इन्फोसिस व भारती एअरटेल हे लार्ज कॅप सगळ्या गुंतवणूकदार समुदायाला ठाऊक असल्या तरी या कंपन्यासुद्धा कधी तरी मिड कॅप होत्याच ना. याच धर्तीवर कमिन्स इंडिया, भारत इलेक्ट्रॉनिक्ससारख्या आजच्या मिड कॅप उद्याच्या लार्ज कॅप आहेत.
राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारू लागला. ‘‘राजा, चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीचे निकाल अभ्यासल्यानंतर कुठल्या चार कंपन्या गुंतवणुकीसाठी सुचवशील ते मला सांग. ही चार नावे तू सांगितली नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’’ वेताळ म्हणाला.
‘‘माझ्या गुंतवणुकीच्या परिघात १०० पेक्षा अधिक कंपन्यांचा समावेश असून त्या कंपन्यांचा लेखाजोखा मी वेळोवेळी घेतच असतो. गुंतवणुकीत अतिशय सजग असणे गरजेचे असते. आपल्या गुंतवणुकीत मिड कॅप व लार्ज कॅप यांचे प्रमाण आर्थिक आवर्तनाच्या कोणत्या टप्प्यात किती असावे हे ज्याला कळते तोच बाजारातून नफा काढून घेऊ शकतो,’’ राजा उत्तरादाखल म्हणाला.
तो पुढे म्हणाला, ‘‘एक प्रसिद्ध टॅग लाइन ‘Hard to believe papa was once a kid’ तू वाचली असशील. आज ‘माझ्या बाबांना माहीत असलं’ तरी माझे बाबासुद्धा कधी तरी अनभिज्ञ होते. हे जितके खरे आहे तितकेच इन्फोसिस व भारती एअरटेल हे लार्ज कॅप सगळ्या गुंतवणूकदार समुदायाला ठाऊक असल्या तरी या कंपन्यासुद्धा कधी तरी मिड कॅप होत्याच ना. याच धर्तीवर कमिन्स इंडिया, भारत इलेक्ट्रॉनिक्ससारख्या आजच्या मिड कॅप उद्याच्या लार्ज कॅप आहेत. कृषी अर्थतज्ज्ञ व शेतकऱ्यांचे नेते शरद जोशी हे ‘इंडिया’ व ‘भारत’ अशा दोन गटांत भारताची विभागणी करीत असत. सततच्या दोन वर्षे पडलेल्या दुष्काळामुळे ‘इंडिया ग्रोथ स्टोरी’ला ‘भारता’ची साथ मिळाली नाही. या वर्षी शेतकऱ्यांना संतुष्ट करणारा पाऊस झाल्यामुळे विकासाचा केंद्रबिंदू शहरातून ग्रामीण भारताकडे सरकला आहे. साहजिकच ‘भारता’ची साथ इंडियाला लाभणार असल्याने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर अवलंबून असणाऱ्या कंपन्यांची नफाक्षमता वाढेल. अशा चार कंपन्यांपैकी माझ्या पाहण्यात असलेल्या कंपनीबद्दल सांगतो. जिचा भाव येत्या वर्षभरात १५-१८% दरम्यान वाढू शकेल,’’ राजा म्हणाला.
‘‘केएसबी पंप ही कंपनी पंप व पंपासाठी लागणारी पूरक उत्पादने तयार करते. ही कंपनी केएसबी एजी या जर्मन बहुराष्ट्रीय कंपनीची भारतातील उपकंपनी आहे. पुणे येथे पिंपरी व चिंचवड, मालेगांव, कोइम्बतूर व नगर जिल्ह्य़ात राहुरी येथे कंपनीचे कारखाने असून कंपनीची उत्पादने वीजनिर्मिती, पाणीपुरवठा व शुद्धीकरण, मल:निस्सारण, अणुऊर्जा, तेल व वायू, रसायने, बांधकाम आदी उद्योग क्षेत्रांत वापरली जातात. भारतातील कंपनीला मातृ कंपनी तंत्रज्ञान पुरवते. औद्योगिक परिभाषेत ‘स्टँडर्ड पंप’ म्हणून ओळखले जातात अशा पंपांच्या अंदाजे ८,५०० कोटींच्या बाजारपेठेत कंपनीचा हिस्सा ७% आहे. जे उत्पादन पाणीपुरवठा व सिंचनासाठी वापरले जाते, अशा उत्पादन गटात कंपनीचा ३५% वाटा असून उर्वरित ६५% विक्री ‘स्पेशालिटी पंप्स’ अर्थात औद्योगिक वापराच्या पंपांच्या विक्रीतून येते. औद्योगिक वापराचे पंप निवडायचे निकष हे प्रामुख्याने तंत्रज्ञानावर आधारित असून या उत्पादन गटात असंघटित क्षेत्रातील उत्पादकांकडून स्पर्धा नसल्याने नफ्याचे प्रमाणसुद्धा अधिक असते.’’
‘‘चालू वर्षांच्या पहिल्या तिमाहीची कामगिरी समाधानकारक न होण्यास प्रामुख्याने पंपांसाठी लागणाऱ्या पूरक उत्पादनांच्या विक्रीतील वाढ समाधानकारक नसणे हे कारण आहे. पंपांची विक्री वाढली परंतु पूरक उत्पादनांची विक्री वाढली नाही तर या विभागाला तोटा झाला. आर्थिक वर्ष २०१६ मध्ये कंपनीला देशांतर्गत विक्री वाढ अपेक्षित आहे, तर २०१७ मध्ये निर्यातीत वाढीतून चांगल्या नफ्याची कंपनीला अपेक्षा आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात जल-संधारणासाठी मोठी तरतूद असल्याचा फायदा कंपनीला होणार आहे. तेल व नैसर्गिक वायू उद्योगातील अनेक कंपन्यांनी आपले विस्तार कार्यक्रम तेल व वायूच्या घटलेल्या किमतीमुळे पुढे ढकलले अथवा रहित केले. या कंपन्या शीतपेटीत बंद केलेले प्रकल्प पुनरुज्जीवित करणार असल्यामुळे तिसऱ्या व चौथ्या तिमाहीचे निकाल पहिल्या तिमाहीपेक्षा चांगले असतील. सध्या ६३० दरम्यान असलेल्या या समभागाचा ‘पी/ई’ ३०च्या दरम्यान आहे. कंपनीची विक्री पुढील आर्थिक वर्षांत १३% दराने वाढली तरी या कंपनीच्या समभागातील गुंतवणूक १२-१८% परतावा देऊ शकेल,’’ राजा म्हणाला. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.
पुंगीवाला gajrachipungi@gmail.com
गाजराची पुंगी : राया! विहिरीला इंजिन बसवा..
या वर्षीच्या अर्थसंकल्पात जल-संधारणासाठी मोठी तरतूद असल्याचा फायदा कंपनीला होणार आहे.

First published on: 08-08-2016 at 01:04 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ksb pump company