फ्रँकलिन इंडिया फ्लेक्झीकॅप फंड

सेन्सेक्स व निफ्टीच्या ‘पी/ई’ने २२चा टप्पा ओलांडल्यावर या महागडय़ा मूल्यांकनावरसुद्धा गुंतवणूक करावी किंवा कसे, हा प्रश्न नव्याने गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना पडण्याची शक्यता आहे. तर बाजार आजही बिलकुल धोकादायक पातळीवर नसल्याचा अध्याय देणारा हा डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड पर्याय..

डायव्हर्सिफाइड इक्विटी फंड गटातील लार्ज कॅप, मिड कॅप, मायक्रो कॅप प्रकारच्या समभागांत गुंतवणूक करणाऱ्या फंडांना फ्लेक्झीकॅप फंड अशी संज्ञा वापरण्यात येते. फ्लेक्झीकॅप फंडांना लार्ज कॅप समभाग गुंतवणूक स्थैर्य तर मिड कॅप गुंतवणूक वृद्धी प्रदान करतात. फंड व्यवस्थापक योग्य मूल्यांकन असलेल्या समभागात गुंतवणूक करतात. फ्लेक्झीकॅप फंड हे सक्रिय व्यवस्थापन असलेले फंड असतात. फंडाच्या सक्रिय व्यवस्थापनामुळे फ्लेक्झीकॅप फंडातील गुंतवणुकीवरील परतावा अधिक असतो. याच गटातील फ्रँकलिन इंडिया फ्लेक्झीकॅप फंडाची २ मार्च २००५ रोजी पहिली एनएव्ही जाहीर झाली. फंडाच्या पहिल्या एनएव्हीला १ लाख गुंतवणुकीचे, ३१ मे २०१७ रोजी ७.२९ लाख रुपये झाले आहेत. फंडात सुरुवातीपासून केलेल्या गुंतवणुकीवर वार्षिक १७.४५ टक्के दराने परतावा मिळालेला आहे. ३० एप्रिल रोजी या फंडाची मालमत्ता २,९५० कोटी होती. राष्ट्रीय शेअर बाजाराचा ‘सीएनएक्स ५००’ हा निर्देशांक या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. या फंडाला ‘मॉर्निग स्टार’ने ‘थ्री स्टार’ तर ‘व्हॅल्यू रिसर्च ऑनलाइन’ने ‘फाइव्ह स्टार’ रेटिंग दिले आहे. या फंडाचे निधी व्यवस्थापन सुरुवातीपासून आजपर्यंत तीन निधी व्यवस्थापकांनी केले. के . एन. शिवसुब्रमण्यम हे फंडाच्या सुरुवातीपासून फेब्रुवारी २०१४ पर्यंत निधी व्यवस्थापक होते. मार्च २०१४ ते एप्रिल २०१६ र्प्यत आर. जाकीरामन व रोशी जैन या जोडीने फंडाचे निधी व्यवस्थापन केले. २ मे २०१६ पासून फंडाच्या निधी व्यवस्थापनाची सूत्रे लक्ष्मीकांत रेड्डी यांच्याकडे आली व आर. जाकीरामन हे सहनिधी व्यवस्थापक झाले. फंडाचे निधी व्यवस्थापक जरी बदलले तरी समभाग गुंतवणुकीचे निकष फारसे बदलले नाहीत. एखादा व्यवसाय नफ्यात असण्याची शाश्वत हमी, आपल्या उत्पादनाची किंमत ठरविण्याचे स्वातंत्र्य, दर्जेदार व्यवस्थापन या निकषांवर गुंतवणुकीसाठी समभागांची निवड करण्यात येते. लक्ष्मीकांत रेड्डी यांच्याकडे निधी व्यवस्थापनाची सूत्रे आल्यानंतर या फंडाची पत ‘मॉर्निग स्टार’ने ‘फोर स्टार वरून ‘थ्री स्टार’ केली. लक्ष्मीकांत रेड्डी हे फ्रँकलिन टेम्पलटन फंड घराण्यात व्हाइस प्रेसिडेंट व पोर्टफोलिओ मॅनेजर या पदावर काम करतात. लक्ष्मीकांत रेड्डी फ्रँकलिन टेम्पलटन फंड घराण्यात दाखल होण्यापूर्वी जून २००४ ते फेब्रुवारी २०१६ दरम्यान आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनीत समभाग गुंतवणूक प्रमुख होते. रेड्डी यांना २० वर्षांचा गुंतवणूक व्यवस्थापनातील अनुभव आहे.

arth05

फंडाच्या गुंतवणुकीत ७६ टक्के लार्ज कॅप व २१ टक्के मिड कॅप व उर्वरित रोकड सममूल्य गुंतवणुकांचा समावेश आहे. मागील ३८ तिमाहीत फंडाची कामगिरी संदर्भ निर्देशांकाहून उजवी आहे. फंडाच्या ३१ मेच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार फंडाने मागील एका वर्षांत १७.८७ टक्के, ३ वर्षांत १६.३१ टक्के, ५ वर्षांत २०.३५ टक्के, १० वर्षांत १२.७६ टक्के परतावा दिला आहे. मागील चार वर्षांत फंडाच्या परताव्याचा वृद्धी दर आर्थिक चक्राच्या दिशा परिवर्तनामुळे मंदावलेला असला तरी फ्लेक्झीकॅप फंड गटातील ‘आयसीआयसीआय प्रुडेन्शियल टॉप २००’पेक्षा परताव्याचा दर ४ ते ६ टक्के अधिक आहे. मागील १८ ते २१ महिन्यांत फंडाने औषधनिर्माण व माहिती तंत्रज्ञान कंपन्यांतील गुंतवणूक कमी करून बँका व वाहन क्षेत्रातील गुंतवणूक वाढविली आहे. फंडाच्या आघाडीच्या गुंतवणुकीत एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र, भारतीय स्टेट बँक व ग्रासिम या कंपन्यांचा समावेश आहे. फंडाच्या सुरुवातीपासून ५ हजारांची नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक (एसआयपी) केलेल्या गुंतवणूकदारांच्या ७ लाख ३० हजार रुपये गुंतवणुकीचे आज २० लाख १५ हजार रुपये झाले आहेत. सेन्सेक्स व निफ्टीच्या ‘पी/ई’ने २२चा टप्पा ओलांडल्यावरसुद्धा नवीन गुंतवणूक करावी किंवा कसे, हा प्रश्न नव्याने गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना पडण्याची शक्यता आहे. सेन्सेक्स व निफ्टीमध्ये सर्वाधिक प्रभाव बँकिंग क्षेत्राचा आहे. आर्थिक वर्ष २०१६च्या चौथ्या तिमाहीच्या तुलनेत आर्थिक वर्ष २०१७च्या  चौथ्या तिमाहीचे बँकांचे निकाल खूपच चांगले आहेत. उदाहरणादाखल विचार केल्यास स्टेट बँकेच्या नफ्यात ११८ टक्के वाढ झाली आहे. याचा परिणाम बँकांच्या समभागाच्या किमतीत मोठी वाढ झाली. निफ्टी व सेन्सेक्स या निर्देशांकांमधून बँकिंग क्षेत्राचा ‘पी/ई’ वजा केल्यास निर्देशांकांचा उर्वरित ‘पी/ई’ १६ पट भरेल. म्हणूनच बाजार बिलकुल धोकादायक पातळीवर नाही, हे लक्षात घ्यावे लागेल.

वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com