मे आणि जून हे महिने गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे असतात कारण याच वेळी सर्व कंपन्या आपले संपूर्ण वर्षांचे आर्थिक निष्कर्ष जाहीर करीत असतात. कंपन्यांच्या वार्षिक अहवालांची तयारी याच काळात सुरू असते. हे आर्थिक निष्कर्ष व्यवस्थित अभ्यासायचे असतील तर त्या कंपनीच्या वेबस्थळावर जाऊन तो निकाल बारकाईने पाहावा लागतो. कारण आता बहुतांशी कंपन्या नवीन कंपनी कायद्याच्या तरतुदींनुसार आपला आर्थिक निष्कर्ष संक्षिप्त स्वरूपात सादर करतात.
आज विचारात घेतलेली मोदीसन मेटल्स ही स्विचगीअरसाठी इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्टचे उत्पादन करणारी ५० वर्षे जुनी आघाडीची कंपनी आहे. कंपनीचे आर्थिक निष्कर्ष नुकतेच जाहीर झाले आहेत आणि ते अपेक्षेनुसार उत्तम आहेत. कंपनीने गेल्या आर्थिक वर्षांकरिता १६७.३३ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १०.८८ कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत तो १३८ टक्क्य़ांनी जास्त आहे. वापी आणि सिल्वासा येथे उत्पादन प्रकल्प असलेल्या मोदीसन मेटल्सने सुरुवातीला म्हणजे १९८३ ते १९९६ पर्यंत डोडूको या जर्मन कंपनीच्या तांत्रिक सहकार्याने उत्पादन केले आणि आयातीला पर्याय दिला. आजही आपल्या गुणवत्तेच्या जोरावर कंपनीकडे भारतातील बाजारपेठेत जवळपास ८०% पुरवठय़ाचा हिस्सा असून जवळपास सर्व बहुराष्ट्रीय आणि मोठय़ा भारतीय कंपन्या मोदीसनच्या ग्राहक आहेत. एल अँड टी, अरेवा तसेच अरेवा चीन हे कंपनीचे काही महत्त्वाचे ग्राहक आहेत. आगामी काळातील उत्पादनांची मागणी पाहता येत्या दोन वर्षांत कंपनी आपली नवीन उत्पादने आणि विस्तारीकरणाच्या योजना यशस्वीपणे राबवून उलाढाल ५०० कोटी रुपयांवर नेईल अशी आशा आहे. आपल्या गुणवत्तेच्या जोरावर कंपनीने परदेशातही आपला ठसा उमटवला आहे. एझकॉम या रशियन कंपनीने तिच्या उत्पादनांचे भारतात आणि तुर्कस्तान येथे विपणन आणि विक्री करण्याकरिता मोदीसन मेटल्सला आपला प्रतिनिधी म्हणून नेमले आहे.
सध्या ५० रुपयांच्या आसपास उपलब्ध असलेला आणि केवळ ३.२५ कोटी रुपये भागभांडवल असलेला हा शेअर मध्यम ते दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य वाटतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) लेखात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

अजय वाळिंबे  stocksandwealth @gmail.com

मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Modison metal ltd portfolio
Show comments