वर्ष २०१५ चे शेवटचे तीन महिने आता उरलेत. शेअर बाजाराचा निर्देशांक आता आवाक्यात वाटत असला तरीही शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना चकवा दिलेला आहे हे निश्चित. जागतिक मंदीबरोबरच देशांतर्गत गोंधळ वाढत चाललेला आहे. केवळ व्याजदर कपात करून आणि मॅट रद्द करून उद्योगधंद्यांतील मंदी आवाक्यात येणार नाही, हे एव्हाना गुंतवणूकदारांना कळलेच असेल. देशांतर्गत आíथक घडी सुधारण्यासाठी कितीही आटापिटा केला तरी लांबलेले जमीन अधिग्रहण आणि जीएसटी बिल, चीनमधील मंदीचे सावट, अमेरिकेतील दरवाढीची टांगती तलवार, रिझव्र्ह बँकेचे गव्हर्नर डॉ. रघुराम राजन यांनी केलेले जागतिक महामंदीचे भाकीत आणि दुष्काळाचे सावट अशा अनेक चिंतांनी भारतीय शेअर बाजार ग्रासला आहे. गेल्या तिमाहीत परदेशी गुंतवणूकदारांनी गेल्या पाच वर्षांतील सर्वाधिक निर्गुतवणूक करून काढता पाय घेतला आहे. तरीही दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी शेअर बाजार हाच उत्तम पर्याय आहे हे अनुभवावरून आपण शिकलो आहोत. ऑक्टोबर महिना नेहमीच मंदीची भीती दाखवतो. अशा वेळी संधी मिळताच उत्तम कंपन्यांचे शेअर्स टप्प्याटप्प्याने खरेदी करायचे धोरण ठेवावे. चांगल्या कंपन्यांतील दीर्घकालीन गुंतवणूक कायम फायद्याचीच ठरते हे आपण अनुभवले आहेच. वाचकांच्या माहितीसाठी याच स्तंभातून दोन-तीन वर्षांपूर्वी सुचविलेल्या अशाच काही शेअर्सनी गुंतवणूकदारांना किती फायदा करून दिला आहे ते पाहता येईल. (‘दीर्घकालीन गुंतवणूक फायद्याचीच’ या मथळ्याखाली याच अंकातील अन्य पानावरील तक्ता पाहावा)
सध्या शेअर बाजारात काय घ्यावे यापेक्षा कुठले शेअर्स घेऊ नयेत ते समजणे महत्त्वाचे आहे. बँकिंग, धातू, खाण उद्योग वगैरे उद्योगांतील शेअर्स मंदीमुळे खूपच खालच्या पातळीवर उपलब्ध आहेत. मात्र केवळ दीर्घकालीन गुंतवणूकदारांनीच अशा उद्योगांत गुंतवणूक करावी. खरे तर शेअर बाजारातील गुंतवणूक ही नेहमीच दीर्घ कालावधीसाठी करायची असते. ‘पोर्टफोलियो’साठी या स्तंभातून सुचविलेले शेअर्स सध्या तितकेसे फायद्यात दिसत नसले तरीही ते दीर्घकाळासाठी राखून ठेवावेत किंवा आणखी खरेदी करावेत.
stocksandwealth@gmail.com
सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) प्रस्तुत सुचविलेल्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
संग्रहित लेख, दिनांक 5th Oct 2015 रोजी प्रकाशित
पोर्टफोलियोचा फेरआढावा
वर्ष २०१५ चे शेवटचे तीन महिने आता उरलेत. शेअर बाजाराचा निर्देशांक आता आवाक्यात वाटत असला तरीही शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना चकवा दिलेला आहे हे निश्चित.
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 05-10-2015 at 01:04 IST
मराठीतील सर्व लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Portfolio review