील उत्पादकांचा खर्च कमी असण्यास मुख्यत्वे कर-चोरी कारणीभूत आहे. वस्तू व सेवा कर कायदा अमलात आल्यामुळे लघू व मध्यम उद्योगांना करचोरी करणे सोपे राहणार नाही. असंघटित क्षेत्रातील उद्योगांचा उत्पादन खर्च वाढल्याने याचा फायदा संघटित क्षेत्रातील मिड कॅप कंपन्यांना होईल. हा परिणाम कंपन्यांच्या उत्सर्जनात दिसून येण्यास जरी वेळ लागला तरी पुढील आर्थिक वर्षांच्या दुसऱ्या तिमाहीपासून उत्सर्जनातील वाढ दिसून येण्यास सुरुवात होईल. तीन ते पाच वर्षांसाठी नव्याने गुंतवणुकीस सुरुवात करण्यास किंवा नव्याने नियोजनबद्ध गुंतवणुकीस सुरुवात करण्यास हा फंड योग्य वाटतो.
(अस्वीकृती: लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. स्तंभातील आकडेवारी व माहिती ही उपलब्ध स्रोतांपासून घेतली आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)
shreeyachebaba@gmail.com