arth05 arth07सन फार्माचा शेअर पूर्वी याच स्तंभातून सुचविला असल्याने कंपनीविषयी अधिक काही लिहीत नाही. दोनच वर्षांपूर्वी कंपनीने एकास एक प्रमाणात बोनस शेअर्स दिल्यानंतर रॅनबॅक्सी ही औषधी कंपनी ताब्यात घेतल्याची घोषणा केली होती. सध्या रॅनबक्सीची चारही उत्पादन केंद्रे म्हणजे देवास, पंजाबमधील दोन आणि हिमाचलमधील पाओंटा साहेब सन फार्माच्या ताब्यात आहेत आणि या चारही उत्पादन केंद्रांना अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासन- यूएस एफडीएकडून ताकीद देणारी पत्रे मिळाली आहेत. याखेरीज सन फार्माच्या गुजरातेतील हळोलमधील उत्पादन केंद्रालाही आयातीसंबंधाने ताकीद पत्र मिळाले आहे. या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे सन फार्माची सध्याची घसरलेली किंमत. मार्च २०१६ साठी संपलेल्या तिमाहीचे निकालही बाजाराच्या अपेक्षेप्रमाणे नसल्याने गेल्या काही दिवसांत हा शेअर जवळपास ५२ आठवडय़ांच्या नीचांकावर पोहोचला आहे. नुकत्याच संपलेल्या तिमाहीसाठी कंपनीने ७६३४.१६ कोटी रुपयांच्या उलाढालीवर १९६१.९० कोटी रुपयांचा नक्त नफा कमावला आहे. भारतीय बाजारपेठेत ८.८% हिस्सा असलेली सन फार्मा ही आघाडीची औषधी कंपनी असून सध्या कंपनीच्या पोर्टफोलिओत २,००० पेक्षा जास्त उत्पादने आहेत. कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी ५०% उत्पन्न अमेरिकेतून होत आहे. कंपनीच्या ४३५ उत्पादनांना एएनडीए मान्यता मिळाली असून अजून १५६ उत्पादने मान्यतेच्या प्रतीक्षेत आहेत. सन फार्माने नुकताच ग्लिवेक हे जेनेरिक औषध अमेरिकेत प्रस्तुत केले. पहिल्या सहामाहीसाठी त्याच्या विक्रीचे केवळ सन फार्मालाच अधिकार राहणार आहेत. याचा थेट परिणाम अमेरिकी बाजारपेठेतील मोठा हिस्सा ताब्यात घेण्यात होईल. याखेरीज एस्ट्र झेंनिकाबरोबर कंपनीने ‘अ‍ॅक्सर’ (ब्रॅण्ड) या हृदरोगावरील औषधाच्या भारतात वाटप आणि विक्रीसाठी विपणन सामंजस्य करार केला आहे. याचाही फायदा आगामी काळात दिसून येईल. कॅराको, दुसा, तरो आणि रॅनबॅक्सी ताब्यात घेतल्यामुळे जगभरातील सहा खंडांत ४९ उत्पादन केंद्रे असलेली सन फार्मा खऱ्या अर्थाने ग्लोबल कंपनी झाली असून जगातील पहिल्या पाच कंपन्यांत जाऊन बसली आहे. यूएस एफडीएचा गुंता येत्या दोन वर्षांत संपूर्ण सुटेल अशी कंपनीला आशा आहे. रॅनबॅक्सीमुळे आता ओटीसी उत्पादनांतही सनची आघाडी राहील. नुकतेच कंपनीने ‘सनक्रॉस’ हे सनस्क्रीन लोशन बाजारात आणले आहे. ओटीसी उत्पादनामुळे कंपनीची नफ्याची मार्जिन वाढेल.
एका उत्तम दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी सन फार्मा तुमच्या पोर्टफोलिओत असायला हवी.
अजय वाळिंबे – stocksandwealth@gmail.com

सूचना: लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) लेखात सुचविलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचविलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.

Story img Loader