पॉल र्मर्चंट या कंपनीची नक्की सुरुवात कधी झाली ते सांगता येणार नाही. मात्र १९९० मध्ये सतपॉल बन्सल यांनी दिल्लीमधील एक बाजारात सूचिबद्ध कंपनी ताब्यात घेऊन १९९१ मध्ये तिचे नामकरण पॉल र्मचट लिमिटेड असे केले. केवळ मुंबई शेअर बाजारात नोंदणी असलेली आणि तितकीशी परिचित नसलेली ही कंपनी विविध वित्तीय सेवा पुरवतेच त्या खेरीज सहलींचे नियोजनही करते. वित्तीय सेवेत प्रामुख्याने विदेशी चलन विनिमय (फॉरेक्स ट्रान्सफर), आंतरराष्ट्रीय चलन हस्तांतरण, बरोबरीनेच सॅटेलाइट टेलिव्हिजन, टुर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स, ट्रॅव्हलर्स चेक्स, टिकेटिंग इ. विविध सेवा ही कंपनी पुरवते. हॉलिडे पॅकेज आणि टिकेटिंगसाठी कंपनीचे ट्रॅव्हल यात्रा नावाचे पोर्टल आहे. परंतु कंपनीची मुख्य ओळख आहे ती वेस्टर्न युनियन फायनान्शियल सव्र्हिसेस इन्क या अमेरिकन कंपनीच्या एजन्सीमुळे. पॉल र्मचट ही वेस्टर्न युनियनची भारतातील एकमेव वितरक आहे. भारतभरात स्वत:च्या आणि फ्रँचाइझी यांच्या २१,००० हून अधिक शाखांचे जाळे विणणाऱ्या या कंपनीच्या अनेक मोठय़ा कंपन्या, बँका तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम ग्राहक आहेत. दरमहा सुमारे सहा लाख ग्राहकांना सेवा पुरविणारी पॉल र्मचट ही वेस्टर्न युनियनची भारतातील एकमेव आणि आशिया पॅसिफिकमधील सर्वात मोठी अशी प्रमुख एजंट आहे.
गेली पंचवीस वर्षे विदेशी विनिमयचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या या कंपनीने काळाची पावले ओळखून टुरिझम क्षेत्रातही प्रवेश केला आहे. गेल्या तिमाहीसाठी कंपनीच्या उलाढालीत २० टक्के वाढ होऊन ती ७५४ कोटी रुपयांवर गेली आहे तर निव्वळ नफा गेल्या वर्षीच्या तिमाहीच्या तुलनेत पाच टक्क्यांनी वाढून ५.३ कोटीवर गेला आहे. टुरिझमचे जगभरातील वाढते महत्त्व पाहता पॉल र्मचटचे भवितव्य उज्ज्वल वाटते. केवळ एक कोटी रुपयांचे भागभांडवल असलेल्या या कंपनीचे ७३ टक्के समभाग प्रवर्तकांकडे आहेत.
माझा पोर्टफोलियोच्या वाचकांना आणि गुंतवणूकदारांना भरभराटीच्या दिवाळीच्या शुभेच्छा देताना, एका गोष्टीकडे लक्ष वेधावेसे वाटते. प्रवर्तकांकडे मोठा वाटा असणाऱ्या शेअरची द्रवणीयता खूपच अत्यल्प असते त्यामुळे अशा प्रकारचे शेअर्स हे अनेकदा केवळ सर्किटवरच चालतात. गुंतवणूकदारांनी हा धोका लक्षात घेऊन मगच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.
सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) प्रस्तुत सदरात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती एक टक्क्य़ांपेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कु ठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही. या सदरातून वर्षभरात सुचविलेल्या कंपन्यांचा आढावा दर तिमाहीस प्रसिद्ध करण्यात येतो.
stocksandwealth@gmail.com