arth04पोर्टफोलिओ बनवताना किंवा शेअर बाजारात गुंतवणूक करताना आपण जोखमीचे योग्य व्यवस्थापन करणे अतिशय गरजेचे आहे.
आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे, जास्त परतावा जास्त जोखीम, कमी परतावा कमी जोखीम. पण आपल्याला यामध्ये समन्वय साधता आला पाहिजे. म्हणूनच आपली जोखीम घेण्याची क्षमता समजून घेणे अतिशय गरजेचे आहे.
जोखीम (फ्र२‘) म्हणजे काय?
आपल्याला धोका कुठे व कशात आहे हे समजते, पण जोखीम घेण्याची इच्छा (Risk Appetite) आणि जोखीम घेण्याची ताकद (Risk Tolerance) या दोन भिन्न गोष्टी आहेत. आणि त्यातील नेमका फरक आपण समजून घेतला पाहिजे.
जोखीम घेण्याची इच्छा खालील घटकांवरून ठरते.
* वय : कमी वय असेल तर हाताशी जास्त वेळ असल्याने आपण जास्त जोखीम घेऊ शकतो.
* आपला गुंतवणुकीचा अनुभव : आपण आधी केलेल्या गुंतवणुकीवर जर चांगला परतावा मिळाला असेल तर आपण जास्त जोखीम घेऊ शकतो.
* माहिती : आपले गुंतवणूक पर्यायाविषयीचे ज्ञान यावर आपला निर्णय पक्का होतो आणि त्यासंबंधाने जोखमीची जाणीव असल्याने निर्णयाबाबत काहीशी निर्धास्तता येते.
जोखीम घेण्याची ताकद
* सांपत्तिक स्थिती – आपले उत्पन्न, खर्च, आपली मालमत्ता आणि देणी तसेच आपल्यावर असलेल्या आर्थिक जबाबदाऱ्या
* आपली बचत
* आपले विमा कवच
* आपण ठरविलेली लक्ष्ये कोणती आणि पैकी किती पूर्ण झालीत.
वरील दोन्ही बाजू पाहिल्यावर किती जोखीम घ्यायची हे कशावर ठरेल :
जोखीम क्षमता = जोखीम घेण्याची इच्छा (Risk Appetite) + जोखीम घेण्याची ताकद (Risk Tolerance).
arth03

यावरून असे लक्षात येते की, जरी मला आर्थिकदृष्टय़ा जोखीम घेणे शक्य असले तरी जर मी मनाने तयार असेन तरच मी जास्त जोखीम घेण्याचा विचार केला पाहिजे. एकदा मला कळले की माझी जोखीम क्षमता काय आहे, त्यानुसार आपण आपला पोर्टफोलिओ ठरविला पाहिजे.
जोखीम क्षमतेचे प्रकार :
जास्त जोखीम घेणारा (Aggressive ): जोखीम घेण्याची क्षमता जास्त असल्याने जास्त परताव्याची अपेक्षा.
मध्यम जोखीम घेणारा (Moderate): जोखीम घेण्याची क्षमता थोडी कमी म्हणून मध्यम परताव्याची अपेक्षा.
जोखीम न घेणारा (Conservative): जोखीम न घेणारा म्हणून कमी परतावा.
आता आपण जोखीम घेण्याच्या क्षमतेनुसार पोर्टफोलिओ कसा ठरवायचा ते पाहूया. (सोबतचे कोष्टक पाहा) कोष्टकात दिल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या जोखमीच्या क्षमतेनुसार तुमचा पोर्टफोलिओ ठरवू शकता.
त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करताना तुम्ही किती टक्के गुंतवणूक करायची हे तुमच्या जोखीम क्षमतेनुसार ठरवणे गरजेचे आहे. शेअर बाजारात गुंतवणूक आपण दोन प्रकारे करू शकतो.
१. प्रत्यक्ष समभागांमध्ये स्वत: गुंतवणूक करून किंवा
२. म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीद्वारे
म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि त्यात गुंतवणूक करताना काय काळजी घ्यायची हे आपण पुढील लेखात पाहू.
स्वाती शेवडे – cashevade.swati @gmail.com
(लेखिका सनदी लेखपाल असून त्या पोर्टफोलिओ मॅनेजर म्हणूनही कार्यरत होत्या.)

Story img Loader