राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारू लागला. ‘‘राजा, चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीचे निकाल अभ्यासल्यानंतर गुंतवणुकीसाठी कंपन्यांची नावे तू वाचकांना सांगणार आहेस. त्यातील तू निवडलेली दुसरी कंपनी वाचकांना सांगितली नाहीस, तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’’ वेताळाने राजाला सांगितले.
‘‘आजच्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने गुंतवणुकीसाठी निवडलेली कंपनी आहे ‘कॉन्कॉर’, अर्थात कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया! बाजारात सूचिबद्ध असलेली ही कंपनी जगातील तिसऱ्या क्रमांकाचे रेल्वे जाळे असलेल्या भारतीय रेल्वेची उपकंपनी आहे. कंपनीने ९ ऑगस्ट २०१६ रोजी आपले पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीचे परिचालन उत्पन्न सहा टक्के घटले आहे. आयात-निर्यातीसाठी असलेल्या कंटेनर हाताळणीच्या उत्पन्नात आठ टक्के तर देशांतर्गत कंटेनर हाताळणीच्या उत्पन्नात पाच टक्के घट झाली आहे. तसेच मागील तिमाहीत तिच्या कंटेनरच्या हाताळणीत २३ टक्के वाढ होऊनही उत्पन्न घटले. बंदरात होणाऱ्या खोळंब्यापोटी द्याव्या लागणाऱ्या शुल्कात (congestion surcharge) कपात केल्याने हे घडले,’’ राजा म्हणाला.
‘‘येत्या सहा महिन्यांत कंपनीची बांधकाम सुरू असलेल्या १५ पैकी सात लॉजिस्टिक्सपार्क (दळणवळण उद्याने) ३१ मार्च २०१७ पूर्वी कंटेनर हाताळणीला प्रारंभ करतील. त्यामुळे या दळणवळण उद्यानांमधून आठवडय़ाला प्रत्येकी एक अतिरिक्त मालगाडी सोडणे कंपनीला शक्य होईल. जेव्हा एखाद्या कंपनीचा नफा घटतो तेव्हा त्याची प्रतिक्रिया म्हणून शेअर बाजारात त्या कंपनीचा भावसुद्धा घटतो. आणि हीच त्या कंपनीचे शेअर खरेदी करण्याची चांगली संधी असते. मागील तिमाही ही गेल्या दहा वर्षांतील सर्वात कमी संख्येने कंटेनर हाताळणी असलेली तिमाही होती. जगातील एकतृतीयांश ‘जीडीपी’ ही मंदीशी सामना करीत असताना माल वाहतूक मंदावणे अपेक्षित आहे. त्याचा फटका या कंपनीला बसला आहे. वस्तू व सेवा कराच्या सर्वाधिक लाभार्थी या मालवाहतूक करणाऱ्या कंपन्या आहेत. कराचा बोजा कमी होणार असल्याने १ एप्रिल २०१७ पासून लागू होणाऱ्या वस्तू व सेवा कराचा सर्वात मोठा लाभ या कंपनीला झाला नाही तरच नवल आहे. हा शेअर सध्या २०१८च्या अपेक्षित उत्सर्जनाच्या (पी/ई) केवळ ८ पट असल्याने हा समभाग यापेक्षा स्वस्त मिळणार नाही,’’ राजा म्हणाला.
‘‘स्वातंत्र्याच्या वेळी रेल्वेचा मालवाहतुकीत ७२ टक्के वाटा होता. हा वाटा सध्या ५३ टक्के इतका घसरला आहे. मालवाहतूक ही फायद्याची व प्रवासी वाहतूक रेल्वेसाठी तोटय़ाची असते. रेल्वेने माल हाताळणीतील वाटा वाढविण्याचे लक्ष्य ठेवले असून रेल्वेमंत्री यासाठी प्रयत्नशील आहेत. या धोरणांचा एक भाग म्हणून आपल्या महाराष्ट्रात चिपळूण-कराड रेल्वे मार्गाच्या सामंजस्य करारावर सह्य़ा होणार असल्याची बातमी शनिवारच्या वर्तमानपत्रात वाचली असशील. भारतीय रेल्वेचे ६५,००० किमीचे रेल्वे मार्ग असून रोजच्या ७,००० मालगाडय़ा या रेल्वे मार्गावर मालाची ने-आण करीत असतात. काही रेल्वे मार्ग केवळ मालवाहतुकीसाठी आहेत. मुंबईतसुद्धा कुर्ला रेल्वे स्टेशनवरून एक मालवाहतूक मार्गिका तेल शुद्धीकरण कारखाने किंवा ‘आरसीएफ’च्या खत कारखान्यापर्यंत जाते. ही मार्गिका केवळ तेलाच्या वाघिणी व मालवाहतूक करणारे कंटेनर यांसाठी वापरली जाते. सध्या सुरू असलेली गेज परिवर्तन व रेल्वे मार्ग विद्युतीकरणाची कामे २०१९ पर्यंत पूर्ण झाल्यानंतर ३,३०० किमीचे रेल्वे मार्ग केवळ मालवाहतुकीसाठी उपलब्ध होतील. या यतिरिक्त मुंबई-दिल्ली, दिल्ली-बंगळुरू, चेन्नई-कोलकोता डेडिकेटेड फ्रे ट कॉरिडॉरची कामे सुरू आहेत. यासारख्या केवळ मालवाहतुकीसाठी असलेल्या रेल्वे मार्गावर मालवाहतूक सुरू होईल याचा लाभार्थी ही रेल्वेची उपकंपनी नक्कीच असेल. भारतातील मालवाहतुकीचे चित्र बदलत असताना या सर्वाच्या केंद्रस्थानी असलेल्या या कंपनीला एका अर्थाने ‘भारत भाग्य विधाता’ असेच म्हणायला हवे’’ राजा म्हणाला. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.
पुंगीवाला – gajrachipungi @gmail.com

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा