डीएसपी ब्लॅक रॉक टॅक्स सेव्हर फंड
मार्चचा पहिला आठवडा म्हणजे कर नियोजनासाठी गुंतवणूक करण्याची शेवटची संधी असते. म्युच्युअल फंडाच्या ईएलएसएस योजना करबचतीसोबत भांडवली वृद्धी देत असल्याने कर नियोजनासाठी उपलब्ध पर्यायांमध्ये सर्वात कार्यक्षम समजल्या जातात. परंतु आर्थिक अज्ञानामुळे सामान्यजनांचा कल ईएलएसएस योजनांऐवजी करवजावटीच्या अन्य गुंतवणूक साधनांकडे अधिक असतो..
मागील सोमवारी देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसीने आपले चालू वित्त वर्षांच्या तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. तिसऱ्या तिमाहीत विमा हप्त्यापोटी उत्पन्नांत मागील वर्षांच्या तुलनेत १२.४३ टक्के वाढ झाल्याचे प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. एलआयसीचे अध्यक्ष वार्षिक निकाल सोडल्यास अपवादाने पत्रकार परिषद घेतात. एलआयसीच्या समभागाची नोंदणी शेअर बाजारात झाली नसल्याने प्रत्येक तिमाहीचे निकाल जाहीर करण्याचे बंधन एलआयसीवर नाही. वर्षांची चौथी तिमाही करदात्यांसाठी कर नियोजनाच्या दृष्टीने महत्त्वाची असल्याने एलआयसीच्या अध्यक्षांना माध्यमांसमोर येण्याची गरज भासली असावी. याला तसे कारणही आहे. अजूनही सामान्यजन एलआयसीकडे कर वाचविण्याचे साधन या दृष्टीनेच पाहतात. सध्या ८.१ वार्षिक व्याज देणारी पीपीएफमधील गुंतवणूक व विमाछत्राबरोबरीने वार्षिक ४.५ ते ५.५ टक्के परतावा देणारी विमा पॉलिसी पाहता म्युच्युअल फंडांच्या इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ईएलएसएस) केव्हाही सरसच ठरतात. ईएलएसएस योजनांचा मागील पाच वर्षांतील वार्षिक परताव्याचा दर सर्वात अधिक १५.५९ टक्के (डीएसपी ब्लॅक रॉक टॅक्स सेव्हर फंड) आणि सर्वात कमी ७.३२ टक्के (एलआयसी एमएफ टॅक्स प्लान) असा राहिलेला आहे. म्युच्युअल फंडाच्या ईएलएसएस योजना करबचतीसोबत भांडवली वृद्धी देत असल्याने करनियोजनासाठी उपलब्ध पर्यायांमध्ये सर्वात कार्यक्षम समजल्या जातात. आर्थिक अज्ञानामुळे सामान्यजनांची प्राथमिकता ईएलएसएस योजनांऐवजी अन्य करवजावट प्राप्त गुंतवणूक साधनांना असते.
वर उल्लेख आलेला डीएसपी ब्लॅक रॉक टॅक्स सेव्हर फंड मागील पाच वर्षांत नियोजनबद्ध गुंतवणुकीवर ईएलएसएस फंड गटात सर्वाधिक परतावा देणारा फंड आहे. १ मार्च २०१२ रोजी या फंडात गुंतविलेल्या १ लाख गुंतवणुकीचे ३ मार्च २०१७ च्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार २.४८ लाख झाले असून परताव्याचा दर १९.९६ टक्के आहे. या फंडातील गुंतवणूक ‘बॉटम अप’ पद्धतीने केली जाते. गुंतवणुकीसाठी एखादे उद्योग क्षेत्र (सेक्टर) निवडून त्यामधील समभाग निवडण्यापेक्षा या फंडात प्रत्येक समभाग गुंतवणुकीसाठी वेचला जातो. यासाठी ज्या कंपनीचे समभाग गुंतवणुकीसाठी योग्य वाटतात त्या कंपनीच्या व्यवसाय करण्याच्या पद्धतीचा अभ्यास केला जातो. या अभ्यासाअंती कंपनीच्या विक्री व नफ्याचे अंदाज व्यक्त करून भविष्यातील मूल्यांकनाचा अंदाज बांधून समभागाचा समावेश गुंतवणुकीत करायचा अथवा नाही याचा निर्णय घेतला जातो.
