अग्रिम कर : कधी आणि किती भरावा?
* प्रश्न: मी पगारदार नोकर आहे. मला पगारातून मिळणाऱ्या उत्पन्नावर उद्गम कर कापला जातो. माझ्या बँकेमध्ये मुदत ठेवी आहेत त्यावर मला ८ लाख रुपयांपर्यंत व्याज मिळते. माझे एकूण उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे मला या व्याजावर ३०% कर भरावा लागतो. व्याजावर बँक १०% उद्गम कर कापून घेते आणि बाकीचा कर मला भरावा लागतो. मागील वर्षांचा कर मी विवरणपत्र दाखल करताना भरला, त्यामुळे मला खूप व्याज भरावे लागले. हे व्याज वाचविण्यासाठी मी काय करावे? हा कर कधी भरावा?
– एक वाचक, ई-मेलद्वारे
उत्तर : आपल्याला अग्रिम कर हा आर्थिक वर्ष २०१६-१७ पासून चार हप्त्यात भरावयाचा आहे. ज्या करदात्याचा उद्गम कर (ळऊर) वजा जाता देय कर १०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे त्यांना हा अग्रिम कर भरावा लागतो. तो किती आणि केव्हा भरावा लागतो ते खालील तक्त्यात दर्शविले आहे :
कधी भरावा किती भरावा
१५ जूनपूर्वी १५.००%
१५ सप्टेंबरपूर्वी ४५.००%
१५ डिसेंबरपूर्वी ७५.००%
१५ मार्चपूर्वी १००.००%
वरील शेकडा प्रमाण हे अंदाजित देय कराचे आहे. उदा. अंदाजित देय कर (उद्गम कर वजा जाता) २०,००० रुपये इतके असेल, तर २०,००० रुपयांच्या १५% म्हणजेच ३,००० रुपये १५ जूनपूर्वी भरावा लागेल, दुसरा हप्ता एकूण ४५% (९,००० रुपये) इतका कर भरला गेला पाहिजे, म्हणजेच दुसरा हप्ता १५ सप्टेंबरपूर्वी ६,००० रुपयांचा भरावा लागेल. तिसरा हप्ता ७५% (१५,००० रुपये) भरला गेला असला पाहिजे, म्हणजेच तिसरा हप्ता १५ डिसेंबरपूर्वी ६,००० रुपयांचा भरावा लागेल. शेवटचा हप्ता १००% (२०,००० रुपये) भरला गेला असला पाहिजे, म्हणजेच तिसरा हप्ता १५ मार्चपूर्वी ५,००० रुपयांचा भरावा लागेल. असा एकूण देय कर ३१ मार्चपूर्वी अग्रिम कर म्हणून भरावा लागतो. हा वेळेवर भरल्यास व्याज वाचू शकते.
हा अग्रिम कर मार्च संपल्यानंतरसुद्धा न भरल्यास ‘कलम २३४ ब’नुसार एप्रिलपासून व्याज भरावे लागते.
मागील वर्षांपर्यंत अग्रिम कर हा वैयक्तिक करदात्यांसाठी तीन हप्त्यात भरावा लागत होता, तो आता त्यांना चार हप्त्यात भरावा लागणार आहे. वैयक्तिक करदात्यांनो, १५ जून जवळ येत आहे. आपला अग्रिम कराचा पहिला हप्ता १५ जूनपूर्वी भरलात तर व्याज वाचेल.
* प्रश्न: पोस्टाची आवर्त ठेव आणि मासिक उत्पन्न योजना (एमआयएस) यांचे व्याज करपात्र आहे का? दरवर्षी ते विवरणपत्रात कसे दाखवायचे? मुदत संपल्यानंतर व्याज विवरणपत्रात दाखविले तर चालेल का?
– नितीन वाणी, लातूर
उत्तर : पोस्टाची आवर्त ठेव आणि मासिक उत्पन्न योजना (एमआयएस) यांचे व्याज करपात्र आहे. हे विवरणपत्रात इतर उत्पन्नात दाखवावे. हे व्याज दरवर्षी विवरणपत्रात दाखविणे हिताचे आहे. जर व्याजाचे उत्पन्न थेट मुदत संपल्यानंतर दाखविल्यास त्या वर्षीचे उपन्न जास्त होऊन आपले उत्पन्न कराच्या पुढच्या टप्प्यात (स्लॅब) गेल्यास त्यावर जास्त कर भरावा लागू शकतो. म्हणून उत्पन्न दर वर्षी विभागून दाखविले तर उद्गम कराचा दावा करणे सोपे जाईल आणि कर दर वर्षी विभागला जाईल आणि कराचे ओझे एकाच वर्षी येणार नाही.
