राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारू लागला. ‘राजा एका मालमत्ता विकासकाने हितचिंतकांना पाठविलेल्या दिवाळीच्या शुभेच्छापत्रासोबत आपल्या मुदत ठेवीधारकांना एक कळकळीची विनंती केली असून, या वर्षभरात मुदतपूर्ती असलेल्या ठेवींचे नूतनीकरण करण्याचा आग्रह धरला आहे. हे शुभेच्छापत्र की भविष्यातील धोक्याचा इशारा आहे या संभ्रमात हे ठेवीदार आहेत. या पाश्र्वभूमीवर ठेवीधारकांनी आपल्या ठेवी काढून घ्याव्या, की या कंपनीच्या आग्रहाला मान देत नूतनीकरण करावे? या प्रश्नाचे उत्तर तुझ्याकडून हवे आहे. या प्रश्नाचे उत्तर तू सांगितले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’ वेताळाने राजाला सांगितले.

‘आपणच भरविलेल्या गप्पांच्या फडात व्यासपीठावरून बोलताना या व्यक्तीस मधुमेह झाला असावा अशी शंका यावी इतका हा विकासक गोड बोलतो. या विकासकाने इतक्या चढय़ा भावात आपल्या समभागांची विक्री करून घेतली हे त्याच्या याच ‘गुणा’चे गमक. आपल्या या यशसिद्धीचे मुदत ठेवींचे अर्ज, समभाग विक्रीचे माहितिपत्रक आदी गोष्टी पाठविण्याच्या निमित्ताने आपल्या जुन्या ग्राहकांना आपले स्मरण करून देत असतो. या विकासकाने काही वर्षांपूर्वी चढय़ा व्याजाने स्वीकारलेल्या मुदत ठेवींची आता मुदतपूर्ती आली असून अनेक प्रकल्प रखडल्यामुळे या ठेवींची मुदत संपल्यानंतर पैसे परत करणे कठीण झाले असल्याने या विकासकाने मुदतवाढीचा आग्रह धरला आहे. या पत्रामुळे ‘घराला घरपण’ देण्याची गोष्ट सांगणाऱ्यामुळे सेवानिवृत मुदत ठेवीधारकांची झोप उडणे स्वाभाविकच,’ राजा म्हणाला.

‘सध्या स्वप्न नगरीच्या उभारणीत व्यस्त असलेल्या या विकासकाने ‘विश्व’ उभारले. या ‘विश्वा’त वाहणाऱ्या ‘रानवाऱ्या’ने व उगवणाऱ्या ‘सायंताऱ्या’ने ग्राहकांना भुलवले. या विकासकाने स्थावर मालमत्तेसोबत दुचाकी बांधणी मोटारीचे विक्री दालन, इंटरनॅशनल कॅम्पस, कबड्डी संघ यांसारख्या आपल्या मूळ व्यवसायाशी असंबद्ध उद्योगांतून गुंतवणुका केल्या. रोकड सुलभता आटली, देणी वेळेवर देता आली नाहीत. साहजिकच कुजबुज वाढल्यावर लोक आमच्याबद्दल बरे वाईट बोलतात अशी तक्रार करायलासुद्धा भीडभाड बाळगायची नाही हा यांचा पेठेतला खाक्या,’ राजा म्हणाला.

‘अनेक ठेवीदारांनासुद्धा अधिक व्याजाचा लोभ असतो. परंतु व्याज जितके अधिक तितकी वेळेवर व्याज व मुदतपूर्तीनंतर मुद्दल मिळण्याची शाश्वती कमी. या विकासकाच्या २०१४ मधील अपरिवर्तनीय रोख्याची पत ‘ट्रिपल बी प्लस’ अशी होती. म्हणून १२.५ टक्के असा चढा व्याजदर द्यावा लागला. गुंतवणुकीच्या परिभाषेत ही पत गुंतवणूकयोग्य रोख्यांच्या पातळीच्या केवळ एक पायरी वर आहे. पत निर्धारण कंपनीने ही पत भविष्यात कमी केली तर हे रोखे गुंतवणूकयोग्य परिघात राहणार नाहीत. देशी अर्थसंस्था, बँका म्युच्युअल फंड या रोख्यांत गुंतवणूक करणार नाहीत म्हणून या विकासकाला चढय़ा व्याजदराचे आमिष दाखवावे लागले आणि या अमिषाला हे गुंतवणूकदार भुलले. ही गोष्ट घडली ऑगस्ट २०१४ मध्ये. याच दिवशी बिर्ला सनलाइफ डायनॅमिक बॉण्ड फंडात गुंतवणूक केली असती तर १४.६७ टक्के परतावा मिळाला असता. कित्येक सेवानिवृतांनी आपली भाविष्याची पुंजी यांच्या ‘गप्पांना’ भुलून यांच्या मुदत ठेवीत गुंतविली,’ राजा म्हणाला.

‘या परिस्थितीला हे ठेवीदारसुद्धा तितकेच जबाबदार आहेत. सेवानिवृत्ती किंवा आपले उत्पन्न थांबते तेव्हा आपण किती जोखीम घेऊ  शकतो याचा विचार करणे आवश्यक असते. कोणतेही गुंतवणूक साधन सुरक्षित व खात्रीचे हा समज काढून टाकणे आवश्यक आहे. ऑगस्ट २०१४ मध्ये दहा वर्षे मुदतीच्या केंद्र सरकारच्या रोख्यांचा दर ८.६ टक्के असताना हा विकासक १२.५ टक्के व्याज का देतो हे लक्षात घेणे आवश्यक आहे. व्याजाचे दर हे अर्थव्यवस्थेतील रोकडसुलभता, पत, मुदत यांवर ठरतात. एखादा १२ टक्के व्याज देतोय म्हणून मुदत ठेव करणे हे मुद्दल गमावण्यासारखे आहे. या विकासकाने पुढील तारखेचे धनादेश मुदतठेव धारकांना दिलेले असल्याने घाबरण्याचे काही कारण नाही. हा विकासक धनादेश न वठण्याचा गुन्हा करेल असे वाटत नाही. तेव्हा मुदतपूर्तीपर्यंत थांबावे व मुदतपूर्तीनंतर गोड बोलण्याला न भुलता पैसे काढून घेणे इष्ट ठरेल. आपल्याकडे मोठी ‘लॅण्ड बँक’ असल्याचा गमजा मारणाऱ्या या विकासकाला मुदत ठेवींच्या पूर्ततेनंतर वेळेवर पैसे देता येत नसल्याने त्याच्या या गमजा किती पोकळ होत्या हेसुद्धा ध्यानात येईल. स्थिर उत्पन्न गुंतवणुकीत मुद्दलाच्या सुरक्षिततेला अधिक महत्त्व देणे आवश्यक आहे अधिक व्याजदराला नाही, हे कायम लक्षात ठेवणे जरुरीचे आहे,’ राजा म्हणाला. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.

पुंगीवाला  gajrachipungi @gmail.com