‘एनएसई ५००’ हा या फंडाचा संदर्भ निर्देशांक आहे. फंडात एकरकमी गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारास, ३ मार्चच्या रेग्युलर ग्रोथ एनएव्हीनुसार फंडाने एका वर्षांत ३३ टक्के, ३ वर्षांत २५.२ टक्के, ५ वर्षांत १९.७ टक्के तर फंडाच्या सुरुवातीपासून १४.१९ टक्के वार्षिक परतावा दिला आहे. नियोजनबद्ध गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारास फंडाने एका वर्षांत २० टक्के, ३ वर्षे नियोजनबद्ध गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारास १५.१९ टक्के, ५ वर्षे नियोजनबद्ध गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारास २०.२३ टक्के तर १० वर्षे नियोजनबद्ध गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारास १६.२३ टक्के वार्षिक परतावा दिलेला आहे. रोहित सिंघानिया हे या फंडाचे निधी व्यवस्थापक आहेत. फंडाच्या आघाडीच्या गुंतवणुकीत अनुक्रमे स्टेट बँक, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी बँक, टाटा मोटर्स व लुपिनचा समावेश आहे. फंडाने अनुक्रमे बँकिंग व वित्तीय सेवा, वाहन व वाहन उद्योगांसाठी पूरक उत्पादने, तेल व वायू आणि आरोग्य निगा या उद्योग क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या कंपन्यांसाठी केला आहे. जानेवारी महिन्यात फंडाने आपल्या गुंतवणुकीतून एचडीएफसी, बजाज फायनान्स, केर्न इंडिया व गुजरात गॅस यांना वगळले असून ब्रिटानिया इंडस्ट्रीज, चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट्स, गेल आणि रूरल इलेक्ट्रिफिकेशन कॉपरेरेशन यांचा नव्याने समावेश केला आहे. फंडाची गुंतवणूक शैली ही ग्रोथ व व्हॅल्यू यांचा समतोल साधणारी आहे. जानेवारी अखेरच्या फंडाच्या गुंतवणुकीच्या तपशिलानुसार, फंडाच्या गुंतवणुकीत एकूण ६२ कंपन्यांच्या समभागांचा समावेश असून एकूण गुंतवणुकीत पहिल्या ५ गुंतवणुकांचे प्रमाण १८.५२ टक्के, पहिल्या १० गुंतवणुकांचे प्रमाण ३१.९२ टक्के तर पहिल्या १५ गुंतवणुकांचे प्रमाण ४४.०८ टक्के आहे. फंड व्यवस्थापकांनी फंडाचा परतावा हा समभागकेंद्रित जोखीम न घेता मिळविला आहे हे विशेष नमूद करावयास हवे.
काही करदाते आयकर कायद्याच्या कलम ८०सी अन्वये मिळणाऱ्या करवजावटीकडे कर बचतीसाठी करावयाच्या गुंतवणुकीचे साधन म्हणून पाहतात. परताव्याचा दर हा त्यांच्यालेखी गौण असतो. काही चुकीच्या निर्णयामुळे करदात्यांना कर बचतीसाठी करावयाच्या गुंतवणुकीपैकी सर्व गुंतवणूक अल्प परताव्याच्या पीपीएफ आणि आयुर्विम्याचे हप्ते भरण्यात खर्च होतात. आयुर्विमा मंडळाच्या तिसऱ्या तिमाहीतील विम्याच्या हप्त्यात झालेली १२.७५ टक्के वाढ अर्थसाक्षरतेचा अभाव अधोरेखित करते. करदात्यांची मानसिकता ही गुंतवणूक करून कर वाचवायची असून कर नियोजनासोबत संपत्तीची निर्मिती करण्याची नाही. करदाते १५-२० वर्षे विमा हप्ते भारतात परंतु दीर्घ काळ चालणारी नियोजनबद्ध गुंतवणूक करून, कर बचतीसोबत संपत्ती निर्मितीला प्राधान्य देत नाहीत. करदात्यांचे ईएलएसएस फंडाबाबत अनेक गैरसमज दिसून येतात. जसे की ही गुंतवणूक तीन वर्षांसाठी करायची असते. साहजिकच गुंतवणुकीच्या वेळी सर्वाधिक परतावा असणाऱ्या ईएलएसएस फंडात गुंतवणूक केली जाते. हे टाळण्यासाठी एक चांगला ईएलएसएस फंड निवडून या फंडात दीर्घकाळ नियोजनबद्ध गुंतवणूक करणे आवश्यक आहे.
मार्चचा पहिला आठवडा म्हणजे या वर्षीच्या कर नियोजनासाठी गुंतवणूक करण्याची शेवटची संधी असते. कर वजावट प्राप्त गुंतवणूक करून त्याचा पुरावा देण्यात धन्यता मानणाऱ्या वर्गाच्या शेअर बाजार म्हणजे सट्टा या मानसिकतेमुळे ईएलएसएस योजनांकडेही हा वर्ग अनेक कर वजावट साधनांपैकी एक या दृष्टीने पाहतो. करदात्यांनी आपल्या नियोजनात ईएलएसएस योजनांचा समावेश करनियोजनासोबत भरघोस परतावा देणाऱ्या या फंडाकडे ‘का रे दुरावा’ या दृष्टीने न पाहता ‘तुझ्यात जीव रंगला’ असे म्हणावे या साठी आजची शिफारस.
(अस्वीकृती: या स्तंभात वापरलेली माहिती व आकडेवारी ही उपलब्ध माहिती स्रोतांपासून घेतली आहे. या लेखाचा उद्देश या योजनेची वाचकांना ओळख व्हावी इतपतच मर्यादित आहे. वाचकांनी गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे अभिप्रेत आहे.)
वसंत माधव कुलकर्णी shreeyachebaba@gmail.com