राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. तलवार उपसून पुन्हा तो झाडावर चढला अन् फांदीवर लटकणाऱ्या प्रेताला खांद्यावर घेऊन मौनात चालू लागला. त्यासरशी प्रेतामधला वेताळ प्रश्न विचारू लागला. ‘राजा, चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तिमाहीचे स्टेट बँकेसारख्या बडय़ा कंपनीचा अपवाद वगळता बहुतेक कंपन्यांचे निकाल जाहीर आहेत. या निकालांवरून तुला काय वाटते ते सांग. या प्रश्नाचे उत्तर जर तू सांगितले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर लोळू लागतील,’ वेताळाने राजाला सांगितले.
‘कंपन्यांच्या निकालांचा अभ्यास करताना निफ्टीतील ज्या कंपन्यांचे निकाल २८ तारखेपर्यंत जाहीर झाले त्या कंपन्यांची पहिल्या तिमाहीत विक्री मागील वर्षांच्या तुलनेत, १.३ टक्के तर परिचालन नफ्यात ३.२ टक्के वाढ झाली करपूर्व नफा ०.८ टक्केनी वाढला तर करपश्चात नफ्यात २.३ टक्के घट झाली. सर्वाधिक चांगली कामगिरी बँका व आर्थिक सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी केली तर माहिती तंत्रज्ञान, वाहन व वाहन पूरक उद्योगांची कामगिरी सुमार राहिली. कमी झालेल्या कच्च्या तेलाच्या किमतींमुळे तेल व नैसर्गिक वायू क्षेत्राने चमकदार कामगिरी केली. तेल शुद्धीकरण व वितरण कंपन्यांच्या नफ्यात घसघशीत वाढ झाली. ही प्रामुख्याने तयार मालाचे पुनर्मूल्यांकन झाल्यामुळे व कारखान्यांच्या कार्यक्षमतेत वाढ झाल्याने दिसून आली,’ राजा म्हाणाला.
‘पावसाचा अर्धा मोसम संपला असून या कालावधीतील पावसाची नोंद ही दीर्घकालीन सरासरीपेक्षा अधिक असल्याने शेतीवर अवलंबून असणाऱ्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळू शकेल. याच कारणाने गुंतवणूकदारांचा उत्साह दुणावला आहे. पहिल्या तिमाहीच्या निकालांनी गुंतवणूकदार समाधानी असले तरी इन्फोसिससारख्या कंपन्यांनी आपले भविष्यातील वृद्धीदर खालावल्याने गुंतवणूकदारांना खंत वाटणे साहजिकच आहे. एक चांगली बाब म्हणजे तिकडे अमेरिकेत मेगा कॅप कंपन्यांच्या नफ्यात सरासरी १.८ टक्के वाढ झाली असून ही वाढ मागील पाच तिमाहीतील सर्वात चांगली वाढ आहे. बेरोजगारीत वाढ झाली नसली तरी घटदेखील झालेली नाही हे समाधानकारक आहे. इतर पुढील सहा महिन्यांत अमेरिकेची अर्थव्यवस्था आणखी वेग पकडण्याच्या आशेने ‘जी-७’ राष्ट्रांच्या चलनांच्या तुलनेत डॉलर वधारला आहे. युरोपमध्ये ‘ब्रेग्झिट’मुळे ‘यूके’ व ‘ईयू’ यांच्यातील संबंध गोंधळाचे आहेत. ‘यूके’ची अर्थव्यवस्था पुढील पाच वर्षांत टप्प्याटप्प्याने खालावेल असा कयास असल्याने ‘पौंडा’चे गडगडणे सुरूच आहे.’
‘भारतात सरकारकडून पायाभूत सुविधांच्या विकासाची नवनवीन कंत्राटे बहाल होण्याच्या कामाने वेग पकडला असून येत्या जानेवारीपर्यंत या कंत्राटांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झालेली असेल, असे सरकारचे धोरण आहे. अर्थव्यवस्थेला चालना मिळाल्याने टाटा मोटर्स, अशोक लेलॅण्ड यांच्या विक्रीत वाढ झालेली दिसेल. सध्याच्या ९५ रुपये या भावात दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी अशोक लेलॅण्ड उमदा वाटतो. ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याच्या आशेने ‘एफएमसीजी’ कंपन्यांचे भविष्यातील उर्वरित तीन तिमाही निकाल चांगले असतील.
अॅक्सिस, आयसीआयसीआय आदी खासगी बँकांच्या अनुत्पादित कर्जात घट झालेली नसून अनुत्पादित कर्जापोटी कराव्या लागणाऱ्या तरतुदीत वाढच झाली आहे. सर्वानाच येत्या पंधरा दिवसांत जाहीर होणाऱ्या स्टेट बँकेच्या निकालांची उत्कंठा आहे. अनेक दलाली पेढय़ांनी पुढील आर्थिक वर्षांच्या निफ्टी निर्देशांकाच्या उत्सर्जनांत (ईपीएस) १८ टक्केहून अधिक वाढ अपेक्षित असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. २०१७चे निफ्टीचे उत्सर्जन ४५९ तर २०१८ चे उत्सर्जन ५४३ असेल,’ राजाने सांगितले.
‘सर्वच भारतीय औषध निर्मात्या कंपन्या अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाच्या कठोर नियमांचा सामना करत आहेत. तरीही भारतीय आरोग्यनिगा क्षेत्राच्या लार्ज कॅप त्रिमूर्ती (डॉ. रेड्डी, सिप्ला, सन फार्मा) यांचे मूल्यांकन आकर्षक आहे. दोन वर्षांच्या खरेदीसाठी या कंपन्या आकर्षक वाटतात. ज्या कंपन्यांचे निकाल जाहीर झाले त्यांचा अभ्यास करता ब्रिटानिया इंडस्ट्रीज, नवनीत एज्युकेशन, अल कार्गो लॉजिस्टिक्स, हेक्झावेअर टेक्नोलॉजी, लार्सन अॅण्ड टुब्रो येत्या दोन वर्षांसाठी जमतील तसे घेऊन ठेवावेत,’ राजाने सूचित केले. अशा तऱ्हेने राजाचे मौन भंगल्यामुळे वेताळ शवासहित गायब झाला आणि झाडावर जाऊन बसला.
पुंगीवाला gajrachipungi @gmail.com
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा