• कोटक इमर्जिग इक्विटी स्कीम

दिवाळी धमाका ऑफर्सची इतकी आकर्षणे आहेत की, धनसंचय किंवा संपत्तीची निर्मिती याचा अर्थ सर्वानीच मुळातून समजावून घ्यावा अशी परिस्थिती आहे. ऑफर्सना भुलून अनावश्यक गोष्टीवर ३०,००० खर्च करण्यापेक्षा हे ३०,००० लिक्विड फंडात गुंतवून सिस्टेमॅटिक ट्रान्सफर प्लान (एसटीपी)द्वारे इक्विटी फंडात गुंतविल्याने संपत्तीची निर्मिती होते. आज विकत घेतलेला स्मार्ट फोन उद्या एक पंचमांश किंमतीचा होतो एक महिन्यानंतर तो फोन स्क्रॅप व्हॅल्यूलादेखील जात नाही. परंतु आज केलेल्या गुंतवणुकीत उद्या वाढ होत असते.

दिवाळीत धनत्रयोदशी व लक्ष्मीपूजन हे दिवस म्हणजे संपत्तीच्या निर्मितीचे संकल्प सोडण्याचा व त्या संकल्पाची आठवण ठेवण्याचे दिवस. धनत्रयोदशीला घरातील दागिने समभाग व रोख्यांची प्रमाणपत्रे पुजली जात असत. दिवाळीच्या शुभेच्छा एकमेकाला भेटून दिल्या जात. तथापि सण साजरे करण्याचा संकल्पना जशा बदलल्या तशी सणानिमित्ताने खरेदी होणाऱ्या वस्तूसुद्धा बदलल्या. ‘दिवाळी धमाका ऑफर्स’ची इतकी आकर्षणे आहेत की, धनसंचय किंवा संपत्तीची निर्मिती याचा अर्थ मुळातून समजावून घ्यावा अशी परिस्थिती आहे. ‘अ‍ॅमेझोन’ व ‘फ्लिपकार्ट’च्या ऑफर्सना भुलून अनावश्यक गोष्टीवर ३०,००० खर्च करण्यापेक्षा हे ३०,००० लिक्विड फंडात गुंतवून ‘सिस्टेमॅटिक ट्रान्स्फर प्लान (एसटीपी)’द्वारे इक्विटी फंडात गुंतविल्याने संपत्तीची निर्मिती होते. आज विकत घेतलेला स्मार्ट फोन उद्या एक पंचमांश किंमतीचा होतो एक महिन्यानंतर तो फोन ‘स्क्रॅप व्हॅल्यू’लादेखील जात नाही. परंतु आज केलेल्या गुंतवणुकीत उद्या वाढ होत असते. २०१३ च्या दिवाळीत कुणा द्रष्टय़ा पतीने आपल्या पत्नीला पाडव्याच्या दिवशी १,००,००० रुपये दिवाळी भेट कोटक इमर्जिग इक्विटी स्कीमच्या माध्यमातून दिले असते तर या दिवाळीत २७ ऑक्टोबरच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार ही रक्कम २,७४,७६८ इतकी झाली असती. या गुंतवणुकीवरील वार्षिक परताव्याचा दर ४०.२३टक्के पडला असता. नोव्हेंबर २०१३ ते ऑक्टोबर २०१३ दरम्यान या ३६ महिन्यांच्या कालाधीत केलेल्या दरमहा ५,००० रुपयांच्या ‘सिप’द्वारा गुंतविलेल्या १,८०,००० चे २७ ऑक्टोबर रोजीचे बाजार मूल्य २,७८,४५२ रुपये इतके होते व परताव्याचा वार्षिक दर ३०.९३टक्के इतका असता. २०१३ ते २०१६ या कालावधीत ‘सिप’द्वारा अव्वल परतावा देणाऱ्या पहिल्या पाच मिड कॅप फंडात कोटक इमर्जिग इक्विटी स्कीमचा समावेश आहे.

