वर्ष २००५ पासून कार्यरत असलेली इंडिया बुल्स हौसिंग फायनान्स ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी गृह वित्त कंपनी आहे. सध्या इंडिया बुल्स हौसिंगच्या २०० शाखा असून सुमारे १०० शहरांतून त्या कार्यरत आहेत. तसेच दुबई आणि लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसाठी कार्यालये स्थापन केली आहेत. यंदाच्या दिवाळीत कंपनीने ब्रिटनमधील ओक नॉर्थ बँकमधील ३९.७६% हिस्सा ६६० कोटी रुपयांना खरेदी केला आहे. कंपनीचे चेअरमन श्री. गेहलोटदेखील स्वत १०% हिस्सा खरेदी करीत आहेत. कंपनीने ही बातमी जाहीर केल्यावर शेअर बाजारात याची प्रतिक्रिया अपेक्षेप्रमाणे थोडी विपरीत झालेली दिसत असली तरीही कंपनी व्यवस्थापनानुसार या गुंतवणुकीमुळे  सध्याच्या कामगिरीवर आणि नफ्यावर आगामी काळात सकारात्मक परिणाम दिसून येईल. दर वर्षी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करून दाखवणाऱ्या या कंपनीचे लाभांश वितरणाचे प्रमाण नक्त नफ्याच्या ५२% आहे. तसेच गेल्या पाच वर्षांत कंपनीने दर वर्षी नक्त नफ्यात सरासरी १५०% वाढ दाखवली आहे. व्यवस्थापनाच्या मते या गुंतवणुकीमुळे कंपनीचे जागतिक बाजारपेठेतील तसेच इतर वित्तीय सेवेतील स्थान मजबूत झाले आहे. सध्या देशांतर्गत रटए क्षेत्रातील वित्त सहाय्य करणारी इंडिया बुल्स ही एक अग्रेसर कंपनी आहे.
कंपनीचे ३० सप्टेंबर २०१५ साठी जाहीर झालेले वित्तीय निष्कर्ष अपेक्षेप्रमाणे उत्तम आहेत. उलाढालीत (रु. २२४५.७२कोटी) गेल्या तिमाहीच्या तुलनेत ३२.७ % ची वाढ साध्य करतानाच कंपनीने नक्त नफ्यातही २३.९४ % ची वाढ करून तो ५५५.५४  कोटी रुपयांवर गेला आहे.
दोन वर्षांपूर्वी याच स्तंभातून (डिसेंबर २०१३), हा शेअर २२५ रुपये पातळीवर असताना सुचवला होता. ज्या गुंतवणूकदारांनी तेव्हा या शेअरमध्ये गुंतवणूक केली आहे ते जवळपास २००% नफ्यात आहेत. मात्र ज्या गुंतवणूकदारांची ही संधी हुकली होती, त्यांना अजूनही यांत गुंतवणूक करायला हरकत नाही.
stocksandwealth@gmail.com

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indiabulls housing finance shares