टाटा बॅलेन्स्ड फंड
फंडाच्या निधी व्यवस्थापनात नुकतेच खांदेपालट झाला असून अतुल भोळे यांच्या जागी प्रदीप गोखले यांची फंडाचे निधी व्यवस्थापक म्हणून नियुक्ती झाली आहे. सध्या फंडाची कामगिरी उतरणीला लागली असली तरी मागील वर्षभराची फंडाची ‘सिप’ कामगिरी कोष्टक क्रमांक-१ मध्ये दिली आहे. बॅलेन्स्ड फंड गटात सात दहा व फंडाच्या सुरुवातीपासून म्हणजेच ८ ऑक्टोबर १९९५ पासून १०,००० रुपयांची ‘सिप’ करणाऱ्या गुंतवणूकदाराच्या १३,३०,०००च्या गुंतवणुकीचे २२,९०,००० झाले असून परताव्याचा दर ९.४२ टक्के आहे. मागील २० वर्षे टाटा बॅलेन्स्ड फंडाची ‘सिप’ कामगिरी पहिल्या पाच बॅलेन्स्ड फंडात राहिली आहे. साहजिकच सेवा निवृत्तिकोश तयार करण्यासाठी हा फंड एक आदर्श गुंतवणूक ठरतो.
फंडाने ७५ टक्के गुंतवणूक समभागात तर उर्वरित २५ टक्के गुंतवणूक रोख्यांत केली आहे. हा फंड समभाग गुंतवणुकीत ‘व्हॅल्यू इन्व्हेस्टिंग’ तंत्राचा वापर करणारा फंड असून योग्य मूल्यांकन व नफ्यात वृद्धी होणाऱ्या कंपन्यांच्या समभागांना गुंतवणुकीसाठी पसंती देणारा फंड आहे. या फंडाने गुंतवणुकीचा मोठा हिस्सा लार्ज कॅप प्रकारच्या समभागात गुंतविला आहे. वाहन उद्योग व वाहन उद्योगासाठी पूरक उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्या बँका, सिमेंट, बांधकाम, ग्राहकोपयोगी चैनीच्या वस्तू, या उद्योगक्षेत्रांना फंडाने गुंतवणुकीसाठी प्राथमिकता दिली आहे. सरकारकडून केला जाणारा भांडवली खर्च, खासगी क्षेत्राकडून विकसित होणारे प्रकल्प, सामान्य जनतेकडून होणारी खरेदी आणि निर्यात हे चार घटक अर्थचक्राला गती देण्याचे काम करीत असतात. यापैकी खासगी क्षेत्राकडून क्षमता वाढ व निर्यात हे घटक ठप्प झालेले असताना अर्थव्यवस्थेची मदार सरकारकडून पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर होणारा खर्च व सामान्य जनतेकडून होणारी चैनीच्या वस्तूंची खरेदी (Consumer Discretionary) यावर असल्याने याचे प्रतिबिंब फंडाच्या गुंतवणुकीतून दिसून येते. फंडाच्या गुंतवणुकीत असलेले अॅस्ट्रापॉली, सद्भाव इंजिनीअरिंग, श्री सिमेंट, व्हीए टेक वाबाग, अडानी पोर्ट हे अर्थव्यवस्थेला चालना देत असलेल्या पहिल्या घटकाचे प्रतिनिधित्व करतात तर एचडीएफसी बँक, सेरा सॅनिटरीवेअर, बॉश, आयशर मोटर्स, कजारिया सिरॅमिक्स हे अर्थव्यवस्थेला चालना देत असलेल्या दुसऱ्या म्हणजे ग्राहकांकडून चैनीच्या वस्तूंच्या होणाऱ्या खरेदीच्या घटकाचे प्रतिनिधित्व करतात.