* प्रश्न: माझे वय ६४ वर्षे आहे. माझे मुंबई येथे एक आणि पुणे येथे दुसरे घर आहे. माझ्या नावाने असलेले मुंबईतील घर मी भाडय़ाने दिले आहे आणि पुण्याचे घर राहते म्हणून दाखविले आहे. मला वारसा हक्काने मुंबई येथे अजून एक घर नुकतेच माझ्या नावावर झाले आहे. माझा प्रश्न असा आहे की मला ही तिन्ही घरे विवरणपत्रात दाखवावी लागतील का? वारसा हक्काने मिळालेल्या घरावरसुद्धा मला घरभाडे उत्पन्न दाखवावे लागेल का?
– शौनक घरत, मुंबई
उत्तर : आपल्याकडे तीन घरे असल्यामुळे दोन घरांवर घरभाडे उत्पन्न दाखवावे लागेल. कोणतेही एक घर आपल्याला राहते घर म्हणून दाखवता येईल. वारसा हक्काने मिळालेल्या घराचे किंवा पुण्याच्या घराचे घरभाडे उत्पन्न दाखवून त्यावर कर भरावा लागेल. वडिलोपार्जित घर हे तुम्ही अविभक्त हिंदू कुटुंबामध्ये (एचयूएफ) दाखवू शकता, यासाठी कर सल्लागाराचा सल्ला घ्यावा.
* प्रश्न: माझी आई ८४ वर्षांची निवृत्त प्राध्यापिका, पेन्शनर आहे. तिच्या पणजोबांच्या मालकीची १०० वर्षांपूर्वीची पेण येथील काही जमीन व पडके घर नुकतेच विकले गेले. त्या व्यवहारापोटी वारस म्हणून तिच्या वाटय़ाचे २० लाख रुपये ड्राफ्टद्वारे तिला प्राप्त झाले. या रकमेवर किती प्राप्तिकर भरावा लागेल? कर कमी होण्यासाठी काही मार्ग आहे का? तसेच याच रकमेत एखादे घर विकत घेऊन ते माझ्या नावे भेट दिल्यास त्यावर तिला किंवा मला काही कर भरावा लागेल का?
– एक वाचक, ई-मेलद्वारे
उत्तर : वडिलोपार्जित घर आणि जमीन १०० वर्षांपूर्वी पणजोबांनी विकत घेतली असेल तर त्याचे १ एप्रिल १९८१चे वाजवी बाजार मूल्य (फेअर मार्केट व्हॅल्यू) विचारात घेऊन त्यावर महागाई निर्देशांकानुसार भांडवली नफा काढावा लागेल. हा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा असेल. आपल्या आईच्या हिश्शाच्या भांडवली नफ्यावर २०% कर भरावा लागेल. कर कमी करण्यासाठी भांडवली नफ्याएवढी रक्कम आपल्याला नवीन घरात गुंतवून (कलम ५४ प्रमाणे) किंवा रोख्यात गुंतवून कर वाचविता येईल. हे नवीन घर विकत घेतल्या तारखेपासून तीन वर्षांत हस्तांतरित केले तर कलम ५४ प्रमाणे घेतलेली सवलत उत्पन्नामध्ये गणली जाईल. नवीन घर विकत घेतल्यापासून तीन वर्षांनंतर भेट म्हणून दिले तर या सवलतीचा फायदा घेता येईल. नातेवाईकांना दिलेल्या भेटी करपात्र नाहीत, त्यामुळे आईला किंवा आपल्याला कर भरावा लागणार नाही.
* प्रश्न: मी पुण्यामध्ये एक घर विकत घेतो आहे. या घराची किंमत ७२ लाख रुपये आहे. मला यासाठी उद्गम कर (टीडीएस) लागेल काय? कृपया यासंबंधीच्या तरतुदींची माहिती द्या.
