हैदराबादमधील ग्रॅन्युएल्स इंडिया ही मुख्यत्वे अॅक्टिव्ह फार्मा इंग्रेडियंट्स (एपीआय), फार्मास्युटिकल फॉम्र्युलेशन इंटरमीडिएट्स (पीएफआय) आणि फिनिश्ड डोसेजेस (पीडी) इ. उत्पादनांत आहे. मुख्य उत्पादनांत प्रामुख्याने पॅरासिटामोल, आयबूब्रुफेन, मेटमॉरफीन, मेथोकर्बोमोल इ. समावेश होतो. कंपनीचे भारतात आठ कारखाने असून त्यांत २,१०० हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. जगातील सर्वात मोठी पीएफआय निर्मितीची सुविधा असणारी ग्रॅन्युएल्स इंडिया आज पंचाहत्तरहून अधिक देशांत आपल्या उत्पादनाद्वारे पोहोचली आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी सुमारे ६०% उत्पन्न हे अमेरिका आणि युरोपला केलेल्या निर्यातीतून होते. जगभरात तीनशेहून अधिक ग्राहक असलेल्या ग्रॅनुएल्स इंडियाने अमेरिका आणि युरोपमध्ये आपल्या उत्पादनाचा विस्तार करण्यासाठी स्थानिक कंपन्यांशी भागीदारी केली आहे. गेली पाच वर्षे नफ्यात सातत्याने सरासरी ४१ टक्के दराने वाढ साध्य करणाऱ्या या कंपनीने नुकतेच आपले आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. सप्टेंबर २०१६ अखेर संपणाऱ्या तिमाहीसाठी कंपनीने ३४१.२ कोटी रुपयांच्या उलाढालीवर ३३.५ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत तो २५ टक्के जास्त आहे. अमेरिकेतील बदलते वारे, कंपनीच्या उत्पादनांची गुणवत्ता आणि व्यवस्थापनाचा प्रदीर्घ अनुभव यामुळे येत्या दोन वर्षांत कंपनीकडून भरीव कामगिरीची अपेक्षा आहे. सध्या शेअर बाजारातील अनिश्चिततेच्या वातावरणात ग्रॅन्युएल्स इंडियासारख्या कंपनीचा शेअर कदाचित स्वस्तातही मिळू शकेल. मध्यमकालीन गुंतवणुकीसाठी हा मिडकॅप योग्य आणि सुरक्षित वाटतो.
stocksandwealth@gmail.com