फंडाच्या रोखे गुंतवणुकीपैकी साधारण २० टक्के गुंतवणूक २०२७-२८ दरम्यान मुदतपूर्ती असलेल्या केंद्र सरकारच्या रोख्यांत केली गेली असून स्थिर उत्पन्न गुंतवणुकीवरचा परतावा वाढविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या २०२४ व २०२५ मध्ये मुदतपूर्ती असलेल्या रोख्यांत केली आहे. फंडाच्या स्थिर उत्पन्न गुंतवणूकांपैकी ५७ टक्के रोखे गुंतवणूक ‘ट्रिपल ए’ व ‘ए-१’ ही सर्वोच्च पतधारण करणाऱ्या रोख्यांमध्ये आहे. फंडाच्या एनएव्हीतील चढ-उतार वेगाने होतात. फंडाच्या एनएव्हीचे तीन वर्षांच्या कालावधीतील प्रमाणित विचलन १२ टक्के तर पाच वर्षे कालावधीतील प्रमाणित विचलन २१ टक्के आहे. परंतु फंडाचा जोखीम संलग्न परतावा ((Sharpe Ratio) अधिक असल्याने तेजीच्या कालावधीत हा फंड अन्य बॅलेन्स्ड फंडांच्या तुलनेत अव्वल कामगिरी करेल.
बॅलेन्स्ड फंडात गुंतविलेली रक्कम १२ महिन्यांच्या आत काढून घेतल्यास निर्गमन शुल्क लागू होत असल्याने गुंतवणूक केल्यापासून १२ महिन्यांनतर दरमहा पैसे काढून घेता येऊ शकतात. सेवानिवृत्तिकोशाचा विचार करताना दीर्घकाळ ‘सिप’ व सेवानिवृत्तीनंतर ‘एसडब्ल्यूपी’ अर्थात ‘सिस्टेमॅटिक विथड्रॉवल प्लान’चा विचार न करणे हे अर्थनिरक्षरतेचे द्योतक आहे व हेच वास्तव या सर्वेक्षणाने अधोरेखित केले आहे. कोष्टक क्रमांक २ मध्ये टाटा बॅलेन्स्ड फंडाची ‘एसडब्ल्यूपी’ कामगिरी दाखविली आहे. तर कोष्टक क्रमांक ३ मध्ये वेगवेगळ्या बॅलेन्स्ड फंडांची ‘एसडब्ल्यूपी’चा तुलनात्मक आढावा घेण्यात आला आहे.
विमा पेन्शन योजनांपेक्षा हा पर्याय जोखमीचा आहे. परताव्याचा दर व गुंतवणुकीतील जोखीम यांचे प्रमाण नेहमीच व्यस्त असते. कमी होत जाणारे व्याजदर, वाढत्या वैद्यकीय संशोधनामुळे आयुर्मान वाढत असल्याने व वाढत्या महागाईमुळे गुंतवणुकीत जोखीम स्वीकारण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. वयाच्या तिशीपासून साठीपर्यंत दरमहा ‘सिप’च्या माध्यमातून मोठा निधी तयार करून सेवानिवृत्तीनंतर ‘एसडब्ल्यूपी’च्या माध्यमातून हाच निधी उदरनिर्वाहासाठी वापरता येतो. दीर्घ काळ ‘सिप’ केल्याने काढून घेतलेला निधी हा १२ महिन्यांच्यानंतर काढला असल्याने हा निधी काढून घेतल्याबद्दल म्युच्युअल फंडाला ना निर्गमन शुल्क द्यावे लागते ना सरकारला कोणताही कर द्यावा लागतो.
वसंत माधव कुलकर्णी- shreeyachebaba @gmail.com
फंड विश्लेषण : सेवा निवृत्तिकोशासाठी आदर्श गुंतवणूक..
भारतात बॅलेन्स्ड फंड ही संकल्पना गुंतवणूकदारांना उपलब्ध झाल्याला वीसहून अधिक वर्षे होत आली आहेत.
Written by वसंत माधव कुलकर्णी
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 06-06-2016 at 00:30 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Invest retirement money in tata balanced fund