– एक वाचक, पुणे
उत्तर : ‘कलम १९४ आयए’ नुसार ५० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या स्थावर मालमत्तेच्या (शेतजमीन सोडून) खरेदीवर १% उद्गम कराची कपात/ वसुली बंधनकारक आहे. हा कर खरेदीदाराला कापावा लागतो. विक्री करणाऱ्याला रक्कम देताना १% उद्गम कर कापून द्यावी. रक्कम जर हप्त्यामध्ये विभागून दिली तर प्रत्येक हप्त्याची रक्कम देताना उद्गम कर कापावा लागतो आणि तो महिना संपल्यानंतर ७ दिवसांच्या आत फॉर्म २६ क्यूबी भरून बँकेत भरावा लागतो. उदा. २ जून २०१६ रोजी खरेदीदाराने २०,००,००० रुपये रक्कम आगाऊ दिली तर त्याने १% इतकी म्हणजे २०,००० रुपये कर कापून हा कर ७ जुलै २०१६ पूर्वी भरणे गरजेचे आहे. हा कर भरण्यास उशीर झाला तर त्यावर व्याज भरावे लागते. हे पैसे भरल्यानंतर १५ दिवसांच्या आत खरेदीदाराने फॉर्म १६बी हा विक्रेत्याला द्यावा लागतो. हा देण्यास विलंब झाला तर त्यावर दंड भरावा लागतो. हा कर कापताना घर विक्री करणाऱ्याचा पॅन (पर्मनन्ट अकाऊंट नंबर) असणे गरजेचे असते. तो नसल्यास त्यावर २०% इतका उद्गम कर कापावा लागेल.
* प्रश्न: मी डिसेंबर २००१ मध्ये माझ्या मित्राच्या कंपनीचे ५,००० शेअर्स प्रत्येकी १०० रुपयांना विकत घेतले होते. ते शेअर्स मी मार्च २०१६ मध्ये प्रत्येकी ३५० रुपयांना माझ्या मित्रालाच विकले. हे शेअर्स शेअर बाजारात नोंदणी केलेले नाहीत. मला या व्यवहारावर कर भरावा लागेल का? भरावा लागत असेल तर तो किती भरावा लागेल? तो मला वाचविता येईल का?
– प्रकाश लागू, पुणे
उत्तर : शेअर्स शेअर बाजारात नोंदणी (सूचिबद्ध) नसल्यामुळे आणि त्यावर शेअर उलाढाल कर (एसटीटी) भरला नसल्यामुळे त्यावर होणारा भांडवली नफा हा करपात्र असेल. आपल्याला झालेला दीर्घ मुदतीचा भांडवली नफा हा खालीलप्रमाणे असेल :
शेअरची विक्री किंमत
(५,००० शेअर्स ७ ३५० रुपये)
= १७,५०,००० रुपये
शेअर्सची खरेदी मूल्य
(५,००० शेअर्स ७ १०० रुपये)
= ५,००,००० रुपये
महागाई निर्देशांकानुसार (इंडेक्सेशन) खरेदी मूल्य:
२००१-०२ सालचा महागाई निर्देशांक : ४२६
२०१५-१६ सालचा महागाई निर्देशांक : १०८१
इंडेक्सेशननुसार खरेदी मूल्य: ५,००,००० ७ १०८१ रु ४२६
= १२,६८,७९९ रुपये
दीर्घ मुदतीचा भांडवली नफा
= ४,८१,२२१ रुपये
या भांडवली नफ्यावर २०.६% इतका (शैक्षणिक कर धरून) म्हणजेच ९९,१३१ रुपये कर भरावा लागेल. हा कर वाचवायचा असेल तर ‘कलम ५४ एफ’नुसार शेअरच्या विक्री किमती एवढी घरामध्ये गुंतवणूक केल्यास (यासाठी काही अटींची पूर्तता करावी लागते) किंवा भांडवली नफ्याच्या रकमेएवढी रक्कम रोख्यात गुंतवली तर त्यावर कर भरावा लागणार नाही.
* लेखक मुंबईस्थित सनदी लेखाकार असून, वाचक त्यांना pravin3966@rediffmail.com या ई-मेलवर आपले प्रश्न पाठवू शकतील.
प्रवीण देशपांडे
कर समाधान : करदात्यांनो, १५ जूनपूर्वी अग्रिम कर भरा!
अग्रिम कर : कधी आणि किती भरावा? * प्रश्न: मी पगारदार नोकर आहे. मला पगारातून मिळणाऱ्या उत्पन्नावर उद्गम कर कापला जातो. माझ्या बँकेमध्ये मुदत ठेवी आहेत त्यावर मला ८ लाख रुपयांपर्यंत व्याज मिळते. माझे एकूण उत्पन्न १० लाख रुपयांपेक्षा जास्त असल्यामुळे मला या व्याजावर ३०% कर भरावा लागतो. व्याजावर बँक १०% उद्गम कर कापून घेते […]
Written by प्रवीण देशपांडे
First published on: 06-06-2016 at 01:00 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pay advance tax before june