mid-cap1

सप्टेंबरअखेरीस कोटक इमर्जिग इक्विटी स्कीम या फंडाची मालमत्ता १,१६३ कोटी रुपये होती. स्मॉल व मिड कॅप फंडासाठी आदर्श मालमत्ता असावी असा साजेसा हा आकडा आहे. अनेकदा मोठय़ा मालमत्तेचे व्यवस्थापन करणे जिकिरीचे होते. मिड कॅप समभागांत रोकड सुलभतेचा अभाव असल्याने मालमत्तेचा आकार वाढला की रोकड सुलभता राखण्यासाठी लार्ज कॅप समभागांचा समावेश करणे निधी व्यवस्थापकास गरजेचे वाटते. लार्ज कॅप समभागांचा समावेश अधिक असेल तर परताव्याचा दर कमी होतो. १,२०० ते १,५०० कोटी मालमत्ता असणारा मिड कॅप फंड गुंतवणुकीसाठी आदर्श समजला जातो. या कारणाने फंडाचा सुरुवातीपासूनचा वार्षिक परतावा १३.१३ टक्के राखणे शक्य झाले आहे. मागील पाच वर्षांत सातत्याने फंडाने संदर्भ निर्देशांकापेक्षा अधिक परताव्याचा दर राखलेला आहे. फंडाचा परताव्याचा दर व निर्देशांकाचा परताव्याचा दर यांची तुलना कोष्टक क्रमांक १ मध्ये दिली आहे.

वेगवेगळ्या कालावधीतील चलत सरासरी त्या त्या काळातील फंडाची परताव्याची कामगिरी दर्शविते. आलेख क्रमांक – १मध्ये फंडाची पाच वर्षांची चलत सरासरी व निर्देशांकाची याच काळातील सरासरी दर्शविलेली आहे. ९८ टक्के वेळा फंडाचा परतावा निर्देशांकाच्या परताव्याच्या दराहून अव्वल आहे. केवळ परतावा मोजला असता नजीकच्या काळातील चांगल्या कामगिरीचा प्रभाव या मापनावर पडत असतो. तीन वर्षे व एक वर्ष कालावधीच्या चलत सरासरीची तुलना निर्देशांकाच्या त्याच कालावधीतील चलत सरासरीशी केली असता अनुक्रमे ८१ टक्केव ७७ टक्के वेळा फंडाने निर्देशांकाहून अधिक परतावा दिला आहे.

हा फंड मिड कॅप समभागात गुंतवणूक करणारा फंड आहे. सप्टेंबरच्या गुंतवणूक विवरण पत्रकाप्रमाणे फंडाने १४ उद्योग क्षेत्रातील मिड कॅप कंपन्यांतून गुंतवणूक केली आहे. बँका, अभियांत्रिकी उद्योग, भांडवली वस्तू, माध्यमे, दूरसंचार आदी उद्योगक्षेत्रातील वृद्धिसक्षम कंपन्यांना गुंतवणुकीत स्थान देण्यात आले आहे. मागील महिन्यात फंडाच्या गुंतवणुकीत कॅस्ट्रॉल, अपोलो हॉस्पिटल व आयसीआयसीआय प्रु. लाइफ इन्शुरन्स या तीन कंपन्यांचा समावेश झाला. तर फंडाने ब्ल्यू डार्ट एक्स्प्रेस, अ‍ॅक्सिस बँक, मॅक्स इंडिया व केपीआयटी टेक्नॉलॉजी या कंपन्यांचे समभाग विकून टाकले. फंडाच्या गुंतवणूक असलेल्या समभागांचा सरासरी ‘पी/ई’ ३१.२ असून गुंतवणुकीच्या बाजारभावाचे पुस्तकी किमतीशी प्रमाण ५.६६ पट आहे.

mid-cap2

कोटक इमर्जिग इक्विटी स्कीमची सुरुवात मार्च २००७ मध्ये झाल्यापासून तिने ‘सिप’ गुंतवणुकीवर १९.२० टक्के परतावा दिला आहे. मिड कॅप फंड जसे लार्ज कॅपपेक्षा अधिक परतावा देतात तसे त्यांच्या एनएव्हीत लार्ज कॅपपेक्षा अधिक चढ-उतार होतात. अशा चढ-उतारांशी सामना करत जे गुंतवणूकदार सात ते १० वर्षांसाठी ‘सिप’ गुंतवणूक करू इच्छितात अशा गुंतवणूकदारांना १२-२५ टक्के परतावा आगामी पाच-सात वर्षांच्या ‘सिप’वर मिळविणे कठीण नाही. मात्र या काळातील चढ-उतारांना सामोरे जाण्याची तयारी गुंतवणूकदारांनी ठेवावयास हवी.

mid-cap3

(अस्वीकृती: या स्तंभात वापरलेली माहिती आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)

shreeyachebaba@gmail.com